
२३.१
एका शिष्याने गुरूंना विचारलं,” दररोज रात्री निजण्यापूर्वी आणि उठल्यावर तुम्ही गादीतच देवाला नमस्कार का करता?”
गुरुजी उत्तरले “आयुष्य समेटून सुंदर मरणाला सामोरं जाण्यासाठी रात्री आणि आयुष्य उमलून सुंदर जीवनाला सामोरं जाण्यासाठी सकाळी आशा दोन्ही वेळी मनशक्ती मिळावी यासाठी भगवंताकडे अर्ज आणि दरम्यान झोपेत मुक्तीचा आनंद मिळावा म्हणून प्रार्थना करतो दररोज”
२३.२
तो आणि त्याचा मित्र त्याच्या घरी जात होते. मित्र रस्त्यात थुंकला तेव्हा तो मित्राला म्हणाला “आपण घरी पोहोचल्यावर माझ्या घरात थुंकू नको बर का !” त्यावर मित्र उत्तरला,”मी काय बिनडोक आहे का घरात थुंकत नाहीत हे न कळायला” त्यावर तो मित्राला उत्तरला,” आत्ताच डेमो बघितला की बिनडोकपणाचा म्हणून वाटलं सांगावं”
२३.३
एक कॉलेजकुमार कॉलेजच्या पहिल्या दिवशी आपल्या रिक्षाचालक वडिलांना म्हणाला,” मला तुम्ही सोडायला येऊ नका. सगळे मला हसतील”. त्यावर वडील म्हणाले,” काही हरकत नाही मी नाही येणार . पण कॉलेजच्या गेटपर्यंत तुला या रिक्षानेच आणलंय हे फक्त विसरू नको”
२३.४
क्लासमधून नेहेमीसारखी एकाट रस्त्याने ती घरी चालली होती. मागून तो तिच्या जवळ येऊन पोहोचला आणि तो तिच्यावर हात टाकणार इतक्यात तिला त्याची चाहूल लागली. त्याला पाहताच ती निरागसपणे म्हणाली,” काका किती वेळेवर आलात, मला एकटीला भीती वाटत होती. आता खूप सुरक्षित वाटतंय.” हे एक वाक्य त्याच्यातलं देवत्व कायमचं जागवण्यासाठी पुरलं होतं.
२३.५
कॉन्ट्रॅक्ट हातून निसटलं म्हणून हताश मनाने तो समुद्रकिनाऱ्यावर येऊन बसला. मुलं वाळूचा किल्ला करत होती तिथे. एक लाट आली आणि तो किल्ला भुईसपाट करून गेली. हे पाहून मुलांनी आनंदानी टाळ्या पिटल्या आणि तो हातावरची वाळू झटकून उभा राहिला तो पुढच्या काँट्रॅक्टसाठी कसून तयारी करण्यासाठीच.