
१९.१
एकदा टपरीवरचा चहा पंचतारांकित चहाला म्हणाला ,” आपल्यात चहा पावडर तीच, साखर तीच, पाणी तेच दूध तेच मग तुला इतकी किंमत का ?
पंचतारांकित चहा म्हणाला,” मित्रा,चहा आपला निमित्त असतो, किंमत ज्या कपात तो दिला जातो त्याची असते.”
त्यावर टपरीवाला चहा त्याला म्हणाला ,” ओह, मग मी आहे तिथेच असलो तरी चालेल कारण इथे जे येतील ते माझ्यासाठी येतील, कपासाठी नाही”
१९.२
ती आरशात आपलं रूप न्याहाळत राहायची पण आरसा तिच्या सौंदर्याचं कौतुक करायचा नाही म्हणून ती त्याच्यावर रागवायची. एका अपघातात कुरूप झालेला तिचा चेहरा , आज पहिल्यांदाच त्याच आरशात ती पाहत होती. आरसा आजही तिला काहीच बोलला नाही. पण आज मात्र कृतज्ञता दाटली आरश्याबद्दल तिच्या मनात.
१९.३
रायगड बघताना एका मुलाने आपल्या बाबांना एक निरागस प्रश्न केला,” बाबा आपल्या घराचं इंटिरियर करण्यासाठी शिवाजी महाराजांकडे पैसे नसतील तर मी माझ्या पिगी बँकेतून देऊ का ? खूप खराब झालंय त्यांचं घर”
१९.४
मी एकदा देवाला म्हटलं,” सुख ज्यांच्यामार्फत होतं ती सगळी इंद्रिय दिसतात तरी पण हे सुख ज्याला होतं ते मन दाखवता येत नाही ! असं का?”
देव उत्तरला,” माणूस त्याचे अवयव विकणार एक दिवस हे ठाउक होतं मला”
१९.५
रागाच्या भरात तो तळ्यात खूप बाण मारत होता. खूप बाण मारून झाल्यावर मग त्याच्या लक्षात आलं की घाव करून करून तो दमला होता पण पृष्ठभागावर त्याच्या बाणाने केलेले ओरखाडे तर पाण्याने क्षणार्धात मिटवले होतेच पण पाणी पृष्ठावरही शांत होत आणि अंतरंगातही काही खळबळ नव्हती.