
१७.१
दाराबाहेर उभं राहून एक भिक्षेकरी
अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनाम देहम आश्रित: ।
प्राणापान समायुक्त: पचामि अन्नम चतुरविधम ।।
या श्लोकावर प्रवचन ऐकत उभा होता. पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. पूर्ण प्रवचनभर त्याला काहीच कळलं नाही पण सगळ्या प्रवाचनाचा अर्थ त्याला त्याच्या हातातल्या वाडग्यात शिळी पोळी पडल्यावर क्षणार्धात उलगडला.
१७.२
श्रीमदभगवद्गीतेवर प्रवचनं करून त्या मिळकतीवर भव्य मठ बांधून ट्रस्ट केला आपल्या नावावर त्या प्रवचनकाराने आणि मठाला नाव दिलं ‘योगक्षेम’.
१७.३
देवळाबाहेर ‘दर्शनाच्या वेळा’ अशी पाटी वाचली आणि त्याला ‘रुग्णांना तपासण्याच्या वेळा’ ही हॉस्पिटलच्या बाहेर दिसणारी पाटी आठवली आणि मग त्याच्या लक्षात आलं की दोन्ही वास्तू एकच गोष्ट करतात फक्त रुग्ण वेगवेगळे एवढाच फरक.
१७.४
त्याच्या वृद्ध आईचे पाय चेपून द्यायला ‘आत्ता वेळ नाही’ असं सांगून तो सत्संगाची वेळ पाळण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडला .
१७.५
खेळता खेळता तो पडला त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने एकदा आकाशाकडे पाहिलं , त्याच्या अंगावरून वाऱ्याची एक झुळूक गेली. त्याने स्पर्श ओळखला , डोळे पुसले आणि अनाथाश्रमातील आपल्या खोलीकडे वळला.