
५.१
तो एक कर्तृत्ववान माणूस होता. खूप मोठं कार्य उभारलं त्याने.त्याच्या अनुयायांनी त्याला देव मानला. आता त्याचे अनुयायी त्याच्या पूजेशिवाय काहीच करत नाहीत.
५.२
सर्वांच्या हृदयाला हात घालायचा म्हणून तो कलाकार खूप लोकप्रिय झाला. नंतर त्याच्या भोवती पुरस्कारांची भिंत उभी राहिली आणि तो दिसेनासा झाला.
५.३
एकदा नदीच्या शेजारून जात असताना नदीने हाक मारली आणि म्हणाली, “तुझा कल्पनाप्रवाह सतत वाहता ठेव. आणि जाऊ दे त्याला जनासागराच्या दिशेने. कारण पाणी काय किंवा कल्पना काय प्रवाही नसलं तर शेवाळं साचतं त्यावर.”
५.४
जग कमी क्षमतेच्या किंवा कमी महत्वाकांशेच्या व्यक्तींना उद्देशून म्हणतं की सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मला नेहेमी प्रश्न पडतो की जीवनावश्यक सगळं कुंपणाच्या आतच मिळत असेल आणि त्यात सरडा समाधानी असेल तर कुंपणापालिकडे जाऊन तरी काय असं मिळवायचं आहे ?
५.५
आपणच बांधलेल्या वृद्धाश्रमातील रजिस्टरमध्ये आपल्या मुलाने लिहिलेलं आपलं नाव तो हताशपणे पाहत राहिला. त्याला वाटलं वृद्धाश्रम बांधण्यापूर्वी बालसंस्कारवर्ग सुरू करायला हवे होते.
५.६
खादी कुडता घालून सूट घातलेल्या त्याच्या मित्राबरोबर मंत्रीमहोदयांना भेटायला जाताना तो खूप अवघडला होता. मंत्रीमहोदयांनी मित्राशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्यासमोर येऊन वाकून चरणस्पर्श केला. त्यावेळी शिक्षकच्या तुटपुंज्या पगाराची श्रीमंती पुन्हा एकदा सिद्ध झाली.
५.७
रियाझ करताना कष्ट सहन न होऊन त्याच्या डोळी अश्रू ओघळले तरी गुरुजी त्याला थांबू द्यायचे नाहीत. आता तो गातो तेव्हा गुरुजींचे आनंदाश्रू ओघळतात आणि तो थांबत नाही.
५.८
वडील आणि मुलगा यांचं वय कसं ओळखायचं माहीत आहे?
सोप्पं आहे. दोघांनी एकमेकांचे हात पकडल्यावर कोण कुणाला आधार देतोय ते शोधून काढायचं!
५.९
तिने त्याला दिलेली गुलाबाची पाकळी माळा साफ करताना त्याला त्याच वहीत सापडली. पाकळीचा रंग केव्हाच उडाला होता. वहीचा मात्र तेवढा भाग गुलाबी झाला होता.
५.१०
त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासंबंधातील सगळ्याच मौल्यवान वस्तूंची वाटणीसाठी यादी तयार झाली. तो रोज वाचायचा त्या ज्ञानेश्वरीचा मात्र उल्लेख नव्हता त्या यादीत.