
४.१
कोपऱ्यावरच्या रामय्याच्या टपरीला उर्जितावस्था येते आहे हे काल जगजाहीर झालं.
परवापर्यन्त आमच्या कटिंग चहाचे पैसे बहीखात्यावर टाकणाऱ्या रामय्याने काल ‘आज नगद कल उधार’ ही पाटी लावली टपरीच्या पत्र्याला, आमच्याकडे पहात.
४.२
आशा कशाला म्हणतात ते हल्लीच पटलं मला जेव्हा मी ऐकलं की रेल्वेमार्गाचा एक रूळ दुसऱ्या रुळला म्हणत होता ,”चल! भेटू लवकरच क्षितिजावर”.
४.३
एकदा गवतफुलाचं आणि गुलाबाचं भांडण सुरू होतं अधिक नशीबवान कोण या वरून. तेवढ्यात नेमका माळी आला आणि गुलाबाला झाडापासून कापून नेलं त्याने आणि ठेवलं एकांतवासात एका फुलदणीत.
४.४
यज्ञवेदीच्या शेजारी एका पात्रात समिधा खूप समाधानी दिसत होती. मी तिला म्हटलं ,”अगं, थोड्याच वेळात जळणार आहेस तू! तरी समाधानी कशी?”
ती म्हणाली,” जळल्यानंतरही उदी म्हणून लोकांच्या भाळी जाण्याचं सौभाग्यपूर्ण प्राक्तन किती जणांच्या वाट्याला येतं जगात?”
४.५
कितीही चंदन, कस्तुरी लावली तरी विठुरायाच्या समचरणांचा तेलकटपणा जातच नव्हता.
नंतर पुजाऱ्यांना कळलं की एका ठिकाणी बसून एक पांगळा वारकरी विठुरायाची सेवा म्हणून पंढरीच्या वाटेवरच्या इतर वारकऱ्यांच्या श्रांत पायांना मायेने वास वास तेल लावून देत होता.
४.६
रस्त्यावरून चालताना एकाचा चुकून स्पर्श झाला म्हणून लाजाळूनं पटकन मिटून घेतलं स्वतःला.
मी विचारलं ,”असे स्पर्श होत राहणार. किती वेळा मिटून घेणार ?”
लाजाळू म्हणाली,” शालीनता दाखवली की लोक वरमतात असा अनुभव आहे माझा !”
४.७
उदंड ऐश्वर्य प्राप्त व्हावं म्हणून, एका सिग्नलवर, गाडीतल्या शेटने, खूप घासाघीस करून, सांगितलेल्या किमतीच्या अर्ध्या किमतीत श्रीयंत्र विकत घेतलं. आणि त्याच पैशात ते यंत्र विकणाऱ्या त्या माउलीने संध्याकाळचा भात पोरांच्या तोंडी पडावा म्हणून पाव किलो तांदूळ.
४.८
मराठी भाषेचा स्वाभिमान बाळगणाऱ्या एका तरुणाने एका किल्याच्या प्रवेश द्वारावरच ‘ xxx आय लव्ह यु’ असं मराठी भाषेत खिळ्यानं कोरून त्यासह त्याची सेल्फी समाजमाध्यमांवर टाकली. जेव्हा त्या फोटोला हजारापेक्षा जास्त लाईक मिळाले त्यावेळी ‘भाषाभिमान उरला नाही’ असं उगाचच पुढच्या पिढीला म्हणतात हे सिद्ध झालं एवढं नक्की.
४.९
एका मोठया पुरस्काराच्या निवडसमितीला एका नागरिकाने विचारलं,”तुम्ही पुरस्काराचा मानकरी कसा ठरवता?”
उत्तर आलं,”एखाद्या विषयात आयुष्य खर्ची करूनही आपल्याला काहीच येत नाही हे ज्याला सर्वात अधिक प्रमाणात कळलं आहे त्याची आम्ही निवड करतो”
४.१०
जेवताना पानात केस आला म्हणून बायकोवर आपण किती चिडलो होतो हे बायकोच्या केमोथेरपीवरून परतत असताना त्याला आठवलं आणि त्याच्या आधीच विषण्ण मनाला खूप अपराधी वाटलं.