सांगीतिक पेनकिलर – १९ ऑगस्ट २०१८

/ / marathi

माझा ध्वनिमुद्रण स्टुडिओ असल्यामुळे ध्वनिमुद्रण करण्यासाठी खूप मंडळी माझ्या संपर्कात येत असतात. माझं बहुतांशी सर्व काम खूप आल्हाददायी असतं. पण कधी कधी मात्र खूप गमतीदार प्रसंगही  घडतात.

अशीच एकदा, एका हिंदीशी साधर्म्य सांगणाऱ्या कुठल्यातरी भाषेत एक गाणं ध्वनिमुद्रित करण्याची वेळ  माझ्यावर आली. ‘हिंदीशी साधर्म्य’ असं मी म्हणण्याचं कारण की त्या गाण्यातील ओळींचा कर्ता इंग्रजीत, कर्म भोजपुरीत, आणि क्रियापद हिंदीत होतं. “आजकल इंडस्ट्रीमे फ्युजनका जमाना है तो ऐसेही गाने चलते है” या शीर्षकाखाली हे ‘कन्फ्युजन’ असलेलं गाणं ध्वनिमुद्रित करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. “नये टॅलेंट को चान्स देते है” या शीर्षकाखाली त्या टॅलेंटला पैसे न देता किंवा काही काही वेळा त्या टॅलेन्टकडूनच पैसे घेऊन त्यांना ‘फिक्स’ केलेलं असतं. याच धरतीवर बांधलेला त्या दिवशीचा प्रोजेक्ट होता. आपण उद्याच्या प्रतिआशा किंवा प्रतिलता नाही तरी निदान प्रतिश्रेया होणारच या आत्मविश्वासाने आणि  ‘स्टार अटीट्युड’ घेऊन आयुष्यात पहिल्यांदाच स्टुडिओत पाय ठेवणारी एखादी छम्मकछल्लो गायिका, तिला नको असतानाही ‘इस इंडस्ट्रीका कूछ भरोसा नही’ असं म्हणत तिच्याबरोबर आलेली तिची मावशी किंवा आई, आणि कॉम्पुटरने दिलेले आयते लुप्स वापरून बनेल ते संगीत आपल्या नावावर बिनधास्त खपवणारा ‘कंपोजर’ असा एकंदरीत तीन जणांचा चमू माझ्यासमोर त्या दिवशी अवतरित झाला.

त्याने आणलेला तो ट्रॅक कम्प्युटरवर चढवून तो ‘कंपोझर’ त्या गायिकेला घेऊन  ‘फायनल टचेस’ देण्यासाठी रेकॉर्डिंग बूथ मध्ये घेऊन गेला आणि हे टचेस योग्य गोष्टीचे आणि योग्य जागी (म्हणजे सांगीतिक बरं का ! ) मिळत आहेत ना ! ह्याची खात्री करण्यासाठी गायिकेची मावशीही त्याच्या मागोमाग रेकॉर्डिंग बुथच्या आत शिरली.  त्यांचे ‘फिनिशिंग टच’ देऊन झाल्यावर तो रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर आला आणि मावशी गायिकेला मानसिक आधार देण्यासाठी आतच थांबली.

ध्वनितंत्रज्ञाला मिक्सरच्या खुंट्या पिळण्यापालिकडे संगीतातील फारसं कळत नाही असा त्याच्या पूर्वानुभव असेल बहुतेक पण म्हणून त्याच पूर्वग्रहदूषित मनाने तो ‘कंपोझर’ मला सूचना देऊ लागला. एकंदरीत पुढे काय वाढून ठेवलं आहे याची पुसटशी कल्पना आल्यामुळे मीही त्याचा गैरसमज दूर केला नाही. कारण मला संगीत कळतं हे जर त्या ‘कंपोझर’ ला कळलं असतं तर ते गाणं पूर्ण सुरात आणण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली असती आणि तो धोका मी या गाण्यासाठी पत्करायला तयार नव्हतो.

गाणं गाताना तर त्या गायिकेने सुरांना इतकं मोकळं सोडलं होतं की इतस्ततः पळणाऱ्या त्या गाण्यातल्या सुरांना पुन्हा पुन्हा गाण्यात परत धरून पकडून आणण्याच्या प्रयत्नांतच बराच वेळ जात होता. शेवटी माझी सहनशक्ती संपत आली आणि मी सांगीतिक पेनकिलरचा पहिला डोस घेतला. या सांगीतिक पेनकिलरच्या पहिल्या डोसचा असर असा होतो की मानसिक त्रासाचं रूपांतर हास्यरसात होतं आणि यामुळे वेदना बऱ्याच अंशी कमी होतात.  या पहिल्या डोसच्या अमलाखालीच गाण्याचं रेकॉर्डिंग पार पडलं.

पुढचा भाग एडिटिंगचा. रेकॉर्डिंग करताना प्रत्येक ओळींचे पाच सहा टेक सेव्ह करून ठेवायला सांगितले असल्याने एडिटिंग सुरू झाल्यावर निर्णयशक्ती नसलेल्या एखाद्या व्यक्तीची साडीच्या दुकानात शिरल्यावर जशी अवस्था होते तशी त्या ‘कंपोझर’ची अवस्था झाली होती. एक ओळ दुसऱ्या ओळीशी मॅच होत नव्हती. एकाचा पोत दुसऱ्याशी मिळत नव्हता आणि एका ओळीचा रंग दुसऱ्याशी जुळत नव्हता. साडी सिलेक्शन च्या वेळी दुकानदाराला मत विचारल्यावर तो ज्या खुबीने सगळ्याच साड्यांना ” ये रंग आपको बहोत सूट करेंगा” असं सर्वसाधारण विधान करून गिऱ्हाईकाला दुखवत नाही तसच त्या कंपोझरने मला माझं मत विचारल्यावर सगळ्याच ओळींना “ये भी अच्छा है” असं सांगून शक्यतो त्याच मन राखण्याचा प्रयत्न केला. शेवटी एक एक ओळ करत त्या गाण्याचं नवखंडी लुगडं एकदाचं विणलं गेलं आणि एडिटिंग पूर्ण झालं.

आता पुढचा टप्पा होता मिक्सिंगचा. यात मिक्सिंग इंजिनिअर पेक्षा आपल्याला अधिक कळत असं तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच वाटतं आणि प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार आणि कुवतीनुसार मिक्सिंग इंजिनीअरला त्याबाबत सूचना देऊ लागतो. साधारण या टप्यापर्यंत सांगीतिक पेनकिलरच्या पहिल्या डोसचा असर कमी होऊ लागलेला असतो आणि हास्यरस लोप पावू लागतो. हीच खूण असते ती सांगीतिक पेनकिलरचा दुसरा डोस घेण्याची. तुमचे कान आणि मन सांगीतिक रित्या बधिर करण्याची ताकद या दुसऱ्या डोसमध्ये असते. ही ताकद या टप्प्याला अतिआवश्यकही असते कारण ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी त्रिशंकू अवस्था या टप्प्यापर्यंत झालेली असते.
आजूबाजूने चारी दिशातून येणाऱ्या सूचनांचं पालन करण्यासाठी हात फक्त खुंट्या पिळण्याचं काम करत असतात. मधे मधे ,”कैसा लग रहा है?” या कंपोझरच्या प्रश्नावर “गानेकीं पुरी (वाट) लग गयी है” अस उत्तर द्यायचं कितीही मनात असलं, तरी  “बहोत बढिया” असंच उत्तर तोंडातून येईल याची तजवीज या दुसऱ्या डोसच्या अमलाखाली मेंदू आपोआप करतो.
अशा तऱ्हेने शेवटी सर्वांच्या आवडीनिवडीला धरून सर्वानुमते ‘फायनल मिक्स’ होतं आणि हाच तो क्षण असतो जेव्हा संगीतिक पेनकलरचा तिसरा डोस घ्यायचा असतो. या डोसच्या अमलाखाली मनाला एक छद्मी निर्विकारपणा येतो. गाणं कुठल्याही स्थितीत निपजलं असलं तरी गुटतगुटीत बाळ जन्माला आल्याचा छद्मी आनंद चेहऱ्यावर आपोआप त्या डोसमुळे तरळतो. आपण शक्यतो आपल्याकडून गाण्याची तब्येत सुधारेल आणि निदान आपली अब्रू जाणार नाही या साठी जमेल तितका प्रयत्न केला हे स्वतःला पटवून देऊन आपला पूर्ण मेहेनताना निर्विकारपणे कुठल्याही आर्थिक घासाघीसीला बळी न पडता पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून वसूल करण्याचा एक प्रकारचा निर्विकारपणा अंगी येतो आणि या डोसच्या अमलाखालीच शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे नुकत्याच घडलेल्या घटना मेंदूतून कायमस्वरूपी डिलीट करण्याची खास क्षमता मिळते.

म्युझिक थेरेपी मध्ये ब्लडप्रेशर, डिप्रेशन, अशा खूप वेगवेगळ्या आजारांवर उपाय सुचवले जातात पण संगीत क्षेत्रातील वेदनांवर माझ्या अनुभवाने मी जी काही नामी औषधं शोधून काढली त्यातील सांगीतिक पेनकिलर हे एक जालीम औषध आहे. वरील प्रसंगासारखे प्रसंग जर कुणावर वारंवार येत असतील आणि जर कुणाला यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर माझ्याशी जरूर संपर्क साधावा. या औषधाची कृती मी पात्र व्यक्तींना विनामूल्य द्यायला तयार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *