भगवंताचा ‘एक्स’ – २० जानेवारी २०१९

/ / marathi

मी सातवीत असताना आम्हाला शाळेत बीजगणित हा विषय शिकण्यासाठी होता. बीजगणिताची एक गोष्ट मला त्या बालवयात गंमतशीर वाटायची. उदाहरण काहीही असो पण ‘जी गोष्ट माहीत नाही पण जी शोधून काढायची आहे त्याला ‘एक्स’  म्हणू’ असं प्रत्येक उदाहरणात असायचं. ए पासून झेड पर्यंतच्या वर्णाक्षरात शेवटून तिसरं वर्णाक्षर बीजगणितात वापरण्यासाठी प्राधान्य देऊन का निवडलं असावं या मागचं धोरण किंवा तर्कशास्त्र काय असेल किंवा ज्याने कोणी  बीजगणिताला सुरुवात केली त्याला सर्व वर्णाक्षर सोडून एक्स का आवडला हे मला अजूनही ना सुटलेलं कोडं आहे.
तर बीजगणितात जी गोष्ट शोधून काढायची आहे त्या अज्ञात गोष्टीला ‘एक्स’ चलन म्हणायचं.  दिलेल्या उदाहरणामधील दिलेल्या तथ्यांवर आधारित एक्स चलन वापरून सूत्र मांडायची आणि गणितातील प्रमेयांचा आधार घेऊन त्या ‘एक्स’ ची किंमत शोधून काढायची असा बीजगणित सोडवण्याचा ढाचा असतो.
म्हणजे गंमत पहा, एखाद्या अज्ञात गोष्टीला शोधून काढायचं असेल तर आधी त्या गोष्टीला ‘ एक्स’ असं चलनाचं नाव द्यायचं. मग त्या   अज्ञाताच्या चलनाला प्रत्येक सूत्रात गोवायचं. मग ज्ञात प्रमेयांचा उपयोग करून मग त्या ‘एक्स’ ची म्हणजेच त्या अज्ञात चलनाची खरी ओळख पटवायची ही त्या एक्स म्हणजेच अज्ञात चलनाची ओळख पटवायची बीजगणितातील सर्वसामान्य आणि सर्वमान्य पद्धत.

आता गम्मत म्हणून त्या अज्ञात चलनाला ‘एक्स’ च्या ऐवजी ‘देव’ म्हणू आणि देवाची खरी ओळख पटण्यासाठी बीजगणितातील  पद्धत वापरू.
म्हणजे त्या अज्ञात गोष्टीला आधी ‘देव’ हे चालनाचं ‘नाम’ देऊ. मग दिलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक सूत्रात ‘देव’ हे चलननाम गोवू. मग माहीत असणारी प्रमेय वापरून शेवटी गणित सोडवत सोडवत त्या देवाची खरी ओळख त्या ‘देव’ या चलननामाचा उपयोग करून शेवटच्या पायरीवर पटेल आणि गणित सुटेल.

मग विचार आला हीच पद्धत संत ईश्वराची ओळख पटण्यासाठी वापरतायत की !! गणित सोडवायला मग भगवंताला ‘एक्स’ म्हणा , ‘श्रीराम’ म्हणा, ‘कृष्ण’ म्हणा की ‘विठ्ठल’. खरी गोम ही गणित सोडवताना अज्ञात चलनाला नाव काय द्यायचं ही नसून, त्या निवडलेल्या नामाला जीवनाच्या प्रत्येक सूत्रात गोवून शेवटी त्या अज्ञाताची खरी ओळख पटून गणित सुटण्यात आहे .. नाही का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *