एका मंदिरात फिरता फिरता एका भिंतीकडे माझं लक्ष गेलं . त्या भिंतीवर आतापर्यंत दिल्या गेलेल्या देणग्या आणि त्यांचे देणगीदार यांची यादी होती. रीतसर काळ्या ग्रॅनाईटवर सोन्याच्या अक्षरात ती यादी होती. अगदी अकरा लाखांपासून ते एक हजार एकशे अकरा रुपये दिलेल्या लोकांची देणगीच्या रकमेच्या उतरत्या भाजणीत व्यवस्थित केलेली ती यादी होती. मला ती यादी बघून थोडं हसायला आलं. मी तसाच पुढे गेलो. एकंदरीत त्या परिसरात फरशीपासून ते चपलांच्या स्टॅन्डपर्यंत, आणि दगडी दीपमाळेपासून ते देवाच्या गाभाऱ्यातील एअरकंडिशनरपर्यंत प्रत्येकावर देणगीदाराचं नाव लिहिलं होतं. ह्याच एका मंदिरात नाही तर अशा बऱ्याच धार्मिक स्थळी किंवा धर्मादाय संस्थांमध्ये हा प्रकार मी पाहिलेला आहे. बऱ्याच ठिकाणी जीर्णोद्धार केलेल्याचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलेलं असतं पण ते धर्मस्थळ मुळात बांधलं कुणी याचा शिलालेख मात्र खूप कमी ठिकाणी आढळतो. आधुनिक माणसाची मजल तर इथपर्यंत आहे की धार्मिकस्थळी किंवा धर्मादाय संस्थांच्या देणगी देण्याच्या पावतीवर लिहिलेलं असतं की ‘दिलेल्या देणगीची रक्कम १५-ग या कलमानुसार करसवलतीस पात्र आहे’. म्हणजे टॅक्स मॅनेजमेन्टमध्ये देवासाठी दिलेली देणगी सुद्धा सुटलेली नाही. एकंदरीत ‘श्रेय’ देण्या-घेण्याची आणि ‘दान’ या पुण्य कर्माचा अध्यात्मिक, सामाजिक आणि त्याच बरोबर आर्थिक फायदाही मिळवण्याची सांप्रत काळात फोफावलेली मानसिकता या सगळ्या कृतींमागे असावी असं मला वाटतं.
श्रेय घेण्याचं म्हणाल तर एकंदरीतच सध्या परिस्थिती अशी आहे की सामाजिक कार्यात काय, राजकीय प्रसंगात काय, व्यावसायिक संबंधात काय किंवा कौटुंबिक परिघात काय, काम करण्यापेक्षा किंवा अपेक्षित संघटित ध्येय गाठण्यापेक्षा त्या कामाचं श्रेय घेणं याकडे सर्वाधिक लक्ष लागलेलं असतं असं वाटतं. म्हणजे एखाद्या सार्वजनिक शौचालयात एकवेळ पाणी नसलं तरी चालतं , स्वच्छता नसली तरी चालते पण त्या शौचालयाच्या इमारतीच्या डोक्यावर ते शौचालय बांधण्याचं श्रेय मात्र एखाद्या विशिष्ट पक्षाच्या पक्षश्रेष्टींपासून ते त्या उपविभागातल्या उपगटप्रमुखापर्यंत सगळ्यांचे चकचकीत फोटो, त्यांच्या पक्षातील दर्जाप्रमाणे कमी अधिक आकारात रांगेने लावून, अगदी न चुकता घेतलेलं असतं. गल्लीतील रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी डांबर पडलंच तर नंतर पडतं, मात्र कुणाच्या निधीतून हे काम करण्यात आलं याचा फलक सर्व पक्षकार्यकर्त्यांच्या फोटोंच्या मांदियाळीसह सर्वप्रथम लागतो. कॉर्पोरेट क्षेत्रात तर ‘श्रेय घेण्यासाठी राजकारण करणे’ हा मुख्य धंदा आणि ‘प्रत्यक्ष काम करणे’ हा फावल्या वेळेतील जोड धंधा असतो असं माझं त्या क्षेत्रात वावरत असताना केलेलं निरीक्षण आहे. अगदी घरात सुद्धा मुलाने शाळेत छान मार्क मिळवले तर,” मग मुलगा कुणाचा आहे?!” असं कॉलर ताठ करून श्रेय घेण्याची माता पित्याची चढाओढ असते पण त्याच मुलाने काही गबाळेपणा केला तर “शेवटी गेलासच ना वडलांच्या वळणावर!” अशी उध्दर्गत करून तेही श्रेय विरुद्ध पार्टीच्या माथ्यावर थोपले जाण्याचे प्रसंग अगदी घराघरात घडतात.
सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, आर्थिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबतीत या श्रेय घेण्याच्या कष्टापायी किती सकारात्मक ऊर्जा वाया जात असेल असं खूप वेळा मनात येतं माझ्या. स्वामी विवेकानंदांच एक अप्रतिम वाक्य आहे. ते म्हणतात, ” There is nothing impossible in this world if we dont worry about who takes the credit” ( श्रेय कुणाला मिळणार याची चिंता केली नाही तर या जगात अशक्य असं काहीहि नाही) किती सुंदर आणि योग्य वाक्य आहे स्वामीजींचं !
माझ्या वैयक्तिक बाबतीत माझ्या लिखाणाच्या संदर्भातही मी हे अनुभवलं आहे . माझं लिखाण मी जेव्हा समाजमाध्यमांवर टाकत असे त्यावेळी माझ्या संपर्कासह पुढाळण्याच्या विशेष विनंतीसह मी ते टाकत असे, अजूनही टाकतो. आणि अगदी प्रत्येकात वास करणाऱ्या हृदयस्थ परमेश्वराला अपील करून टाकतो. पण माझं लिखाण समाज माध्यमांवर पडल्यावर बऱ्याच वेळा तेच लिखाण माझ्या कडे माझ्या नावाशिवाय किंवा “लेखक : अज्ञात” असंही खाली लिहून परत आलं आहे. माझ्या लिखाणात काटछाट करून, किंवा कधीतरी कुणीतरी स्वतःच काहीतरी त्यात घालून, संस्करण केलेलं लिखाण माझ्याकडे परत आलं आहे . एवढंच नाही तर याच्या उलट, मी न लिहिलेलं काही लिखाण माझ्या नावावर माझ्याकडे परत आलं आहे. मी या सगळ्या गोष्टी जेव्हा अनुभवत असे त्यावेळी कधी गम्मत वाटायची कधी मन व्यथित होत असे. ज्याचं श्रेय त्याला न देणं, दुसऱ्याच्या कामाचं श्रेय स्वतः घेणं किंवा स्वतःच काम दुसऱ्याच्या नावावर खपवणं यात काय मानसिकता असेल याचा मी विचार करत असे. अहंगंड, न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव, स्वतःच्या कामाबद्दल शंका अशा अनेक छटा असे मूळ लिखाणात बदल करणाऱ्या व्यक्तीमध्ये असाव्या असं मला वाटायचं.
या दरम्यान एक छान किस्सा ऐकला.
एक अंध भिकारी ट्रेनमधून भीक मागत फिरत होता . एका खिडकीत बसलेल्या इसमाने खिशातून दोन रुपये काढले आणि त्या अंध भिकाऱ्याच्या जवळ बसलेल्या एका सह-प्रवाश्याला ते पैसे त्या अंध भिकाऱ्याच्या हातात ठेवायला सांगितले. त्या पैशाचा स्पर्श हाताला झाल्यावर साहजिकच ज्याने पैसे दिले त्याला त्या अंध भिकाऱ्याने “भगवान तुम्हारा भला करें!” असा आशीर्वाद त्या सह-प्रवाश्याला दिला. यावर ज्याने खरंच पैसे दिले होते तो रागावला आणि त्या अंध भिकाऱ्याला म्हणाला, ” अरे भाई ये क्या न्याय है? तुम्हे पैसे मैने दिये और तुम आशीर्वाद दुसरेको दे रहे हो?” हे ऐकून तो भिकारी हसला आणि त्या दात्याला म्हणाला, ” क्षमा करो महाराज, मुझसे गलती हो गई, पर आप चिंता न करे, अंधा मै हू ! भगवान नही ! वो आपको आपका पुण्य जरूर देगा”
मी सर्वप्रथम हा किस्सा जेव्हा ऐकला तेव्हा मला ती कल्पना खूप भावली आणि माझ्या मनातील ‘श्रेय’ देण्या घेण्याबद्दलच्या सर्व शंका फिटल्या. खरंच कर्मयोग सुंदर शब्दात सांगणारा किती छान किस्सा आहे हा. हा किस्सा ऐकल्यावर लक्षात आलं की खरंच ! ‘श्रेय’ देणारे किंवा घेणारे आपण कोण? जग जो इतक्या काटेकोरपणे चालवतो, तो कर्म आणि कर्मफळ आणि कर्माचं श्रेय ज्याचं त्याला देण्याच्या बाबतीत गोंधळ कसा करेल? आपण आपल्या केलेल्या कर्माचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण परमेश्वरावर आणि त्याच्या न्यायशक्तीवर अविश्वास नाही का दाखवत? आपल्याकडे म्हटलं जातं की आपण केलेलं प्रत्येक कर्म हे चित्रगुप्ताच्या वहीत लिहिलं जातं आणि तोच ज्याचं त्याचं योग्य ते बरं वाईट फळ ज्याच्या त्याच्या वहीत टाकत असतो आणि त्यात एका कणाचीही चूक होत नाही. मग जर मी श्रेयाला धरून इतका आटापिटा केला तर चित्रगुप्तांसारखा इतका सकुशल अकाउंटंट त्याचं काम युगानयुगं चोख करत असताना तो आपली बॅलन्सशीट करताना नक्की चूक करेल अशी शंका घेण्यासारखं नाही का?
हा विचार मनात आला आणि मी एक ठरवलं की आपण आपलं काम करायचं, जगरहाटीच्या दृष्टीने व्यावहारिक वागणुकीला धरून जितकं श्रेय द्यावं घ्यावं लागेल ते तेवढ्यापुरतं द्यायचं घ्यायचं, आणि मग तटस्थतेने गम्मत पाहायची, यातच खरी मौज आहे.
आता माझ्याकडून लिहिलं गेलेलं माझ्या नावाशिवाय कुणी मला पाठवलं तर नम्रपणे ते लिखाण माझ्याकडून झालं आहे असं सांगतो. जर कुणी मी न लिहिलेलं माझ्या नावासह पाठवलं तर तितक्याच नम्रपणे हे माझं लिखाण नाही हेही सांगतो. त्या वेळी मनात ना व्यथा असते ना अहंगंड. आणि आता कुठे मंदिरात किंवा इतर ठिकाणी देणगी दिली गेली तर व्यवहार म्हणून पावती जरूर मागून घेतो पण मिळालेली पावती नंतर फाडून फेकून देतो. कारण त्यावेळी त्या अंध भिकाऱ्याचं एकच वाक्य मनात रुंजी घालत असतं , “महाराज, अंधा मै हू! भगवान नही !”



