रिलॅक्सिंग शेजारती – १ मार्च २०१९

/ / marathi

काही दिवसांपूर्वी एका देवस्थानी राहण्याचा योग आला. त्या देवस्थानच्या वेळापत्रकाचं निरीक्षण करताना लक्षात आलं की एकंदरीत तिथला दिनक्रम अगदी भरगच्च होता. त्या देवस्थानचा काय किंवा इतर सगळ्याच बहुतांशी देवस्थानांमध्ये मुख्य देवाच्या होणाऱ्या उपचारांचं वेळापत्रक पाहिलं की तो देव खरोखर व्ही. आय. पी. असल्यासारखं वाटतं. अर्थात त्या स्थानाचा तोच व्ही. आय. पी. असतो म्हणा. म्हणूनच पहाटे होणाऱ्या काकड आरतीपासून ते  शेजारतीपर्यंत उसंत नावाचा प्रकार त्या देवाला असत नाही. त्यातून एकंदरीत षोडशोपचारातून जो काही वेळ त्या देवाला उरतो तो सगळा उरलेला वेळ दर्शनाभिलाशी पतितांना पावन करण्यात निघून जातो. त्यात ते देवस्थान ‘जागृत’ असेल तर त्या देवाला सतत ‘जागृत’ ठेवण्याचं काम तशीही सर्व भक्तमंडळी अगदी नेटाने, लांबच लांब रांग लावून करतच असतात. माझं एक निरीक्षण असं आहे की सगळी भक्ती सुद्धा साधारण दुपारच्या आणि रात्रीच्या ‘ महाप्रसादाच्या’ आधी होणाऱ्या आरतीच्या वेळी अधिक ओथंबून वाहते.  पण पहाटे काकडआरती किंवा रात्रीच्या शेजारतीला भक्त निद्रादेवीची आराधना करत असल्यामुळे देवस्थानच्या मुख्य देवाला थोडी उसंत मिळते. देवस्थानी वेळ , पैसे, शक्ती खर्च करून जाऊन सुद्धा काकड आरतीच्या किंवा शेजारतीच्या वेळी मात्र, “खरा ईश्वर हा आपल्या अंतःकरणात असतो’ बाकी सगळे बाह्यउपचार आहेत.” इत्यादी तत्वज्ञान अचानक अधिक जवळचं वाटायला लागतं आणि निद्रादेवीच्या आराधनेचं आसन म्हणजेच सामान्य शब्दात गादीचा मोह सोडवत नाही. काकडआरती आणि शेजारतीच्या वेळी सोयीनुसार सुचणाऱ्या ” जर अहमच ब्रह्मास्मि तर पूजेची काय जरूर अस्ति? ” या तत्वज्ञानाला मीही अपवाद नव्हतो हे प्रामाणिकपणे कबुल करतो.
तसं मी शेजारतीला न जाण्याचं एक तार्किक कारण माझ्याकडे होतं. मी ज्या ज्या देवस्थानी शेजारतीसाठी म्हणून थांबलो तिथे गम्मत पाहत असे.  शेजारती म्हणजे देवाला निजवायचं म्हणून त्यावेळी झांज किंवा टाळ्या वाजवायला जे कोणी सेवक किंवा पुजारी प्रतिबंध करत असत तेच सेवक किंवा  गुरुजी लाऊडस्पीकरवर इतक्या विचित्र स्वरात शेजारती म्हणताना मी जेव्हा ऐकत असे त्यावेळी एकंदरीत ते परस्परविरोधी वातावरण पाहून मला हसायलाच यायचं. मला त्याही गंभीर क्षणी एक गमतीदार कल्पना सुचत असे की देव पेंगुळला आहे, दिवसभर भक्तांच्या तक्रारी दुःख , वेदना ऐकून देवाचं डोकं भणभणलं आहे, देवाला झोप अनावर झाली आहे, कधी एकदा निजशय्येवर पहुडतो असं झालं आहे आणि त्यात त्याला कुणीतरी मोठ्यामोठ्याने लाडस्पीकरवरून झोपायला सांगत आहे तर त्या देवाची किती चिडचिड होत असेल?
कुठल्याही देवस्थानी शेजारतीला गेलं की असले काहीतरी विचित्र तर्कट विचार मनात यायचे आणि म्हणूनच उगाच असले विचार करून देवाचा रोष पत्करण्याऐवजी किंवा पापाचा धनी होण्याऐवजी
डोळ्यावरती येत असलेली गुलाबी झोप सोडून काकडआरती काय किंवा शेजारती काय या उपचारांना उपस्थित राहणे हे माझ्या शक्तीपरिघाच्या बाहेरच्या गोष्टी होत्या. म्हणून एकंदरीतच मी या दोन्ही वेळी देवासमोर आरतीला उभं राहायला टाळत असे.

याही वेळी देवस्थानी गेलो होतो तिथे काही कारणाने  शेजारतीच्या वेळी उपस्थित राहण्याची वेळ आली. याही वेळी झांजा किंवा टाळ्या वाजवायला मनाई झाली आणि याही वेळी सेवकाने लाऊडस्पीकरवरून विशिष्ट आवाजात शेजारती सुरू केली. पण यावेळी मात्र माझं लक्ष शेजारतीच्या अर्थाकडे गेलं, त्यातल्या भावनेकडे गेलं आणि एकदम शेजारातीचा वेगळाच अर्थ समोर आला. शेजारतीच काय पण देवाला वाहिले जाणारे सगळेच उपचार देवासाठी नसतातच मुळी. ते असतात त्या देवाची पूजा, आळवणी करणाऱ्या भक्तासाठी. अगदी फुलं वाहण्याचा जरी विचार केला तरी फुलांचे देठ देवाकडे करून पाकळ्या आपल्याकडे करण्याचं काय प्रयोजन असेल नाहीतर? तशीच शेजारती ही सुद्धा देवाचा भाव मनी ठेऊन स्वतः ला शांतावण्यासाठीच असते.  दिवसभराच्या मनोव्यापरानंतर मेंदू रात्री झोपेत सर्व अनुभवांचं विश्लेषण आणि वर्गीकरण करतो त्यासाठी मेंदूला शांत करण्याची शेजारती ही क्रिया आहे हा त्यामागचा वैद्यकशास्त्रीय विचार आहे हे लक्षात आलं. रात्री झोपताना जे विचार मनात असतात ते विश्वामनात मिसळून अधिक प्रभावी होऊन आपल्याकडे परत येतात आणि आपल्यावर परिणाम करतात हा मानसशास्त्रीय सिद्धांत शेजारतीत आहे हे लक्षात आलं. म्हणजे आपल्या पूर्वसूरींनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे जसा सखोल विचार असतो तसा शेजारती करण्यामागेही इतका मोठा मानसशास्त्रीय आणि वैद्यकशास्त्रीय सिद्धांत आहे हे मला लक्षात आलं. हल्ली झोपण्यापूर्वी “म्युझिक फॉर स्लीप” वगैरे गोष्टी लोकप्रिय होत आहेत याच्याही मागे हेच कारण आहे.

मग मनात आलं की शेजारतीच्यामागे इतका सखोल विचार आपल्या पूर्वजांनी केला असेल तर आताच्या परिस्थितीतही शेजारती दररोज घरी स्वतःसाठी करता येऊ शकेल. हल्ली बहुतेक घरी रात्रीच्या मालिका पाहून झोपायला जायची पद्धत पडली आहे. शेजारतीचा वैद्यकीय आणि मानसशात्रीय दृष्ट्या विचार लक्षात आल्यानंतर ही मालिका पाहून झोपण्याची सवय वैयक्तिक आणि कौटुंबिक शांतीच्या दृष्टीने किती घातक आहे हेही लक्षात आलं.  
म्हणून त्या दिवसानंतर दर दिवशी, त्या दिवशी केलेल्या चांगल्या वाईट गोष्टींची उजळणी करून त्या दिवशीची सर्व कर्म मनानेच ईश्वरार्पण करून मग आपणच आपल्यासाठी एक रिलॅक्सिंग शेजारती करायची आणि मग झोपी जायचं याचा सध्या प्रयोग सुरू आहे.

रिलॅक्सिंग शेजारातीचा माझा प्रयोग सफल होईल आणि त्यातून अपेक्षित परिणाम मिळेल तेव्हा मिळेल पण निदान आता देवस्थानी गेल्यावर शेजारतीला उपस्थित असण्याऱ्या थोडक्या भक्तमंडळीत माझा चेहरा दिसू लागेल हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *