मागच्या आठवड्यातली घटना. माझ्या एका संगीतातील विद्यार्थ्यांबरोबर चर्चा सुरू होती. मी जे शिकवलं होतं त्याचा खूप रियाझ करायला मी त्या विद्यार्थ्याला सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर थोडा संभ्रम, थोडी चिंता, थोडी तक्रार अशा अनेक भावनांच्या छटा होत्या. मनात काहीतरी शंका होती हे जाणवत होतं पण विचारावं की नाही या द्विधा मनस्थितीत तो दिसला. मग मीच विचारलं, “काय झालं? कसल्या विचारात इतका?” तो म्हणाला “दादा रियाझ करायला मी वेळ कुठून आणू?” सकाळपासून रात्रीपर्यंत इतक्या गोष्टी करायच्या असतात की दिवसाचे 24 तास पुरत नाहीत. कधीतरी वाटतं दिवसाचे 48 तास तरी हवे होते.
मला ही भावना नवीन नव्हती. मी स्वतः शिकत असताना खूपवेळा मला स्वतःला असे प्रश्न पडले होते. इंजिनिअरिंगला गेलो आणि त्याचवेळी संवादिनी शिकायला लागलो. दिवसातले 5 तास तर फक्त कॉलेजमध्ये येण्याजाण्यासाठी प्रवासात जायचे. त्यात इंजिनीरिंगचा अभ्यास , असाईनमेंटस्, दर सहा महिन्यांनी सेमिस्टरची परीक्षा या सगळ्या गदारोळात संवादिनी शिकणे आणि त्याचा रियाझ करणे यात वेळ कुठून मिळणार हा प्रचंड मोठा प्रश्न माझ्यासमोर असायचा. त्यात इंजिनिअरिंगच्या एकाही सेमिस्टरला एखादा पेपर सुटणं तर सोडाच पण फर्स्टक्लास जरी चुकला तरी संवादिनी बंद अशी सक्त ताकीद घरुन मिळलेली होती त्यामुळे माझ्या आवडीची संवादिनी शिकणं सुरू ठेवायचं असेल तर काहीतरी करुन वेळेची सर्कस करणं आणि दोन्ही गोष्टी त्याच दर्जाने पूर्णवेळ करणं हे अत्यावश्यक होऊन गेलं होतं.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. त्यामुळे करायच्या सगळ्या गोष्टी साधायच्या असतील तर वेळेचा उपयोग आणि शक्य झालं तर वेळेची निर्मिती करणं आणि अक्षरशः २४ तासाचे ४८ तास करणं आवश्यक होतं.
मग टाइम मॅनेजमेंट, कमी झोपणे, करमणुकीच्या गोष्टीत जाणारा वेळ कमी करणे इत्यादी सर्व प्रयोग करून झाले. पण कधी काही कारणाने वेळापत्रक पूर्ण कोलमडे, किंवा तब्येतीवर परिणाम होई किंवा या वेळेच्या नियोजनातच खूप वेळ जातोय हे लक्षात आलं.
मग अचानक, आमच्या कम्प्युटर इंजिनीरिंगमध्ये कम्प्युटरच्या CPU करतो त्याप्रमाणे अनेक गोष्टी एका वेळी करणे (मल्टि टास्किंग) या तंत्राशी ओळख झाली. आणि हाती काहीतरी जादू गवसल्यासारखं झालं. कॉम्प्युटर जसा मल्टी टास्किंग करून त्याची सगळी कामं कमी वेळात करतो तसं तंत्र आयुष्यातली कामं करताना वापरलं तर उपलब्ध वेळेत अधिक कामं पूर्ण करता येतील असं वाटलं. मग त्यावर लगेच प्रयोग सुरू झाले. मग त्यात जेवताना अभ्यास करणे, प्रवासात अभ्यास करणे, भूक लागल्यावर स्वतःसाठी काही खाद्यपदार्थ किंवा चहा/कॉफी करताना एकीकडे टेपरेकॉर्डरवर शास्त्रीय संगीताच्या कॅसेट ऐकणे वगैरे गोष्टी सुरू झाल्या. या प्रकारच्या काही उपायांमुळे अभ्यासाचा वेळ कसा मिळवायचा हा प्रश्न तात्पुरता सुटल्यासारखा वाटला खरा पण प्रवासात वाचल्यामुळे डोळे , डोके दुखणे, चहा कॉफी करताना संगीतात लक्ष गुंतल्यामुळे दूध उतू जाणे इत्यादी परिणाम व्हायला लागले. जेवताना अभ्यास करताना एकदा, “उगाच अभ्यासाची ‘शोबाजी’ करू नको. जेवताना फक्त जेवणाकडे लक्ष हवं. त्यापेक्षा ‘गाण्याबजावण्यात’ जो वेळ (फुकट !) घालवतोस ना तो कमी कर” असा अहेरही कुणीतरी एका शेजाऱ्याने त्याच्या दृष्टीकोनातून मला ‘सुधारण्याच्या’ कर्तव्यभवानेने दिला.. बरं एवढं करून अभ्यासाचा प्रश्न सुटल्यासारखा वाटला पण संवादिनीचा रियाझ करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा प्रश्न सुटलाच नाही. माझं उत्तर मल्टिटास्किंग मध्येच आहे हे माहीत होतं पण त्याची अंमलबजावणी करण्यात चुकतंय काय हे लक्षात येत नव्हतं.
मग अचानक एकदा ‘अष्टवधानी मेंदू’ ही संकल्पना वाचनात आली आणि मी जी चावी शोधत होतो ती मिळल्यासारखं झालं. अष्टवधानी असणं म्हणजे काय याचा अधिक विचार आणि अभ्यास सुरू केला तेव्हा असं लक्षांत आलं की माणसाचा मेंदू आणि माणसाची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियं ही एकमेकांबरोबर एका विशिष्ट पद्धतीने कार्य करतात. मेंदू एकाच वेळी प्राथमिक कामं आणि दुय्यम कामं आशा दोन पातळ्यांवर काम करतो. एखाद्या ज्ञानेंद्रियाला काम दिल्यानंतर त्या इंद्रियाला त्या कृतीचा सराव झाला की काही काळाने मेंदू ती क्रिया मुख्य कर्माच्या यादीतून काढून टाकून दुय्यम कर्मांच्या यादीत टाकतो. आणि मग ते इंद्रिय प्रतिक्षिप्त क्रियां मेंदूच्या दुय्यम सहाय्यासह करू लागतं आणि आणि मग मेंदू पुढच्या दुसऱ्या प्राथमिक कर्माकडे वळतो. या पद्धतीने मेंदू एकाचवेळी आठ अवधानं राखू शकतो. म्हणजेच आठ गोष्टी एकावेळी करण्याची क्षमता माणसाच्या मेंदूत असते. याचं स्पष्टीकरण खूप गुंतागुंतीचं होईल, पण याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे गाडी चालवणे ही कृती. गाडी चालवताना डोळ्याने रस्ता पाहणे , कानांनी इतर आवाज ऐकणे, नाकाने वास घेणे, त्वचेने गाडीतील तापमानाचा अंदाज घेणे, तोंडाने बोलून गाडीतील इतरांशी संवाद साधणे, हाताने स्टीअरिंग व्हील धरणे, एका पायाने क्लच किंवा ब्रेक दाबणे दुसऱ्या पायाने ऍक्सीलरेटरचे नियंत्रण करणे इतक्या गोष्टी एकावेळी होत असतात. गाडी नवीन नवीन शिकत असताना इतक्या गोष्टींकडे लक्ष देताना काय तारांबळ होते याचे किस्से म्हणजे एक वेगळाच कथाभाग होईल. ते असो, पण एकदा सराव झाला की नंतर मात्र आपण गाडी चालवतो आहोत म्हणजे वेगळी विशिष्ट कृती करत आहोत हे गाडी चालवताना वाटत नाही इतक्या स्वाभाविक या सगळ्या क्रिया होतात.
‘अष्टवधनाचं तंत्र’ कळल्यावर हे तंत्र केवळ गाडी चालवतानाच नाही तर दररोजची कामं करताना वापरलं तर ? अष्टवधानी झाल्यावर किती वेळ हातात मिळेल ? असा विचार मनात आल्यावर लगेच माझं इंजिनिअरचं डोकं आकडेमोड करू लागलं.
दिवसात २४ तास असतात. आपण २४ तासातील ८ तास झोपेत गेले असं धरू, इतर जीवनावश्यक गोष्टींसाठी अजून ४ तास गेले असं धरू म्हणजे प्रत्येक इंद्रियाकडून करून घेण्याचा कामासाठी जर १२ तास आहेत असं मानलं आणि अष्टवधानी मेंदू एकाच वेळी प्रत्येकाकडून वेगवेगळी काम करून घेऊ शकतो हे जर खरं असेल तर एकंदरीत माझ्याकडे १२*८ म्हणजे जवळजवळ दर दिवशी ९६ तास उपलब्ध आहेत. म्हणजे मी जर गाडी चालवण्यासारखं एखादं तंत्र संवादिनीचा रियाझ करताना वापरलं तर माझा रियाझ करण्याचा वेळ मला कित्येक पटीने वाढवता येईल हे लक्षात आलं आणि मग विचार करता करता संवादिनीच्या रियाजाची अशी काही तंत्र विकसित झाली की ज्यायोगे एका तासाच्या अवधीत मी जवळ जवळ चार तासांच्या रियाझाइतका परिणाम साधू लागलो. म्हणजेच मी ते तंत्र वापरून ३ तास रियाझ जरी केला तरी १२ तासांच्या रियाझा इतका रियाझ माझा दररोज होऊ लागला. आणि कमी वेळ रियाझ करूनही त्याचे परिणाम खूप चांगले मिळायला लागले.
हे तंत्र विकसित झाल्यावर मग त्याचा उपयोग मला पुढील आयुष्यातल्या खूप इतर बाबींमध्ये करता आला.
हातातील अधिकाधिक कामं कमीत कमी वेळेत करण्यात अष्टवधानी तंत्राचा खूप वापर होतो. आणि आता तर मोबाईलच्या तंत्रज्ञानामुळे कितीतरी गोष्टी एकावेळी करण्यासाठी आणि अष्टवधनाचं तंत्र दररोजच्या आयुष्यात कार्यान्वित करण्यासाठी उपयोगास येतं. उदाहरणार्थ आता मी पुस्तकं न वाचता प्रवासात किंवा इतर दररोजची कामं करताना ऑडिओबुक्स ऐकतो. म्हणजे पुस्तक वाचायचा वेळ वाचतो पण माझी पुस्तकं वाचायची इच्छा पूर्ण होते. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे आता व्हॉईस रेकग्निशन तंत्रज्ञानामुके मोबाईलमध्ये बोलून बरचसं टायपिंग मोबाईलच करतो आणि संदेश टाइप करण्याचा वेळ वाचतो.
अष्टवधानी मेंदूचं तत्व रोजच्या व्यवहारात आणणं जर जमलं तर स्वतःला कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी उत्तम तऱ्हेने करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो असा माझा अनुभव आहे. अर्थात त्यासाठी या तंत्राबद्दल जागरूकता आणि मेंदूला सवय करण्यासाठी अभ्यास हा आवश्यक आहेच पण एकदा याचा सराव झाला की दररोजची कामं आणि आपली कर्तव्य पूर्ण करताना आपल्या आवडीचे छंद जोपासण्यासाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने या तंत्राचा खूप उपयोग होतो हे मी स्वानुभवाने सांगू शकतो
हो!! एक गोष्ट मात्र मी नक्की पाळतो की अष्टवधानी मेंदूचं तंत्र वापरून आपल्या स्वतःसाठी कितीही वेळ हाती मिळू लागला तरी माझ्याकडे वेळ आहे हे लोकांना कुठल्याही परिस्थितीत कळणार नाही याची मी काळजी घेतो नाहीतर दिवसातले ९६ तास सुद्धा पुरणार नाहीत याची मला बालंबाल खात्री आहे….



