ऐकावे जनाचे – २९ जानेवारी २०१८

/ / marathi
मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. एक माणूस त्याचा मुलगा आणि गाढव यांची कथा होती ती. त्या गोष्टीचा गोषवारा असा की एकदा रणरणत्या उन्हात रस्त्यातून एक माणूस त्याचा बारा वर्षाचा मुलगा आणि त्यांचं गाढव जाताना लोक पाहतात. काही लोक म्हणतात “काय वेडे आहेत गाढव नुसतच चाललं आहे, कुणीतरी बसायचं तरी !”. हे ऐकल्यावर तो माणूस गाढवावर बसतो, मुलगा चालतो तर लोक म्हणतात “काय निर्लज्ज माणूस आहे मुलाला बिचाऱ्याला चालवून स्वतः गाढवावर बसला आहे.” हे ऐकून मुलगा गाढवावर बसतो तर लोक म्हणतात ” काय मुलगा तरी आहे, बापाला उन्हात चालवून स्वतः मजेत गाढवावरून चाललाय” हे ऐकून दोघेही गाढवावर बसतात. मग लोक म्हणतात,” अरे ! भूतदया वगैरे काही आहे की नाही, दोघेही बापलेक गाढवावर बसले. अरे त्या बिचाऱ्या गाढवाच्या शक्तीचा तरी विचार करा!” शेवटी ते दोघे गाढवाला पाठीवर घेतात तर लोक म्हणतात “गाढवाला पाठीवर घेऊन आपण चालणारे हे गाढव प्रथमच पाहिले.”  या गोष्टीचं तात्पर्य “ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे” असं आम्ही लहानपणी शिकलो.
मी परवा ही गोष्ट काही संदर्भात कुणासमोरतरी उद्धृत करत होतो. ती सांगताना मला या गोष्टीत पूर्वी कधीच न जाणवलेली एक मोठी सकारात्मक गोष्ट जाणवली ती अशी की तो माणूस आणि त्याचा मुलगा “करावे मनाचे” या पूर्वी “ऐकावे जनाचे” ही कृती ते प्रामाणिकपणे करत होते.  त्या गोष्टीत तो मनुष्य आणि त्याचा मुलगा यांची व्यक्तिरेखा बावळट म्हणून रंगवलेली असली आणि कुणाचं, किती आणि काय ऐकायचं हे जरी त्यांना त्या गोष्टीत लक्षात आलं नसलं तरी ‘समोरच्याचं ऐकणं’ हा मोठा गुण त्यांनी दाखवला होता यासाठी त्या माणसाला आणि त्याच्या मुलाला श्रेय द्ययलाच पाहिजे. विशेषतः सध्याच्या काळात तर ‘ऐकावे जनाचे’ ही कृती जवळजवळ नाहीशी होत चालली आहे माझं निरीक्षण आहे. म्हणजे दोन माणसांमधील संभाषण याची व्याख्या ‘एक बोलत असताना दुसऱ्याने ऐकणे व त्यावर विचार करून मग त्यावर प्रितिक्रिया देणे’ अशी राहिली नसून ‘एक बोलत असेल त्यावेळी दुसऱ्याने आपल्या कधी बोलायला मिळणार या  संधीची वाट पाहत थांबणे आणि एक क्षण जरी मध्ये संधी मिळाली की लगेच ती संधी घेऊन आपण आपलं बोलायला सुरु करणे” अशी झाली आहे आणि हेच संभाषणकलेतील सर्वोच्च कौशल्य आहे असाच समज आणि तसं वागणंही सगळीकडे दिसून येतं.
मी एकदा प्रयोग करून बघायचं ठरवलं. एखादा विषय निवडायचा आणि एखाद्याबरोबर संभाषण सुरु करायचं आणि त्या संभाषणात कोणी कोणाचं किती ऐकलं याचा साधारण अंदाज घ्यायचा प्रयत्न करायचा. हा प्रयोग करायला सुरुवात केल्यावर असं लक्षात आलं की साधारण चाळीस टक्के वेळा दुसरा कधी बोलायचा थांबतोय आणि मी कधी बोलायला सुरुवात करतोय याची लोक केवळ वाट पाहत असतात. साधारण तीस टक्के वेळा तर समोरच्याचं बोलणं संपेपर्यंतही न थांबता समोरच्याचं बोलणं मध्येच तोडून स्वतःच बोलायला लोक सुरवात करतात. पंचवीस टक्के वेळेला लोक समोरच्याचं बोलणं ऐकतात पण नंतर आपण मनात योजलेलंच बोलतात पण केवळ पाच टक्के लोकच असे असतात की समोरचा काय बोलला ते नीट ऐकून त्यावर विचार करून, आपलं बोलणं बेतून मग प्रतिक्रिया देतात. आणि खरं संभाषण करायला या पाच टक्के लोकांबरोबरच मजा येते. बाकीच्यांबरोबर आपण जितकं कमी बोलू तितकं उत्तम असं माझ्या लक्षात आलं आहे. एकदा मी सहज एकाला म्हटलं, “अरे असं म्हटलं जातं की देवाने दोन कान आणि एकच तोंड दिलं आहे याअर्थी आपण अधिक ऐकावं आणि कमी बोलावं हे दाखवण्यासाठी असावं असं थोर मंडळी सांगतात.” त्यावर माझं बोलणं संपायच्या आत हा पठ्ठा काय म्हणतो की उलट कानाला केवळ ऐकण्याचंच काम असतं पण  बोलताना मात्र ओष्ठयं, दन्तोष्ठय, दंत्य, तालव्य, कंठय इत्यादी उच्चार करण्यासाठी ओठ, दात, घसा, टाळू जीभ इतके अवयव दिले आहेत म्हणजे देवाला माणसाने अधिक बोलावं आणि वेगवेगळ्या प्रकारे बोलावं हे अपेक्षित आहे. माझ्या तर्कावर त्याचा प्रतितर्क कितीही सुसंगत असला तरी अशा संभाषणांमध्ये आपण पराभूत झालेलं दाखवण्यातच आपला खरा विजय असतो हे मला तरी पूर्णतः पटलेलं आहे. संभाषणाचं सोडूनच द्या पण हल्ली मंडळी गाणंही नीट ऐकत नाहीत हो !. शास्त्रीय संगीत मैफिलीत तर हल्ली ऐकण्यापेक्षा, ऐकत असताना दिसणं, आणि आपल्याला गाणं खूप कळतं असं दुसऱ्याला भासणं हे अधिक महत्वाचं झालंय असं एकंदरीत या विषयाच्या फारसं खोलात न शिरता मी माझं निरीक्षण या ठिकाणी नोंदवू इच्छितो.
एकंदरीत तात्पर्य हे की ‘ऐकणे’ ही कला साधलेले कलाकार संख्येने खूप कमी असतात.  निरीक्षणाअंती मला असं लक्षात आलं आहे की मनापासून ऐकणं की कला ज्याला साधेल त्याचा मानसिक आणि भावनिक आणि अध्यात्मिक उत्कर्ष खूप अधिक प्रमाणात झालेला असतो आणि त्याचमुळे तो जीवनातही खूप यशस्वी झालेला दिसतो. मला असंही लक्षात आलं आहे की ऐकण्याची कला आत्मसात करण्याचे काही फायदे आहेत.
१. आपण नुसतंच ऐकत राहिलं तर समोरच्याचं लवकर बोलून संपत आणि वेळ वाचतो. त्यालाही आदर दिल्यासारखं होतं.
२. बऱ्याच वेळेला लोकांना त्यांनी तुमच्याशी बोलणं हेच महत्वाचं असतं, तुम्ही ते लक्ष देऊन ऐकलंच पाहिजे अशी पूर्वअट किंवा तशी आवश्यकताही नसते. हा मुद्दा गृहांतर्गत बाबीत अधिक लागू आहे. अशा प्रसंगात केवळ एकमार्गी संभाषणच अपेक्षित असल्यामुळे आपण न बोलणं हे शक्ती, वेळ आणि मनस्ताप तिन्ही वाचवण्याच्या दृष्टीने फारच किफायतशीर असतं.
३. समोरच्या माणसाचं बोलून झाल्यावर त्याविषयावर आपण आपलं डोकं चालवणं आवश्यक आहे का आणि किती ते आपल्या लक्षात येतं आणि अर्ध्या वेळेला तरी आपला विचार करायचा वेळ आणि शक्ती दोन्ही वाचतात.
४. समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेत असताना तो बोलतोय काय या पेक्षा त्याला नक्की म्हणायचंय काय याकडे आपल्याला लक्ष द्यायला अधिक वेळ मिळतो आणि ते संभाषण अधिक सफल होतं. कारण बऱ्याच वेळेला लोकांना जे म्हणायचं असतं तेच ते बोलत असतात असं नसतं.
५. समोरच्याचं संपूर्ण बोलणं होईपर्यंत थांबल्यानंतर आपल्या शंका किंवा प्रश्न एकतर फिटतात तरी किंवा एकत्रितपणे नीट मुद्देसूद पद्धतीने विचारता येतात आणि संभाषण अधिक फलदायी होतं.
६. पूर्ण लक्ष देऊन ऐकल्यामुळे बोलणाऱ्याची एक प्रकारची भावनिक भूक भागत असते आणि त्यामुळ समोरच्या व्यक्तीचं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर त्या व्यक्तीची दुसऱ्याचं ऐकून घेण्याची मानसिकता वाढते आणि संभाषण अधिक फलदायी होतं.
७. ऐकणारे लोक जगात कमी संख्येने असल्यामुळे मी ती कला आत्मसात केली तर माझी समाजात मागणी वाढते, किंमत वाढते आणि मला खूप चांगले मित्र मिळतात असं माझ्या लक्षात आलं आहे.
ऐकण्याचे इतर फायदेही खूप आहेत. पण माझ्या बाबतीत मी विचार करता असं लक्षात आलं की  त्या गाढवाच्या गोष्टीसारखं जितकं मन लावून मी  “ऐकावे जनाचे” हे तत्व अमलात आणेन तितकंच मला योग्य दृष्टीने “करावे माझ्याच मनाचे” या साठी अधिक मुभा आणि वैचारिक बैठक मिळत जाईल हे मात्र अगदी नक्की….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *