मानवाची PUC – २१ नोव्हेंबर २०१८

/ / marathi

काही दिवसांपूर्वी एका पिकनिकला जाण्याचा योग आला. आम्ही सर्व तयारी करून निघालो आणि कारचे  कागदपत्र तपासून पाहताना लक्षात आलं की गाडीच्या PUC (Polution Under Control) सर्टिफिकेटची संपण्याची तारीख तीन चार दिवसात येणार होती. म्हणून एका पेट्रोल पंपाच्या जवळ एक PUC सेंटरवर गाडी नेऊन उभी केली. तिथला कर्मचारी चांगला मुरलेला होता. त्याने विचारलं ‘चेक करू की असंच देऊ?’ मला या प्रश्नाचं थोडं आश्चर्य वाटलं. म्हटलं ,”चेक केल्याशिवाय कसं सर्टिफिकेट देणार ?” त्यावर तो उत्तरला “साहेब एवढी वर्ष यात घातल्यावर गाडीची कंडिशन पाहूनच लक्षात येतं की रिडींग काय येणार. दोन पॉईंट इकडे तिकडे. आम्ही मीटर ने चेक करतो ते तुमच्या समाधानासाठी आम्हाला मीटर रेंज साधारण आधीच माहीत असते. तसही कोण बघत साहेब? अगदीच पाहिलं तर पोलीस फक्त PUC आहे की नाही एवढंच बघतात. रीडिंगच्या भानगडीत कोणी पडल्याचं पाहिलंय कधी?”


या उत्तरावर मी त्याच्या अनुभवाचं आणि सत्यवचनाचं कौतुक करावं की  आगाउपणावर रागावावं हे मला कळेना. पण मी बराच संयम ठेऊन त्याला कायदेशीर मीटर रिडींग करायला लावलं आणि दशांश चिन्ह मध्ये घातलेले दोन तीन अगम्य आकडे त्या छोट्याश्या कागदावर त्याने नोंदले आणि कुठला तरी स्टॅम्प मारून छान प्लास्टिकच्या कव्हरसकट त्या सर्टिफिकेटचं बोटभर चिटोर माझ्या हातात सरकवलं. मीही इमाने इतबारे त्याला शंभर रुपये शुल्क दिलं आणि  ते ‘PUC सर्टिफिकेट’ नामक चिटोर माझ्या गाडीच्या कागदपत्रात नीट ठेऊन एक सहामाही राष्ट्रीय कर्तव्य बाजावल्याचं समाधान करून घेतलं आणि पकडलं जाऊन दंड होईल ही भीती मनातून काढून टाकून शांत मनाने मार्गस्थ झालो.

खरं तर सस्यश्यामला वसुंधरेला तेलजन्य पदार्थांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या विषारी वायूंपासून वाचवावं आणि मानवाच्या आधिभौतिक प्रगतीमुळे वातावरणाचा होणारा ऱ्हास थांबवावा इतक्या उदात्त भावनेने हा PUC चा घाट सरकारने घातला असावा असा माझा भाबडा पण सकारात्मक समज आहे. पण पेट्रोल पंपावरचा तो ‘PUC वाला’ म्हणाला,  तशी कोणाला पडली आहे या वसुंधरेवरच्या अत्याचाराची चिंता? ते दशांश चिन्हवाले आकडे आहेत तरी काय? याची पूर्ण कल्पना संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांना आहे असा अजून एक भाबडा आणि सकारात्मक विचार मनात मान्य करून हेही मान्य करतो की ते आकडे आणि त्यांचा अर्थ या संदर्भात फार माहिती मलाही नाही.

याच विचारात गाडी चालवत असताना एक कल्पना अशी सुचली की गाडीचं PUC सर्टिफिकेट काढतात तसं मानवाचं PUC सर्टिफिकेट असेल तर ? तसं हल्ली आरोग्याच्या बाबतीत लोक खूपच सजग झाले आहेत. त्यामुळे बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल, इत्यादी ‘शारीरिक PUC’ साठी आवश्यक असणारं हे चेकिंग सजग लोक वारंवार करू लागले आहेत. त्या ‘शारीरिक PUC’ सर्टिफिकेट मधील आकडे हेदेखील सर्वसामान्यांना गाडीच्या PUC सर्टिफिकेट मधल्या अकड्यांइतकेच अगम्य असले आणि वैद्यकीय व्यावसायिक हे त्या गाडीच्या PUC सेन्टरवरच्या कर्मचाऱ्याइतकेच अनुभवी आणि आत्मविश्वासाने भरलेले असले तरी ‘चेक करू की तसंच लिहून देऊ?’ असा प्रश्न वैद्यकीय व्यावसायिक अजूनतरी विचारत नाहीत ही खूप मोठी जमेची बाजू.

यातला गमतीचा भाग सोडून देऊ पण विचार करण्यासारखी गोष्ट ही की जशी ‘शरीराची PUC’ करून घेणं जसं आता प्रचलित होऊ घातलं आहे तसं मानसिक, भावनिक आणि विशेषतः अध्यात्मिक PUC करण्याबाबत आपण सजग राहिलो तर ?

मनात विचार कुठले येतात ? ते सकारात्मक येतात की नकारात्मक? मनात येणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच प्रमाण आणि त्यांचं गुणोत्तर किती? या प्रकारचे काही ‘मानसिक PUC’ चेक आपणच आपले करू शकू का ?

त्याच प्रमाणे काम, क्रोध,लोभ, मोह, मद, मत्सर या सहा निकषांवर( पॅरॅमिटरवर) आपलं दिवसभरातील ‘भावनिक PUC’ मीटर रिडींग किती येईल आणि त्यांच्यामुळे होणारं पोल्युशन (Polution) किती नियंत्रणात आहे (Under Control) याची काही निरीक्षणं दिवसभरात मी स्वतःशी करू शकतो का ?

दिवसभरात नामस्मरण किती घडलं आणि दिनचर्येत  ‘अहं’ चं किती पोल्युशन झालं याचं दैनंदिन ‘अध्यात्मिक PUC’ सर्टिफिकेट आपणच आपल्याला द्यायला काय हरकत आहे?

हा विचार सुरवातीस भीतीदायक आणि कंटाळवाणा वाटला. वाटलं कशाला उगाच नसतं लचांड मागे लावून घ्या? कारण ‘शारीरिक PUC’ नाही केली तर नानाविध शारीरिक व्याधीना सामोरं जावं लागतं आणि त्याचा त्रास अपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांनाही होतो. पण हे मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक PUC वालं प्रकरण हा सगळा आंतरिक मामला आहे. याचं  ना कोणाला घेणं देणं ना इतरेजनांना त्याचं सोयर सुतक. मग इतके सगळे उपद्व्याप कशाला करायचे?

पण अधिक खोलवर विचार करता  नंतर लक्षात आलं की ‘शारीरिक PUC’ बरोबरच या ‘मानसिक PUC’, ‘भावनिक PUC’ आणि ‘आध्यात्मिक PUC’ या बद्दल सजग राहणं आणि त्या त्या क्षेत्रातील अनुभवी आणि जाणकार, अधिकारी व्यक्तीकडून त्या चाचण्या करून घेणं खूप आवश्यक आहे कारण लौकिक प्रवासासाठी ‘शारीरिक PUC’  करुन घेणं जितकं आवश्यक आहे तितकंच पारलौकिक प्रवासासाठी माझ्या आत्म्याची मानसिक, भावनिक आणि विशेषतः अध्यात्मिक PUC साठीची चाचणी सतत होत रहाणं खूप आवश्यक आहे.

म्हणूनच आता मी सजग होऊन रात्री मनातल्या मनात माझ्या सगळ्या मानवी PUC चाचण्यांचा आढावा घेतो. त्यातून कुठल्याही दशांश चिन्हात मांडता न येणारं समाधानाचं आणि मनःशांतीचं मीटर रिडींग घेतो आणि मग निवांत झोपी जातो त्या पेट्रोलपंपा जवळच्या कारच्या PUC सेंटर मधल्या कर्मचाऱ्याच्या  आत्मविश्वासाने..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *