
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह एका उपहारगृहात खाण्यासाठी गेलो होतो. तसं चांगल्या वस्तीतलं तामझाम असलेलं उपहारगृह होतं ते.
खूप भूक लागल्यामुळे लगेच मिळेल म्हणून दाक्षिणात्य पदार्थांची निवड केली आणि छानपैकी ‘घी ओनियन रवा साधा डोसा’ अशा
घवघवीत नावाचा पदार्थ ऑर्डर केला. साधारण १० मिनिटांनी तो डोसा माझ्यासमोर अवतीर्ण झाला आणि अगदी खरं सांगतो माझा हिरमोड
झाला. अगदी मऊ, मलूल, थंड झालेला पिठाचा पसरट घावन आणून ठेवला होता त्याने माझ्या समोर. मी अन्नाला नावं ठेवत नाही कारण
अन्न हे पूर्णब्रह्म आहे या वर अटळ विश्वास आहे माझा. पण इथे प्रश्न अन्नाला नावं ठेवण्याचा नव्हता माझ्या ग्राहक म्हणून असणाऱ्या
हक्काचा होता. मी त्याला म्हणालो, ‘ये क्या है?’ माझ्या प्रश्नातला खोचक भाव त्याने कळून न कळल्यासारखं करत तो उत्तरला, ‘आपने
जो मंगाया वोही है, घी रवा सादा’. मी म्हणालो, ‘ऐसा कैसा बनाया है? और थंडा भी हो गया है।’ त्यावर त्याचं भाष्य, ‘घी रवा सादा ऐसाही
तो बनता है। और टाइम हो गया थोडा तो थंडा पड गया और अभी हवा भी थंडा है ना ।’. आता मी थोडा हट्टालाच पेटलो. मी उत्तरलो, ‘मै
बहोत जगहोंपर ये डिश खाता हू और इस रेस्टोरेंटमे भी ये डिश बोहोत बार खा चुका हू, पर ऐसा डोसा अबतक नही खाया है। ये वापस ले
जाओ और दुसरा ठिकसे बनाकर ले आना’ त्यावर तो पुन्हा म्हणाला, ‘ऑर्डर दिया हुवा रिटर्न नही होता है। और बाकीके लोग ऐसाही खाते है
कंप्लेंट नही करते’, त्यावर थोडा राग येऊन पण संयमाने आणि तितक्याच निश्चयाने म्हणालो, ‘लोग कम्प्लेंट नही करते मतलब आप सही
हो ऐसा नहीं है। अगर डोसा बदली नही करना है तो मै उठकर जा राहा हू।’ एवढ्यात आमची गडबड ऐकून मालक आला आणि काय मामला
आहे हे कळून त्याने ‘जा रे दुसरा ला।’ असं म्हणून ते प्रकरण तिथे निकालात काढलं आणि एक ग्राहक तुटण्यापासून वाचवला. नंतर उत्तम
पोटपूजा करून आम्ही त्या उपहारगृहातून तृप्त होऊन बाहेर पडलो. अर्थात या सगळ्या प्रकरणात कुटुंबियांच्या ‘हा राजेंद्र ना ! सुधारणार
नाही कधी, मंत्रचळा नुसता. जगाला ठीक करण्याचा मक्ताच घेतलाय जणू याने’ ही भावना ओतप्रोत भरलेले सगळे नेत्रकटाक्ष मी पूर्णपणे
दुर्लक्षित करून विजयी मुद्रेने त्या उपहारगृहाबाहेर पडलो हे सुज्ञांस वेगळे सांगणे न लगे ! .
तसं पाहायला गेलं तर माझ्या पूर्वीच्या सवयीने फार फार तर ‘इस बार अच्छा नाही बनाया’ असं त्या वेटरला भिडस्तपणे सांगून स्वतःशीच
‘चालतंय की !’ असं म्हणून मी तो डोसा तसाच संपवला असता आणि वर पूर्ण पैसे चुकते करून ‘ठेविले अनंते’ ची भावना मनात घेऊन
तिथून बाहेर पडलो असतो. तसा भारतीय समाजच खूप सहिष्णू आहे. सहानुभूती, सहनशीलता हा भारतीय माणसाचा सर्वात मोठा गुण
मानला जातो. पण एखाद्या गुणाचा अतिरेक हासुद्धा वाईट ठरतो याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्या समाजाकडे बोट दाखवता येईल
असं वाटायला लागलं आहे मला. या सहिष्णुतेमुळेच, या भारतीयांच्या सोशिक वृत्तीमुळेच सगळ्यांनीच भारतीय समाजाला गुलाम केलं.
वाट्टेल तसं वागवलं, लुबाडलं आणि अजूनही ते चालूच आहे. पण ‘चालतंय की’, ‘चलता है।’, ‘हे असंच चालणार’, ‘आपल्या हातात काय
आहे’, ‘सोड रे जाऊ दे’, ‘मला काय करायचंय’, ‘ठीक आहे चालतं’ हे आणि या सारखे अनेक विमनस्क, पराभूत उद्गारच ऐकू येतात
आजूबाजूला. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि ज्या बदलण्यासाठी राज्यकर्ते आणि जनता यांचा समन्वय असणं आवश्यक आहे ते
बदल घडायला खूप वेळ लागेल याची कल्पना आहे मला आणि तोपर्यंत बऱ्याच गोष्टी मनाविरुद्धच ‘चलता है’ म्हणून मान्यही करायला
लागणार आहेत मला. पण ज्या गोष्टी माझ्या पातळीवर बदलण्यासारख्या आहेत त्याबाबतीत ‘चलता है’ म्हणून मी का चालवून घ्यायचं?
मला कामानिमित्त काही वर्ष अमेरिकेत राहण्याचा योग आला त्यावेळी ग्राहकसेवा आणि त्यातील उत्कृष्टता याचा अनुभव मी घेतला. अर्थात
तिथेही काही अपवाद मिळालेच पण हेही नक्कीच मान्य करेन की ते अपवादच होते. अगदी बँकांपासून ते दुकानापर्यंत खरोखरच ग्राहक हा
देव असतो याचा मी अनुभव घेतला होता. मला इथे तुलना अजिबात करायची नाही कारण बऱ्याच पातळ्यांवर दोन देशांमधील परिस्थिती
वेगळीच आहे हे मान्य करावच लागेल. पण थोडा अधिक खोलवर विचार करता मला असं लक्षात यायला लागलं आहे की सहिष्णुता,
सोशिकता या गुणाचा पराकोटीचा परिपाक म्हणून "चलता है" हा आता भारतीय समाजाचा मानसिक रोग झाला आहे. आणि याचा परिणाम
म्हणजे सगळीकडे बोकाळलेला ‘ढिसाळपपणा’ (Mediocrity) आणि बेशिस्तपणा. जिथे पाहावं तिथे समोरच्या माणसांना गृहीत धरण्याचीच
मनस्थिती दिसते. अचूकता, उत्कृष्टता, परिपूर्णतेचा ध्यास धरणारा माणूस वेडा, कट्कटया ठरवला जातो हल्ली. कसंतरी काहीतरी करून
वेळ मारून नेणे याकडेच कल दिसतो सगळ्यांचा. बरं त्यातून भारताची लोकसंख्या खूप असल्यामुळे आणि पुरवठ्यापेक्षा मागणी नेहेमीच
अधिक असल्यामुळे निकृष्ट वस्तूसाठी किंवा सेवेसाठी एक नाही तर कोणीतरी दुसरा ग्राहक मिळणारच आहे याची खात्री वस्तू विकणाऱ्याला
किंवा सेवा देणाऱ्याला असल्यामुळे तो बेदरकारपणे राहू शकतो आणि तसा तो बेदरकार वागतोही असं माझं निरीक्षण आहे.
अर्थात "चलता है" या भारतातील मानसिकतेची दुसरी बाजू पण मला थोडा अधिक विचार केल्यावर लक्षात आली. ती बाजू अशी की
उत्कृष्टता, अचूकता आणि परिपूर्णता यासाठी लागणारी किंमत आपला समाज मोजायला तयार होत नाही. कुठलीही वस्तू म्हणा किंवा सेवा
म्हणा, ‘उत्कृष्ट’ पेक्षा ‘स्वस्त’ विकत घेण्याकडे समाज म्हणून आपला कल असतो. ‘ओरिजिनल सारखं वाटणारं ‘ ‘डुप्लिकेट’ घ्यायला तयार
नसतो का आपण? परवडत असून सुद्धा ‘ओरिजिनल’ साठी अधिक किंमत मोजायची किती जणांची प्रवृत्ती आणि तयारी असते? आणि
म्हणूनच उत्कृष्टतेचा हव्यास ठेवणारा एखादा उद्योजक, व्यापारी आपल्या उत्कृष्टतेच्या इच्छेला शेवटी व्यापारी फायद्या तोट्यापुढे कमी
प्राथमिकता देतो आणि व्यावहारिक विचारापुढे परिपूर्णतेचा आग्रह सोडून देऊन कमी प्रतीची पण स्वस्त वस्तू बनवायला नाईलाजाने तयार
होतो. अर्थात ‘डुप्लिकेट’ माल ‘ओरिजिनल म्हणून विकला जातो आणि ‘किमती’ म्हणजे ‘उत्कृष्ट’ या समजाचा गैरफायदा घेतला जातो
कधी कधी पण ‘किमती’ आणि ‘ऊत्कृष्ट’ आणि ‘डुप्लिकेट’ आणि ‘ओरिजिनल’ या मधला फरक जाणण्याइतके सजग असायला नको का
आपण? यापेक्षाही एक अजून वेगळाच मुद्दा माझ्या लक्षात आला आहे. तो असा की ‘उत्तम’ म्हणजे काय ही पातळी ठरवण्याचे मापदंडच
इतके खालावले आहेत आणि या मापदंडापासूनच लोक इतके अनभिद्न्य आहेत की आपल्याला दिलं जातंय ते निकृष्ट दर्जाचं आहे हेच
लोकांना लक्षात येत नाहीये आता, आणि हीच खरी शोकांतिका आहे. यावरून माझ्या एका मित्राने सांगितलेली गोष्ट आठवली की चीनमध्ये
खरेदी करायला गेलेल्या भारतीय व्यापाऱ्याला निकृष्ट दर्जाचाच माल दाखवला जातो. कारण विचारता असं कळलं की चिनी व्यापाऱ्यांचा
अनुभव आहे की उत्कृष्ट दर्जा असणाऱ्या वस्तूंची किंमत भारतीय बाजारपेठेत परवडणार नाही, आणि चालणार नाही. आणि म्हणूनच
फारसा कोणी भारतीय व्यापारी उत्कृष्ट दर्जाचा माल घेत नाही आणि त्यांच्या मते आपण भारतात जो माल देतो हा निकृष्ट प्रतीचा आहे हे
भारतीयांना लक्षातसुद्धा येत नाही. त्यामुळे निकृष्ट मालाचा हमखास ग्राहक म्हणून भारताकडे पाहिलं जातं. मित्रांनी मला ही गोष्ट
सांगितली त्यावेळी मला वाईटही वाटलं आणि लाजही वाटली.
या सगळ्या गोष्टीची जेव्हा मनात उजळणी झाली त्यावेळी एकंदरीतच माझ्या ही गोष्ट लक्षात आली की आपल्या समाजाच्या स्वाभाविक
मानसिकतेमुळे आणि मी त्या समाजाचा घटक असल्यामुळे माझ्यामध्येही समजूतदारपणा, सोशिकपणा, या गुणाचा अतिरेक होतो आहे
आणि त्यामुळे मला गृहीत धरण्यास मी लोकांना परवानगी देतो आहे अप्रत्यक्षपणे. आणि यामुळेच आधीच समाजात बोकाळलेल्या ‘चलता
है’ या मानसिकतेला मी खतपाणीच देतो आहे. यावर निदान माझ्या पातळीवर उपाय म्हणून मी यासंदर्भात माझ्या आयुष्यात काही बदल
केले आहेत. त्याआधी प्रथम मी कधी ‘चालतंय की’ असं म्हणून सोशिकता दाखवायची आणि कधी उत्कृष्टतेसाठी अडून बसायचं याचे
मापदंड माझ्या मनात पक्के केले आणि नंतर उपाययोजना अमलात आणली. आणि हे उपाय कुठल्याही भाषेच्या, कुठेही राहणाऱ्या, नोकरी
किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकालाच लागू पडू शकतील असं मला वाटतं. ते उपाय म्हणजे;
१. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी उत्कृष्टतेची कास धरेन आणि त्या साठी उत्कृष्ट वस्तू आणि सेवा घेण्यासाठी अधिक किंमत मोजायची मी
मानसिक तयारी ठेवेन.
२. दिलेल्या किमतीच्या अपेक्षित उत्कृष्ट दर्जाची सेवा किंवा वस्तू मिळत नसेल तर मी त्याची ठामपणे मागणी करेन.
३. जो व्यापारी किंवा उद्योजक उत्तमतेची, उत्कृष्टतेची कास धरताना दिसेल त्याचं जाहीर कौतुक करून मी त्याची जाहिरात जास्तीतजास्त
करण्याचा प्रयत्न करेन ज्यायोगे त्या व्यापारी किंवा उद्योजकाचा व्यवसाय वाढेल आणि त्याला उत्तमतेशी कधी तडजोड करावी लागणार
नाही.
४. माझ्याकडून व्यवसायात अधिकाधिक उत्तमतेची, उत्कृष्टतेची सेवा आणि वस्तू देण्याचा मी प्रयत्न करेन.
एक मात्र नक्की की पुन्हा त्याच उपहारगृहात समजा जाण्याचा योग आला तर पुन्हा मी "घी ओनियन रवा साधा डोसा" ऑर्डर करेन आणि
नीट दिला नाही बनवून तर पुन्हा वाद घालून तो परत पाठवेन मग कोणी मला कटकट्या म्हणो, मंत्रचळा म्हणो, किचकट म्हणो नाहीतर
हेकट म्हणो….