
लग्नाच्या संदर्भात एक सुंदर सुभाषित आहे.
कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्|
बान्धवा: कुलम् इच्छन्ति मिष्टान्नम् इतरे जना: ॥
सुभाषिताचा साधारण अर्थ असा की लग्नामधे मुलगी वराच्या रुपाला वरते, मुलीची आई त्याच्या पैशाकडे, तर वडील
त्याच्या गुणांकडे पहातात. नातलग चांगल्या कुळाची अपेक्षा करतात आणि इतर सर्व लोक फक्त उत्तम जेवणावर लक्ष
ठेवतात.
लग्नाच्या संदर्भात इतकं सुयोग्य वर्णन या सुभाषितात आहे त्याचा अनुभव मला नुकताच एका लग्नात आला. लग्न
म्हणजे माझ्यासाठी माणसं वाचायची शाळा असते. वर, वधूपासून सगळ्या नात्यांचा गोतावळा आणि त्यांच्या
चेहेऱ्यावरचे भाव वाचून अनुमान बांधायला खूप मजा येते. त्यातल्यात्यात इतरेजनांच्या चेहेऱ्यावरचे भाव वाचणे हा तर
एक बेहेतरीन अनुभव असतो. आपल्या ओळखीचं कुणी भेटतंय का याचा शोध, कुणी नको तो दिसला किंवा नको ती
दिसली तर त्यापासून नजर वाचवण्याचा प्रयत्न, आणि समजा त्या नकोश्या व्यक्तीच्या तावडीत सापडलंच तर
काहीतरी कारण देऊन त्यातून लवकरात लवकर निसटण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड, कुणी हवासा किंवा
हवीशी दिसली तर काय विषय काढून बोलायचं याची मनातल्या मनात चाललेली उजळणी. मनात असेल नसेल तरी
यजमानांनी निवडलेल्या हॉलचं, हॉलच्या लोकेशनच, डेकोरेशनचं, किंवा तत्सम कुठल्याही गोष्टींचं केवळ यजमानांना
बरं वाटावं म्हणून केलेलं तोंडभर कौतुक. मुलीकडचे असले तर मुलगा किती लकी आणि मुलाकडचे असले तर मुलगी
कशी लाखात एक शोधलीये पण आमचा मुलगा जरा उजवाच हो!! असा आपल्याला केलेल्या आमंत्रणाला जागून
मारलेला शेरा, हे सगळं त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहताना खूप मजा येते. या सगळ्या इतरेजन मंडळींच्या चेहेऱ्यावर एक
भाव मात्र सामायिकपणे दिसतो तो म्हणजे भोजनात काय आहे, मिष्ठान्न किती आणि कुठली आहेत, साधारण किती
काउंटर आहेत, या सगळ्याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणे जेवण्याची कितपत तातडी करायची आणि कुठल्या क्रमाने
कुठल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा हे ठरवणे. त्याचप्रमाणे लग्न लागताना कुठल्या बुफे काउंटरच्या कितपत जवळ
थांबायचं म्हणजे गर्दी होण्याच्या आत आपला नंबर कसा लावता येईल याचंही गणित बऱ्याच जणांच्या डोक्यात
चाललेलं लक्षात येतं . तसंही कुठल्याही लग्नात शेकडा ऐशी टक्के लोक ‘इतरे जनाः’ या श्रेणीतच गणले जात
असल्यामुळे भोजनाला महत्व प्राप्त झालं तर त्यात वावगं काहीच नाही.
मी परवा उपस्थिती लावलेलं लग्नही काही इतर लग्नाच्या मानाने वेगळं असं नव्हतं. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने
जाणवली म्हणजे या लग्नात दोन प्रकारचे बुफे काउंटर होते. एकावर लिहीलं होतं उपासाचे भोजन आणि बाकी बिन-
उपासवाले. मला लक्षात आलं कि नेमक्या मंगळवारी आलेल्या चतुर्थीमुळे बऱ्याच जणांचा अंगारकीचा उपवास होता
म्हणून यजमानांनी विचारपूर्वक उपासाच्या पदार्थांचा वेगळा बुफे काउंटर ठेवला होता. मी जरा त्या दोन्ही काउंटरच्या
आसपास घुटमळलो. त्या उपवासाच्या बुफे मध्ये साबुदाणा खिचडी, बटाट्याची उपासाची भाजी, वरीच्या तांदुळाचा भात,
शेंगदाण्याची आमटी, काकडीची कोशिंबीर, बटाट्याच्या पापड्या, खिचडीवर वेगळं ताक, खरवडलेला नारळ, कोथिंबीर ,
छानश्या लिंबाच्या पाव आकाराच्या कापलेल्या फोडी आणि उपासाला चालेल म्हणून घोटदार श्रीखंड असा बेत होता.
बिन-उपास काउंटरच्या तोडीस तोड असा हा उपासाचा बुफे सजला होता. बिन-उपासवाल्यांना उपासाचे पदार्थ चालतात
म्हणून ते दोन्ही प्रकारच्या पदार्थांवर ताव मारत होते. ते बघून फक्त उपासाचे पदार्थ खाऊ शकणाऱ्यांच्या मनातली
चेहऱ्यावर उमटणारी हळहळ अजिबात लपत नव्हती. ‘हे काय अंगारकीच्या दिवशी का कोणी लग्न ठेवतं ! नेमका उपास
आला बघ!! अरे मला माटाराचा सामोसा इतका आवडतो ना पण नेमका आज उपास ‘ अशी आजूबाजूला यजमान नाहीत याची खात्री करून मग न राहवून मनातली ओठावर आलेली भावना मी एक दोन जणांकडून पुसटशी ऐकली सुद्धा.
सढळ हस्ते ताटात घेऊन फस्त झालेले सर्व उपवासाचे पदार्थ आणि साधारण दोन वाट्या श्रीखंड इतकाच माफक फराळ
करून ढेकर देऊन बरेच उपाशी आत्मे त्यादिवशी तृप्त झाले.
माझ्या मनात आलं, समोरच्या पूर्ण मटारच्या सामोश्याकडे पाहत पाहत साबुदाण्याची खिचडी हळहळत पण तरी
पोटभर खाऊन उपास साजरा केला तर त्या उपासाचा काय उपयोग? बरं त्यातही उपासाला काय चालतं आणि काय
चालत नाही यात पुन्हा मतमतांतरं. परवाच मी एका व्यक्तीने सांगताना ऐकलं की त्या व्यक्तीच्या मते उपासाला गोड
लस्सी चालते पण ताक चालत नाही. चहा चालतो पण कॉफी चालत नाही. शेंगदाणे चालतात पण शेंगदाण्याचं साधं तेल
चालत नाही पण शेंगदाण्याचं डबल रिफाईंड तेल चालतं. मनात आलं हा काय प्रकार आहे? त्यातून उपासाला चालणं न
चालणं हे नक्की ठरवतं कोण ठरवतं? नक्की उपास असतो कशासाठी?
माझ्या दृष्टीने इंद्रियनिग्रह करणे, मनःसंयम मिळवणे या साठी करायचा उपाय म्हणजे उपास. संस्कृतीच्या अंगरख्यात
पांघरलेला आरोग्य राखण्याचा शास्त्रीय नामी उपाय म्हणजे उपास. पोट हलकं ठेऊन पचनसंस्थेला थोडा आराम देणं
म्हणजे उपास. मनाला संयमित करताना ईश्वराची आठवण ठेवण्याचा उपाय म्हणजे उपास. ईश्वराच्या सहवास करणे
म्हणजे उप+वास करणे, म्हणून त्याला 'उपवास' म्हणतात असंही एक मत एका कीर्तनकारबुवांकडून एका कीर्तनात
ऐकलं होतं. उपासाच्या बाबतीतलं श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं एक वाक्य मला खूप आवडतं. श्रीमहाराज
म्हणायचे की उपास 'घडण्यात' जी मौज आहे ती उपास 'करण्यात' नाही. किती सुंदर कल्पना आहे !
विचार मनात आला की खरंच बऱ्याचवेळा कामाच्या गडबडीत किंवा इतर कारणाने जवळजवळ पूर्ण दिवस अन्नाचा एक
कणही पोटात जात नाही. त्यावेळी काम संपल्यावर ईश्वराचं स्मरण करून चहाबरोबर बिस्कीट जरी खाल्लं तरीही
त्याला उपासाचं पावित्र्य नसेल का? रात्री कितीही उशीर झाला तरी नवऱ्याची वाट पाहत थांबुन नंतर त्याच्याबरोबर
जेवणाऱ्या सौभाग्यवतीला किंवा कामावरून उशिरा येणाऱ्या बायकोसाठी थांबून तिच्याबरोबर जेवणाऱ्या नवऱ्याला
उपासाचं पुण्य मिळत नसेल का? मित्राने डबा आणला नाही म्हणून त्याला आपल्यातला अर्धा डबा देऊन आपण
अर्धपोटी राहणाऱ्या एखाद्या चाकरमान्याला एकभुक्त उपवासाचं पुण्य पदरी पडणार नाही का?
मला मनात कित्येकवेळा येतं की भरल्या पोटाच्या आणि भरल्या घरातल्या लोकांनाच उपासाची गरज असते बहुतेक.
कारण केवळ न खाण्यामुळे देव आणि पुण्य मिळालं असतं तर कित्येक आदिवासी, अर्धपोटी राहणारे श्रमिक, संत
म्हणून वावरले नसते का? अगदी गणपतीबाप्पासुद्धा आशीर्वाद देण्याच्या बाबतीत ‘अंगारकी पाळणारा’ आणि
‘अंगारकी न पाळणारा’ असा भेदभाव करेल का? मग असं असेल तर आपल्या उपासाचं इतकं जाहीर अवडंबर कशासाठी?
मी माझ्यापुरता प्रश्न सोडवला आहे. जाहीरपणे उपवास आहे म्हणून दोन ताटल्या खिचडी आणि दोन वाट्या श्रीखंड
हाणून नंतर वामकुक्षीसाठी गादी शोधण्याऐवजी
मटाराचा एखादाच सामोसा मनापासून आवडतो हे मान्य करून मनोमन गणपतीबाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवून तो
अल्प प्रमाणात खाल्ला आणि पोटाला आराम दिला तर अशी चुपचाप घडलेली अंगारकी अधिक फलदायी असेल असं
मला तरी मनापासून वाटतं….