आज खूप दिवसांनी आमच्या जवळच्या एका संस्थेमध्ये गणपतीच्या आरतीला जाण्याचा योग आला. या संस्थेमध्ये आमचे कुटुंबीय तीन पिढ्यांपासून संलग्न आहेत. माझ्या लहानपणची गणपतीची पहिली आठवणच मुळी या संस्थेची आहे. गणपतीच्या दिवसात दर रात्री टाळ आणि ढोलाच्या गजरात पंधरावीस आरत्या आपल्याला जशा समजतील तशा बोबड्या बोलाने म्हणणे आणि नंतर पोट भरेल इतका घवघवीत प्रसाद खाऊन (खरं तर जेऊन असं म्हणणं अधिक योग्य ठरेल) मग रात्रीच्या स्थानिक कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून पहिल्या रांगेतील जागा पटकावून सहभागी होणे असा सगळा तो चित्ताकर्षक कार्यक्रम मला अजूनही जसाच्या तसा आठवतोय. मीच नाही तर माझ्या वयाच्या साधरण तीस चाळीस मुलांचं बालपण याच गणपतीच्या आरतीच्या आठवणीभोवती गुंफलं गेलंय. आरतीला उशीर होऊ नये आणि आपल्याला टाळ वाजवायला मिळावा म्हणून त्या आशेवर वीस पंचवीस मिनिटं आधीच आम्ही त्या सभागृहात गणपतीसमोर हजर होत असू. प्रत्यक्षात उशिरा येऊन सुद्धा शेवटी टाळ मोठ्यांनाच वाजवायला मिळतात आणि आम्हाला जोरजोरात हात लाल होई पर्यंत टाळ्या पिटुनच आरती म्हणावी लागते याचा राग यायचा पण म्हणून आरती मात्र कधी चुकली नाही.
नंतर मोठे झालो आणि दररोज आरतीला जाणं बंद झालं पण शेवटच्या दिवशीची महाआरती कधीही शक्यतो चुकवली नाही.
आज खूप वर्षांनी गणपतीच्या मधल्याच एका दिवशी आरतीला थांबण्याचा योग आला. मी लहानपणीची आठवण घेऊन थांबलो खरा पण चार पाच मुलं आणि आम्ही चार पाच मोठी मंडळीच आरतीच्या वेळी उपस्थित होतो. मग तेवढ्याच मंडळीत आरती सुरू केली. माणसांच्या मानाने टाळ अधिक असल्याने सगळ्या मुलांनाही टाळ वाजवून आरती करता आली. आमच्या लहानपणी आरतीच्या वेळी टाळ वाजवायला मिळणं ही दुरापास्त गोष्ट असल्यामुळे या मुलांना टाळ वाजवताना पाहून आजही मला चक्क त्यांचा हेवा वाटला.. एकेकाळी आरत्या पाठ करण्याची चढाओढ आमच्यात असायची आणि मला किती आरत्या पाठ आहेत हे आपल्या मित्रांना फुशारक्या मारत दाखवण्याची ही आम्हाला संधी असायची. ते काहीच दिसलं नाही आज या मुलांत.
आरती संपली आणि रीतीचा एक पेढा आणि चार फुटाणे घेऊन बाहेर पडलो त्या सभागृहातून पण मन थोडं खट्टू झालं होतं. माझा मुलगा म्हणाला “बाबा काय मज्जा आली ना? ” मी खोट्या खोट्या उत्साहाने हो म्हटलं खरं पण मनात मूक झालो होतो. मी लहानपणी अनुभवलेली मज्जा कसा समजावून सांगणार होतो त्याला ? नक्की काय हरवत चाललं आहे याचा विचार करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की काहीच इतर हरवलं नाहीये. हरवलाय तो वेळ.
वेळ नाही हीच तक्रार सगळीकडे ऐकतोय. गणपतीत नाटक बसवायला वेळ नाही, गाण्याचा कार्यक्रम बसवायला वेळ नाही, गणपतीच्या सजावटीला वेळ नाही, एवढंच काय पण आरतीला इतकी कमी उपस्थिती का ? तर आरतीला जायला वेळ नाही. मग प्रश्न मनात येतो , इतका वेळ सुद्धा बाप्पांच्या रात्रीच्या आरतीला काढता येत नसेल तर गणपतीबाप्पा यायला हवेत तरी कशाला ? गणपतीबाप्पा येणं हा उपचार राहणार आहे का केवळ ? मनात आलं “गणपतीबाप्पा अजूनही का येताय दरवर्षी? लोकांना तर तुमच्यासाठी वेळही नाहीये !”
याच विचारात चालत घरी येत होतो. मुलगा बरोबर होताच. मध्येच एका सार्वजनिक गणेशोत्सवाचा पंडाल होता. मुलगा म्हणाला “बाबा दर्शनाला जाऊया ? ” नेहेमीच्या सवयीने माझ्या तोंडातून निघून गेलं “नको रे खूप उशीर झालाय आता वेळ नाही रांगेत उभं राहून दर्शन घ्यायला. जाऊ घरीच!” मग तो म्हणाला “नाही बाबा , रांग नाहीये, घेऊया ना दर्शन!” आम्ही त्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो. जवळजवळ पंधराफुटी उंच भव्य मूर्ती होती ती. खूप सुंदर!. मीही ती मूर्ती पाहून एक क्षणासाठी पुन्हा लहान झालो. बाहेर पडताना गोड बुंदीच्या कळ्या प्रसाद म्हणून हातावर मिळाल्या आणि आम्ही पंडालच्या बाहेर पडलो. त्या बुंदीच्या कळ्या ज्या आनंदाने माझा मुलगा खात होता ते पाहून माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं.
माझ्या मुलाला खायला प्यायला मुबलक मिळतंय, घरी संपन्नता आहे तरीही तो त्यास चार बुंदीच्या कळ्या तितकाच समरसून आणि आनंद घेऊन का खातोय तर ती बालसुलभ वृत्ती आहे.
मुलं अजूनही तीच मजा अनुभवू शकतील जी मजा आम्ही अनुभवली, जर आम्ही त्यांना तेच वातावरण देऊ शकलो जे आमच्या आईवडिलांनी आम्हाला दिलं. आम्ही आमचं बालपण मजेत घालवलं कारण जीवनाच्या या छोट्या छोट्या गोष्टी अनुभवण्यासाठी आमच्या आई वडिलांनी त्यांचा वेळ आम्हाला दिला होता. खोट्या आणि आभासी यशाच्या खुळ्या कल्पनांच्या मागे आम्हाला उगाच बोजड वजन वाहणारं गाढव बनवलं नव्हतं, आमचं बालपण हिरावून उगाच स्वतःची स्वप्न आमच्यावर लादली नव्हती. यशाची व्याख्या मर्यादित आणि सुखांचा हव्यास कमी होता पण म्हणूनच जीवन शिक्षण आणि अनुभवसम्पन्नतेची त्रिज्या आणि जीवनातल्या अनुभवांचा परीघ खूप मोठा होता. हे छोटे छोटे आनंदाचे क्षण आम्हाला मिळावे म्हणून आम्हाला त्यांचा आणि आम्हाला आमचा असा मुबलक वेळ उपलब्ध करून दिला त्यांनी.
गणपती उत्सव, नवरात्रातील गरबा, दिवाळी, दसरा, हे सण म्हणजे छोटे छोटे आनंद अनुभवण्याचे आणि बालसुलभ प्रवृत्ती खुलावण्याचे आणि त्या क्षणांना गोड आठवणीत रूपांतरित करण्याचे सण होते. लहान लहान गोष्टीत आनंद घेण्याची सवय अशाच सणातून लागते जी पुढे संपन्न आयुष्य आपोआप देऊ करते.
आणि म्हणूनच गणपतीबाप्पांनी दरवर्षी येणं भाग आहे. समजा ते आलेच नाहीत तर टाळ पिटुन आरती करण्याचा आनंद कसा कळणार?, चार फुटाणे किंवा चार बुंदीच्या कळ्यामधला गोडवा कसा अनुभवणार? मिरावणुकीत बाप्पांच्या नावाचा गजर करत रस्यावर नाचण्याचा धीटपणा कसा येणार? बाप्पा येणार म्हणून घर सजवण्यातला उत्साह कसा अनुभवणार? बाप्पाचं विसर्जन होताना डोळ्याच्या कडा पाणावतात ती भावविभोरता कशी अनुभवणार? सगळे नातेवाईक एकत्र येऊन अथर्वशीर्ष म्हणतात तेव्हा जे संस्कार बालमनावर होतात ते कसे होणार?
म्हणूनच बाप्पांना मनापासून एकच प्रार्थना की “गणपतीबाप्पा आपण दरवर्षी असेच चालते व्हा!! म्हणजेच चालत रहा!! आम्हाला चालतं ठेवा आणि पिढ्यानपिढ्यांना तुमच्या येण्यामुळे संस्कारी आणि अनुभवसंपन्न आनंदी जीवन जगण्याची संधी द्या…
गणपती बाप्पा मोरया !!



