
सहावी किंवा सातवीची इयत्ता असेल. गणिताच्या पुस्तकातील काळ, काम, वेग यांचं त्रैराशिक शिकवत असताना बरीच उदाहरणं घेऊन आम्हाला शिक्षकांनी ह्या संकल्पना शिकवल्या. त्यात एक गणित हमखास असायचं. एक हौद आहे. त्याची उंची, लांबी, रुंदी अमुक अमुक आहे. त्या हौदात काही नळ अमुक अमुक एवढं पाणी दर मिनिटाला वरच्या बाजूने हौदात सोडतात. त्या हौदाच्या तळाला काही नळ आहेत. त्यातील प्रत्येक नळ दर मिनिटाला वेगवेगळ्या प्रमाणात अमुक अमुक इतकं पाणी त्या हौदाच्या बाहेर सोडून देऊ शकतो. याप्रमाणे पाणी भरणारा नळ आणि पाणी सोडणारे नळ असे सगळे नळ सुरु ठेवले तर पूर्ण हौद भरायला किंवा पूर्ण रिकामा व्हायला किती वेळ लागेल?… हुश्श !!!
आमच्या शेजारी राहणाऱ्या काकांच्या टॉमी नावाच्या डॉबरमन कुत्र्यानेही मला जितकं घाबरवलं नसेल, तितकं या नळाच्या गणिताने मला त्यावेळी घाबरवून सोडलं होतं. कारण टॉमी नेहेमी त्याच्या एकाच उग्र रूपात घाबरवायचा. पण हा हौद आणि त्याचे नळ कुठल्या वेळी काय उग्र रूप घेतील याची शाश्वती नसायची. कधी हौद त्रिकोणी ते षट्कोनी असा कुठल्याही आकारात समोर यायचा. म्हणजे त्या आकाराप्रमाणे त्याचं घनफळ काढायची भानगड. त्यात ते नळ एकाच आकाराचे नसायचे. वेगवेगळ्या व्यासाचे नळ वेगवेगळ्या वेगाने पाणी हाताळायचे. त्यामुळे हौदात पाणी ओतणारा नळ आणि सोडणारे नळ यांचं गणित प्रत्येक वेळेला बदलायचं. कधी हौदात पाणी ओतणारे नळ वाढायचे किंवा पाणी सोडणारे कमी व्हायचे. खरं सांगू? हे गणित सोडवताना मला नेहेमी हस्तिनापुरातल्या द्युताची आठवण व्हायची. त्या द्यूतगारात, जणू पाण्याचे फासे करून, एका बाजूला पांडवांसारखे हौदात पाणी भरणारे नळ आणि दुसऱ्या बाजूला कौरवांसारखे पाणी सोडणारे नळ असे समोरासमोर बसले आहेत आणि तावातावात पाण्याच्या रूपात ते फासे टाकत आहेत आणि हौद भरला तर पांडवांच्या बाजूचे नळ आणि हौद रिकामा झाला तर कौरवांच्या बाजूचे नळ ” जितम् मया । जितम् मया” असं करत ओरडून धिंगाणा घालत आहेत हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर सारखं नाचायचं.
जसजसा मोठा झालो तसतसे हौदही बदलत गेले आणि नळही. गृहस्थाश्रमात पडलो तेव्हा त्या पाण्याच्या हौदाची जागा बँक अकाउंटने घेतली आणि भरणाऱ्या नळांची जागा घेतली नोकरीतल्या पगाराने, व्यवसायातल्या नफ्याने, शेअर्स वरच्या डिव्हिडंटने, फिक्स डिपॉझीटच्या व्याजाने आणि अशाच स्वच्छ पाणीच देणाऱ्या इतर नळांनी. बाजाराच्या परिस्थितीनुसार काही नळ कोरडे पडायचे कधी कधी पण ईश्वरकृपेने, गढूळ पाणी बँकेच्या हौदात टाकणाऱ्या नळांची ना इच्छा झाली ना गरज वाटली.
आणि याच्या दुसऱ्या बाजूला हौद रिकामे करणारे नळ? ते तर “दिन दुगने रात चौगुने’ वाढत होते. मोठ्या घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, इन्शुरन्सचे हप्ते, मेडिक्लेम चे हप्ते, हौस मौज, दागदागिने, कपडेलत्ते, फिरायला जाणे, मुल, त्यांचं शिक्षण, त्यांची हौस मौज, देणी-घेणी, लग्नमुंजी, खाणे पिणे (म्हणजे शाकाहारी खाणे आणि शाकाहारीच पिणे बरं का !! इतर खाण्यापिण्याचा भानगडीतच पडलो नाही, कारण एक तर त्या नळांचा व्यास मोठा असल्यामुळे पैसे बाहेर फेकण्याचा वेगही अधिक असतो आणि त्या नळाचं एकदा का व्यसन लागलं तर त्या नळात नुसता हौद रिकामा करण्याचीच नाही तर पूर्ण हौद नेस्तनाबूत करण्याची ताकद असते… असो !!) तर अशा गृहस्थाश्रमी माणसाच्या आयुष्याला दशांगुळं व्यापून उरणाऱ्या, खर्च नावाच्या, बँकेच्या हौदातुन सतत पैसे बाहेर उपसणाऱ्या नळांची संख्या आणि त्यांचे व्यास यांचं गणित बसवण्यातच माझ्यातला गृहस्थाश्रमी व्यस्त राहिला.
आता जसजसा पुढचा वानप्रस्थाश्रम जवळ येऊ लागला आहे तसतसं एका वेगळ्या हौदाचं गणित मनात सुरु झालं आहे. तो हौद आहे माझ्या जीवात्म्याचा. हा हौद जन्माला आल्यापासून प्रत्येक माणसाबरोबर असतोच. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चारही आश्रमात तो सतत भरतही असतो आणि रिकामाही होत असतो. कुठलंही केलेलं सत्कृत्य, सात्विक कर्म, दान, धर्म, व्रत वैकल्य, या नळांमधून विवेक, आनंद, समाधानरुपी पाणी या माझ्या जीवात्म्याच्या हौदात पडत असतं आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार या नळातून हे विवेक, आनंद, समाधानरुपी पाणी जीवात्म्याच्या हौदातून बाहेर फेकलं जात असतं. त्यातल्या त्यात अहंकार हा नळ तर या हौदातलं इतकं पाणी बाहेर टाकतो की त्याचं गणितही करता येत नाही. कित्येकवेळा तर हा नळ अदृश्यच असतो. या अहंकार नावाच्या नळाची गम्मत अशी की, दान, तप, साधना, सत्कृत्य इत्यादी नळांना हा अहंकाराचा अदृश्य नळ जोडला गेला नं की कित्येकवेळा या सगळ्या सात्विक नळांचं पाणी जीवात्म्याच्या हौदात पडायच्या आधीच बाहेरच्या बाहेर लीक होऊन जातं आणि मग प्रश्न पडतो की इतकी सत्कृत्य करूनही जीवात्म्याचा हौद समाधानाने भरत का नाही?.
आयुष्य मनापासून उपभोगून, आयुष्याचे टक्के टोणपे खाऊन, एक गोष्ट मनाला पटली आहे की आताच्या जगात विशेषतः गृहस्थाश्रमात असताना बँकेचा हौद भरणं, रिकामा होणं हे चक्र प्रारब्धाच्या गतीने सुरूच रहाणार आणि ते मी कर्तव्यबुद्धीने करत राहणं हे आवश्यकही आहे आणि अपेक्षितही. गृहस्थाश्रमातला हा बँकेचा हौद भरताना आणि रिकामा होताना, जोडीदार, मुलंबाळं, आईवडील नातेवाईक, मित्र, संबंधी, अशा अनेक जणांचा हातभार लागतो. पण माझ्या जीवात्म्याचा हौद सांभाळण्याची जबाबदारी केवळ माझी आणि माझीच आहे. यासाठी जीवात्म्याच्या हौदात समाधान भरणाऱ्या नळांचा व्यास हळू हळू वाढवायची वेळ झाली आहे. अहंकाराचा अदृश्य नळ शोधून काढून तो उखडून टाकण्याचा, किमानपक्षी त्याला जाणीवपूर्वक बाजूला करण्याचा प्रयत्न करण्याची वेळ झाली आहे. सहा आवेगांचा वेग हळू हळू कमी करून त्यांना माझे रिपु न करता त्यांच्याशी गोडीगुलाबीने संगनमत करून त्यांना शांत करण्याची वेळ झाली आहे. समाधानचं हौदातलं पाणी जास्तीतजास्त हौदातच राखायचा प्रयत्न करण्याची वेळ आहे.
जीवात्म्याच्या हौदाचा विचार करायला लागल्यावर आताही मनःचक्षूंसमोर महाभारताचंच दृश्य उभं ठाकतं. पण आता डोळ्यासमोर द्युतागार येत नाही. आता येतं कुरुक्षेत्र. त्यात एका बाजूला जीवात्म्याच्या हौदात समाधानाचं पाणी भरणारे सर्व सात्विक कृत्यांचे नळ आणि दुसऱ्या बाजूला ते समाधान हौदातून वाहून नेऊन कमी करणारे षड्रिपू आणि अहंकार हे तामसी नळ आणि त्यांच्या बरोब्बर मध्यावर विमोहपिडीत व्याकूळ अर्जुनाच्या भूमिकेत असलेला मी… अंतस्थ भंगवंतानी कृपा करून जीवनगीता शिकवावी या प्रतीक्षेत असणारा…