गाणारा माणूस गंमतीला- २८ ऑक्टोबर २०१७

/ / marathi

काही काळापूर्वी घडलेला एक प्रसंग. त्या प्रसंगात दोन पात्र होती. एक पात्र होतं ते म्हणजे एक २०-२२ वर्षाचा तरुण, तात्पुरतं त्याचं नाव ठेऊ ‘शशी’. आणि दुसरं पात्र होतं ते म्हणजे ५२-५५ वर्षाचे त्याचे बाबा, त्यांचंही तात्पुरतं नाव ठेऊ ‘सुरेशराव’. शशीचं इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्ष. घरात संगीताचं वातावरण. शशीने शास्त्रीय संगीताचं खूप व्यवस्थित शिक्षण घेतलेलं, शिक्षण सांभाळून उत्तम रियाझ करून चांगल्यापैकी प्रगती केलेली. काही छोट्या मोठ्या कार्यक्रमात शशी गाणं सादर करू लागलेला. श्रोत्यांचा त्याच्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागलेला आणि म्हणूनच तो सुखावलेला. संगीताची आराधना करायला लागल्यापासून शशीच्या मनात एकाच विचार. “मला गायक व्हायचंय”. आपल्या द्धेयाकरीता इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सर्व मौज, मस्ती, मजा याला शशीने तिलांजली दिली होती. सगळे मित्र पिकनिकला जायचे पण शशी मात्र संगीत महोत्सवात हजेरी लावायचा. तिकीट परवाडायचं नाही म्हणून सभागृहाच्या मागच्या बाजूला कलाकार येण्याची वाट पाहत थांबायचा. कलाकार आले की त्यांचा तंबोरा घेण्याच्या निमित्ताने सभागारात प्रवेश मिळवायचा आणि तो संगीतोत्सव भान हरपून ऐकायचा. भाऊबीजेच्या पैशातून, वाढदिवसाच्या भेटीचे पैसे वाचवून, पॉकेटमनी खूप काळजीपूर्वक खर्च करून त्याने दोन-तीनशे कॅसेट चा खजाना जमवलेला आणि सतत त्या कॅसेटवरून श्रवण मनन, चिंतन करत असलेला. त्याच्या मनात एकाच ध्यास “मला गायक बनायचं आहे” आणि त्यासाठी अमाप कष्ट घेण्याचीही तयारी असणारा असा शशी.

शाशीचे वडील सुरेशराव म्हणजे रसिक. कला, संगीत, साहित्याची आवड असणारे पण एकंदरीत कलाकार, संगीतकारांबद्दल आणि त्यांच्या जीवनपद्धतीबद्दल काही अनामिक कारणामुळे थोडा आकस असणारे. “गाणारा माणूस गंमतीला, पण संगतीला इंजिनियर, डॉक्टर, वकील यासारखे उच्चविद्याविभूषित लोकच सगळ्यांना हवे असतात” असं स्पष्ट किंबहुना हेकट मत असणारे. शशीने संगीताचा व्यासंग जरूर करावा पण पूर्णवेळ करिअर संगीतात करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे अशा ठाम मताचे.

त्या प्रसंगात दोघेही तावातावाने त्यांची त्यांची बाजू मांडत होते. शशीचं म्हणणं होतं की, “पूर्वीचं ठीक आहे पण आता कलाकारांना उच्चविद्याविभूषित व्यक्तींइतकच किंबहुना एक काकणभर सरसच मान, पैसा, प्रसिद्धी मिळते. आणि गेल्या एक दोन पिढ्यांपासून तर उच्चविद्याविभूषित मंडळी या क्षेत्राकडे वळू लागली आहेत आणि संगीतात त्यांनी उत्तम करिअर केलं आहे. त्यांनी त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि ते यशस्वी झाले. आजच्या पिढीतील आघाडीचे संगीतकार ‘शंकर महादेवन’ हे शिक्षणाने कॉम्पुटर इंजिनिअर आहेत. पण आज सगळं जग त्यांना ओळखतं ते गायक संगीतकार म्हणून, कॉम्पुटर इंजिनिअर म्हणून नाही. आज लाखोंनी इंजिनिअर असतील पण ‘शंकर महादेवन’ लाखात एकच आहेत”. पुढे शशी सुरेशरावांना म्हणाला की,”तुम्ही म्हणालात म्हणून मी इंजिनिअरपण झालो, आणि प्रत्येक सेमिस्टर अगदी फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. म्हणजे मला शिक्षण जमत नाहीये म्हणून मी संगीताकडे वळत नाहीये. तर मला तेच मनापासून करावंसं वाटतंय म्हणून मला त्यात करिअर करायचंय. तो ‘थ्री इडियट’ सिनेमातला रँचो पण तेच सांगतो ना?”

त्यावर सुरेशरावांचं मत, “तो सिनेमातला रँचो सांगतो ते सिनेमातच ठीक आहे रे. प्रत्यक्ष जीवनात असं नसतं. जे चमचमते तारे दिसतात हे लाखातील एक असतीलही पण बाकीच्यां नव्याणव हजार नऊशे नव्याणव लोकांना पोट भरायची भ्रांत पडते कधी कधी हे लक्षात घे… तुझ्या बरोबरचे मित्र नोकरीला लागतील, अमेरिकेत जातील, सेटल होतील, आणि तू ? तू असाच बसशील ताना, पलटे घोटत. आणि जेव्हा जाग येईल तेव्हा वेळ गेलेली असेल तुझ्या हातातून.”

हा असा प्रसंग कमी अधिक प्रमाणात सगळ्याच अशा घरात घडलेला असतो जिथे जीवनातली उत्कटता (passion) आणि आर्थिक सुरक्षितता(financial security) यांचा संघर्ष असतो. उत्कटतेला आर्थिक सुरक्षिततेची फिकीर नसते आणि आर्थिक सुरक्षिततेला उत्कटतेची किंमत नसते. पण खरं पाहायला गेलं तर एखादा यशस्वी कलाकार होण्यासाठी उत्कटतेची झिंग आणि आर्थिक सुरक्षिततेची जाणीव या दोन्ही असाव्या लागतात. आणि उत्तम यशस्वी कलाकार या दोन्ही मनोभूमिकांबरोबर तितकाच सहजतेने राहू शकतो असं अनेक उदाहरणांवरून दिसतं.

कुठल्याही व्यक्तीकडे दोन प्रश्नांची उत्तरं असणं खूप आवश्यक आहे. ते प्रश्न म्हणजे,

1. माझं जीवन जगायचं कारण काय?
2. माझं जीवन जगायचं साधन काय?

गाण्याच्याच नव्हे तर कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीत या दोन्ही प्रश्नांची उत्तरं माणसाकडे असल्याशिवाय त्याला त्याच्या आयुष्यात समाधान आणि समृद्धी दोन्ही एकत्र कधीच मिळत नाहीत. एकंदरीत निरीक्षण करता बहुतांशी मंडळींना जीवन जगण्याचं खरं कारणच सापडलेलंच नसतं. आयुष्यभर साधनं मिळवत राहणं हेच जगण्याचं कारण असतं असाच बहुतांशी लोकांचा समजही असतो आणि वागणंही. “सध्या काय सुरू आहे आयुष्यात?” या प्रश्नावर ही मंडळी,” काही नाही रे! दररोजचंच, बस पाट्या टाकतोय. काय करणार, पापी पेट का सवाल है!” असं काहीतरी म्हणून तोंडावर दुखरं हसू आणून उत्तर देतात. पण त्यामागे त्यांना त्यांच्या जगण्याचं कारण किंवा प्रयोजन न कळणं हेच मुख्य कारण असतं असं जाणवतं. ज्यांना दररोजचं जगणं हेच संघर्ष आहे त्यांच्यासाठी हे प्रश्नच गैरलागू आहे. पण ज्यांना हा विचार करता येणं शक्य आहे त्यांनी तरी या दोन प्रश्नांची उत्तरं गांभीर्याने त्यांच्या आयुष्याच्या संबंधाने शोधणं आवश्यक आहेच आहे.

शशीचंच उदाहरण घेतलं तर त्याच्याकडे उत्कटता आहे, “माझ्या जीवन जगायचं कारण काय?” या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडलेलं आहे. पण “माझ्या जीवन जगण्याचं साधन काय?” या प्रश्नाविषयी त्याच्याकडे उत्तर नसेल तर स्वतःला सिद्ध करत असताना जीवनसंघर्ष करत असता पैशाच्या, साधनांच्या अभावामुळे तो थकून जाईल आणि त्याच्या जीवन जगण्याचं कारणही त्याला हळू हळू फोल वाटायला लागेल आणि तो निराश होईल. म्हणून जितका विचार शशी गाण्याविषयी करतो तेवढाच विचार त्याने हे गाणं तो आयुष्यभर जिवंत कसं ठेवणार आहे याचा करणं आवश्यक आहे.

या उलट सुरेशरावांच्या विचारसरणीची अनेक माणसं आपल्याला अशी दिसतात की त्यांनी “माझ्या जीवनाचं साधन काय” हा प्रश्न उत्तम सोडवलेला असतो. पण भरपूर पैसे मिळवलेले, बंगला, गाडी, सुबत्ता असलेले लोकही आयुष्यात काही विशेष ध्येय, एखाद्या विषयाविषयी उत्कटता आणि मुख्य म्हणजे “माझ्या जीवनाचं खरं कारण काय?” या प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे खूप निराश झालेले असतात आणि ज्यांच्या जीवनात उत्कटता आहे त्यांच्याकडे पाहून हेवा करतात. घरात अमर्याद सुबत्ता असणारे, स्वर समजत नाहीत म्हणून व्याकुळ झालेले दिसतात. स्वतःजवळची संपत्ती मोजण्याची त्यांना फिकीर नसते पण तालाच्या मात्रा मोजायला त्यांचे हात आसुसलेलं असतात. आणि बऱ्याचवेळा साधनांच्या मागे धावताना जीवनाचं खरं साध्यच मागे पडलं हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळी खरं तर त्यांच्या हातातूनही वेळ गेलेली असते.

या सगळ्या विचारांचा एक मूळ गाभा असा की जीवन जगण्याचं कारण आणि जीवन जगण्याचं साधन याचा ताळमेळ साधणं हे सर्वात महत्वाचं. उत्कटतेचा काय किंवा आर्थिक सुरक्षिततेचा काय, दोघांचाही बाऊ करणं तितकंच घातक. उत्कटतेला आर्थिक सुरक्षिततेची चौकट असणं जितकं आवश्यक तितकंच आर्थिक सुरक्षततेच्या चौकटीत बांधलेल्या जीवनाच्या कॅनवासमध्ये उत्कटतेने रंग भरता येणंही आवश्यक. आणि जो माणूस उत्कटता आणि आर्थिक सुरक्षितता दोन्हींचा तोल सांभाळणारा असेल तर गाणारा माणूस कोणालाही गंमतीला आणि संगतीला दोन्हीसाठी एकदम पसंत असेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *