
काही दिवसांपूर्वी एक अप्रतिम विडिओ पाहिला. तो होता पदार्थविज्ञानात आणि एकंदरीतच जगाच्या इतिहासात उलथापालथ घडवून आणणाऱ्या आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाच्या दोन सिद्धांतांविषयी. एका सिद्धांतात आईन्स्टाईनने जडपदार्थ (Matter), ऊर्जा (Energy) आणि प्रकाशाचा वेग (Speed of Light) याचा संबंध जोडला आणि एक जगप्रसिद्ध समीकरण जन्माला घातलं E=MC². या समीकरणाचा अर्थ असा की एखाद्या पदार्थात किती ऊर्जा साठवलेली असते? तर ती म्हणजे त्या पदार्थाच्या वस्तुमानाला प्रकाशाच्या वेगाने, जी जगातील सर्वात वेगवान गोष्ट समजली जाते, या संख्येनं दोन वेळा गुणलं तर जे उत्तर येईल तितकी ऊर्जा त्या वस्तूत साठवलेली असते. फक्त त्या वास्तूच्या अणूच्या केंद्राचं विघटन करता आलं तरच ती ऊर्जा बाहेर पडते. ती ऊर्जा नियंत्रित करता आली तर त्याचा उपयोग अणुउर्जेतून विद्युतऊर्जा करण्यासाठी किंवा इतर अनेक विधायक कामांसाठी केला जातो पण तीच ऊर्जा अनियंत्रित झाली तर अणुबॉम्ब बनून सृष्टीचा प्रचंड विध्वंस करण्याची त्याची क्षमता असते.
आईन्स्टाईनचा दुसरा सिद्धांत म्हणते ‘सापेक्षतावाद’ (Theory of Relativity). ‘विशेष सापेक्षतावाद’ (Special Theory of Relativity) आणि ‘सामान्य सापेक्षतावाद’ (General Theory of Relativity) असे दोन सिद्धांत सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या संदर्भात आईन्स्टाईनने मांडले. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतांना आव्हान देणारे आईन्स्टाईनचे हे दोन सिद्धांत. या सिद्धान्तांनी पदार्थविज्ञानात क्रांती घडवून आणली. गुरुत्वाकर्षण, अवकाश आणि वेळ यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे आणि त्या संबंधातील समीकरणे आईन्स्टाईनने या सिद्धांतांच्या अनुषंगाने मांडली.
आईन्स्टाईनच्या या सिद्धांतांमधील गणिताच्या किंवा पदार्थविज्ञानाच्या आणि त्यातील समीकरणाच्या फार खोलात न शिरता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या दोन सिद्धांतातून आईन्स्टाईनने जड, चेतन, प्रकाश, गुरुत्व, अवकाश आणि वेळ या सृष्टीच्या मूलभूत गुणधर्मांना एका विशिष्ट सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातून या सृष्टीचा पसारा कसा चालतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व मुलभूत घटक एकमेकांशी बांधले गेले आहेत आणि एकंदरीत विश्वाचा पसारा हा या सर्वांचा एकात्मिक विचार (integrated approach) केल्यावरच विशद करता येतो. मग विचार आला कि भगवंतांनी भागवदगीतेच्या सातव्या अध्यायात म्हणजेच ज्ञानविज्ञान योगात याच मूलभूत गोष्टींचाच उहापोह नाही का केलेला? अपरा म्हणजेच जडप्रकृती आणि परा म्हणजेच चेतना यांच्या संयोगानेच या सृष्टीचा पसारा मांडला गेला आहे आणि त्यातील सर्व घटकांना एकत्र माळणारा दोरा म्हणजेच मूळ परब्रह्म आहे असं भगवंत ज्ञानविज्ञान योगात सांगतात. हेच गणिताच्या भाषेतून समिकरणांच्या माध्यमातून आईन्स्टाईन मांडत नाहीये का? असा मनाला प्रश्न पडला.
एका मुलीने आईन्स्टाईनला विचारलं की तुमचं देवविषयी मत काय? त्यावर आईन्स्टाईन ने उत्तर लिहिलं आहे की “कोणीही माणूस ज्याने विज्ञानाची गांभीर्याने कास धरली आहे त्याला सरतेशेवटी एक गोष्ट मान्य करावीच लागते की या विश्वाच्या नियमांच्या मुळाशी एक तत्व अस्तित्वात आहे. असं तत्व जे मानावापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचं आहे”. आईन्स्टाईन त्याच्या एका वेगळ्या लेखात असंही लिहितो की “आपल्या जगातल्या सगळ्या अनुभवांच्या मुळाशी असं काहीतरी तत्व आहे जे आपल्या जाणण्याच्या पालिकडलं आहे. असं तत्व की ज्याचं सौदर्य आणि भव्यता केवळ अप्रत्यक्षपणे आपण अनुभवू शकतो. आणि हे मान्य करणं हीच जर धार्मिकता असेल तर मी नक्कीच धार्मिक आहे.”
गणिताच्या समीकरणातून आणि पदार्थविज्ञानाच्या कसोटयांमधून पारखून निरखून जवळ जवळ 10 वर्ष सापेक्षतावादाचा सिद्धांत सिद्ध करण्यात ज्या अलौकिक बुद्धिवंताने आपलं तन, मन, धन, आणि बुद्धी खर्च केली त्याने श्रीमद भगवद्गीता वाचली नसेल कदाचित पण परास्पर्श झालेली आईन्स्टाईनची अलौकिक प्रतिभा ज्ञानविज्ञान योगात मांडलेले सिद्धांत समिकरणांद्वारे सिद्ध करण्यात गर्क राहिली आणि वस्तुनिष्ठ वैज्ञानिक असूनही स्वतःला श्रद्धावान म्हणवणारा आईन्स्टाईन ज्ञानविज्ञान योगातच भगवंतांनी वर्णन केल्याप्रमाणे परा सृष्टीचं गूढ जाणणारा असा भगवंताचा श्रद्धावान भक्तच नाही का? …