अहंकार आणि लिफ्ट- ३ ऑक्टोबर २०१७

/ / marathi

माझ्या करियरच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ १४ वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर नोकरी करण्याचा योग आला. आणि त्या नंतर नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचा , बऱ्याच जणांच्या दृष्टीने मूर्खपणाचा!, निर्णय घेतला. तो निर्णय इतरांना मूर्खपणाचा वाटणं साहजिकच होतं त्यांची चूक नाही त्यात. कारण त्या काळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं स्थान स्वर्गाच्या दोनच बोटं खाली आहे असं मानलं जायचं. याला कारणही तसंच होतं. कर्मचाऱ्याच्या मनात आलेली, किंवा न आलेली सुद्धा, प्रत्येक हौस भागवण्यासाठी, त्याचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलण्यासाठी मालक तयार असायचे. मग घराजवळच्या ठिकाणापासून कंपनीची फुकट बस काय, फुकट जेवण काय, वेळोवेळी पार्टीज काय, बोनस काय, ऑन साईट, म्हणजे युरोप किंवा अमेरिकेची वारी काय, आणि इतरही बरंच काही. अशी चंगळ असायची. त्या काळात अत्तरापेक्षाही डॉलरच्या नोटेचा हिरवा वास अधिक सुगंधी वाटायचा. आताही कर्मचाऱ्यांना त्या सुविधा मिळतात, नाही असं नाही. पण आता तो परिपाठ झाला आहे, आयटी कर्मचाऱ्यांसाठी. पण त्यावेळी मालकांकडून कर्मचाऱ्यांना मिळणारी ही वागणूक हा एक नवलाईचा भाग होता. या अशा वातावरणात माणसाचा ‘अहं’ नाही सुखावला तरच नवल. आम्हाला अगदी पिसासारखं हळुवार जपलं जातंय म्हणजे आम्ही कोणीतरी विशेषच आहोत अशी मनाची समजूत करून घेण्याइतका बालिशपणा त्यावेळी माझ्या अंगात होताही म्हणा!. गम्मत अशी की हा ‘आयटी’मुळे आलेला ‘ऐट’ मिश्रित अहंकार माझ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवाच्या वर्षांच्या समप्रमाणातच पोसला आणि वाढत गेला असं म्हणणंही अगदीच वावगं ठरणार नाही.

आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरु झाला. अचानक जीवनाचा दृष्टिकोनच बदलला, अनुभव बदलले, माझी माणसांबाबतची गणितं चुकायला लागली. लोकांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. आता डॉलरचीच काय रुपयाचीही खरी किंमत कळायला लागली. दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक गलेलठ्ठ रक्कम बँकेत पडेनाशी झाली. नोकरीच्या गणितात बेरीज झाल्यावर हक्काचे काही हातचे उरतात. पण व्यवसायात बेरजेने आलेले हातचे आपल्या हातात राहतीलच असं ठामपणे सांगता येत नाही. व्यवसायाच्या बाबतीत ‘प्रत्यक्षाहून व्यवसायाबद्दलची डोक्यातली प्रतिमाच अधिक उत्कट असते’ हेही लक्षात आलं. थोडक्यात सांगायचं तर सातव्या ढगातून माझं विमान मुंबईच्या खड्डेयुक्त रस्त्यावर उतरलं. माझं विमान रस्त्यावर उतरलं खरं पण पोसलेला अहंकार काही ढगातला राजप्रासाद सोडायला तयार नव्हता. नोकरीत कधी कुठल्या क्षुल्लक वस्तूसाठीही कुणाकडे हात पसरले नाहीत. एवढंच कशाला खुद्द नोकरीही हात न पसरता कंपनी कॅम्पस मध्ये येऊन द्यायच्या. आयटीमध्ये नोकरीत असताना नाही पटली कंपनी किंवा बॉस तर सोडून देण्याचा मार्ग नेहेमीच उपलब्ध होता. पण स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यावर काय काय सोडणार हो !!! इथे व्यवसायात, त्यातून व्यवसाय नवीन असताना तर सप्लायर पासून कस्टमर पर्यंत सगळेच आपले स्वामी. कोणाला माज दाखवणार? जिथे तिथे पोसलेला अहंकार आड येऊ लागला. हाच अहंकार व्यवसायात आवश्यक असणारं डोक्यावरचं बर्फ वितळवू लागला आणि तोंडावरची साखर कडू करू लागला.

आणि अचानक एक उपाय सुचला. त्यावेळी मी आठवड्यातून चार वेळा पुणे मुंबई चकरा मारत असे. मी ठरवलं आता पुण्यावरून मुंबईत जायचं ते हायवे वर कुणाला तरी लिफ्ट मागूनच. कारण स्वारगेटला थंडगार ‘शिवनेरीत’ जाऊन बसण्यात तो राजप्रासादातला अहंकार निपुण झाला होता. पण रस्त्यावर उभं राहून आशाळभूतपणे समोरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला हात दाखवायचा आणि आत बसलेल्या तालेवार गाडीवानासमोर ‘लिफ्ट’ साठी हात पसरायचा म्हणजे त्या पोसलेल्या अहंला मुळापासून हलवून टाकणारा धक्का होता. त्या गाडीवानांपैकी काहींची “काय भिकारडा लिफ्ट मागतोय” हा भाव प्रकट करणारी ऐटबाज नजर सहन करायची. ती भुर्रकन वेगाने समोरून निघून जाणारी पाठमोरी गाडी बघायची आणि पुन्हा त्याच उमेदीने पुढच्या येणाऱ्या गाडीला हात दाखवायचा असा साधारण तो परिपाठ असायचा. बरं कुणी थांबलाच एखादा तर आपल्या मुक्कामाच्या दिशेने जात नसल्यामुळे इतक्या कष्टानंतर हाती आलेला घास सोडून द्यायचा आणि मग पुढच्या गाडीसाठी पुनःश्च हरी ओम … कुणी आपल्या मुक्कामाच्या दिशेचा मिळाला तर एकाच वेळी, भाडं किती घेणार याची घासाघीस, एक नजर गाडीत उपलब्ध असलेल्या जागेवर, दुसरी नजर गाडीतल्या त्या जागेसाठी आजूबाजूला जमा झालेल्या कॉम्पिटिशनवर, आणि सौदा पटला तर क्षणार्धात आपल्याला हव्या असलेल्या जागेवर स्थानापन्न होणं हे सगळं अगदी काही सेकंदातच करावं लागायचं.

हा सगळा प्रकार काही महिने केल्यावर लक्षात यायला लागलं की खरोखर आता मन नकाराची भीती (fear of rejection) पचवायला हळू हळू तयार होऊ लागलं आहे. अहंमधील हवा थोडी थोडी जाऊ लागली आहे आणि कधी कधी रस्त्याचा स्पर्श सहन करण्याच्या परिस्थितीत तो आला आहे.. माणसांनी कशाही प्रतिक्रिया दिल्या तरी मन थोडं शांत राहायला शिकलं आहे. आपल्यापुढे काही कारणांनी कुठल्याही स्वरूपात हात पसरणाऱ्या माणसांबद्दल थोडी सहानुभूतीच नाही तर आपुलकीही वाढली आहे. हात पसरणारे नाईलाज असतो म्हणून हात पसरत असतात त्यामुळे त्या पसरलेल्या हातांकडे हेटाळणीच्या दृष्टीने पाहणं कमी झालं आहे.

जेव्हा संन्यासाची दीक्षा दिली जाते त्यावेळी हाती भिक्षापात्र घेऊन देशाटन करायला सांगतात त्या मागचा अर्थ मला या छोट्या प्रयोगांती थोडातरी लक्षात आला. मी हे मुबई पुणे हायवे वरचं लिफ्टचं भिक्षापात्र हातात घेतल्याने अहंकारावर विजय मिळवला वगैरे वल्गना अजिबात करणार नाही. पण या प्रयोगांती व्यावसायिक म्हणून थपडा खायची शक्ती आणि त्यातूनच हवी ती गोष्ट मिळवण्याची युक्ती बऱ्याच अंशाने वाढली एवढं मात्र नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *