स्थितप्रज्ञतेचा रबरबँड- 1 ऑक्टोबर 2017

/ / marathi

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील उत्तरार्धात स्थितप्रज्ञाची लक्षण भगवंतांनी सांगितलेली आहेत. स्थितप्रज्ञ हा दुर्घटनेने किंवा दुःखाने कष्टी होत नाही आणि त्याला सुखाची आसक्ती नसते. कासव ज्याप्रमाणे आपलं अंग कवचामध्ये ओढून घेतं तसं स्थितप्रज्ञ आपले
षडरिपू आपल्या नियंत्रणात ठेवतो. तो विषयभोगांपासून दूर राहतो. तो मनोवसना टाकून देतो. ही आणि अशी अनेक स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत. ही जेव्हा वाचनात आली त्यावेळी मनापासून सांगायचं तर थोडं दडपणच आलं मनावर पण भारावलोही. आपल्याला जमेल ते अमलात आणण्याचा मनाचा निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशीपासून स्थितप्रज्ञासारखं राहायचं असं ठरवलं. मनावर सुखदुःखाचा परिणाम होऊ द्यायचा नाही. वासनांपासून दूर राहायचं. षडरिपू आटोक्यात ठेवायचे वगैरे वगैरे.

त्या अध्यात्मिक तंद्रीतच दुसऱ्या दिवशी लवकर उठलो. मुखमार्जन, देवतावंदन झाल्यावर अगदी लवकर उठल्यामुळे चहा मलाच करणं भाग होतं. सकाळी उठल्यावर लगेच चहाची सवय ही सुद्धा एक असक्तीच आहे मग ती पण सोडायला हवी असा विचार मनाला चाटून गेला खरा पण अगदीच चहावर गदा आल्याने शेवटी आलेमिश्रित पण आसक्तीविरहित चहा घेऊया असं काहीतरी लंगडं कारण देऊन मनाला कसंतरी समजवलं. पण मग लक्षात आलं दूध संपलय. “सगळं दूध कोणी संपवून टाकतात का ?” असं पुटपुटत चरफडलो आणि लगेच स्थितप्रज्ञ संकल्पाची आठवण झाली. लक्षात आलं की चहाच्या असक्तीमुळे मोहासमोर पहिली फेरी बाद तर झालोच पण आता क्रोधानेही दुसऱ्या फेरीत मला नॉकआऊट केल्याचं लक्षात आलं. अशाप्रकारे दिवसभरात अगणित वेळा षडरिपूंनी एकदम वेगवेगळ्या कारणांमुळे डोकं वर काढलं आणि मी त्या सहाही बलवान शत्रूंपुढे सपशेल माघार घेऊन शरणागत झालो. बरं ज्या काही थोड्या प्रसंगी म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विनोदावर खळखळून न हसता स्थितप्रज्ञ जितका स्माईल देईल तितकंच देणं, किंवा समोर आलेल्या कांदाभजीला ते सात्विक अन्न नाही म्हंणून नकार देणं वगैरे वगैरे ज्या काही क्षुल्लक लुटुपुटूच्या लढाया जिंकलो त्यात कणभर स्थितप्रज्ञ झाल्यासारखं वाटलं खरं पण त्या प्रयत्नांत जीवन जगण्याचा चार्मच गेला. स्थितप्रज्ञ होण्यासाठी कांदाभजीचं ‘बलिदान’ द्यायला लागणार असेल तर अशी अळणी स्थितप्रज्ञता नसलेली बरी असाही एक विचार मनाला चाटून गेला. ‘स्थितप्रज्ञ होणे’ हे सोपं नक्कीच नाही हे मात्र या सगळ्या प्रयोगाअंती लक्षात आलं आणि एकंदरीतच माझ्या मनाची मौज मजा घेण्याची जडण घडण पाहता या जन्मातच काय पण पुढच्या शेकडो जन्मात स्थितप्रज्ञलक्षणं अंगी बाणतील ही शक्यता बरीच धूसर व्हायला लागली. ‘स्थितप्रज्ञ’ जन्माला यावा लागतो ते माझ्यासारख्या ‘येरागबाळ्याचे काम नोहे’ असं तत्वज्ञान शेवटी स्वतःला समजावून गप्प झालो.

मध्ये बरेच दिवस गेले. एक दिवस मी माझ्या एका तत्वज्ञानी मार्गदर्शक स्नेही ( Friend, Philosopher Guide) यांच्याशी बोलत होतो. विषय भगवद्गीता, अष्टांग योग आणि जीवनातील ताण तणाव यांच्यावरील उपाय म्हणून त्यांचा उपयोग यावर आला. ते म्हणाले प्रत्येक माणसाची रबरबँड सारखी एक स्वस्थ स्थिती असते. अशी स्थिती की त्यात मनुष्य हा शारीरिक मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीने ताणविरहित असतो. जेव्हा जेव्हा मनुष्यावर ताण असतो त्या त्यावेळी तो रबरबँड ताणतो तसा ताणला जातो. माणसाचं कौशल्य हे या ताणलेल्या स्थितीतून लवकरात लवकर बाहेर येऊन आपल्या रबरबँडच्या स्वाभाविक स्वस्थ स्थितीत कसं येता येईल यात असतं आणि अष्टांगयोग हा यासाठी परिणामकारक उपाय ठरतो.
माझ्या डोक्यात वीज चमकली आणि स्वच्छ प्रकाश पडला. माझा स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयोग आठवला. त्यात मनाची उडालेली त्रेधातिरपीट आणि संकल्पाची उडालेली दैना आठवली आणि मी स्वतःशीच हसलो.

लक्षात आलं की स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी स्थिर झाली आहे असा. म्हणजेच ते म्हणाले त्याप्रमाणे रबरबँड सारखा. त्या सहज स्थितीत असणारा. म्हणजेच वर्णन केलेली सुखदुःख विरहित स्वानंद स्थिती. स्वतःचं निरीक्षण बारकाईनं केलं तर मी दिवासभरातले काही क्षण तरी त्या स्थितीत असतो असं लक्षात आलं. आणि तीच स्थिती जाणीवपूर्वक सतत राखण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच स्थितप्रज्ञतेचा अभ्यास हेही लक्षात आलं.

या रबरबँड संकल्पनेचा स्थितप्रज्ञतेच्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या त्या स्नेह्यांनी लक्षात आणून दिलेल्या एका गोष्टीने मनाला दिलासा दिला. ती गोष्ट अशी की विकारांना जरी षड्रिपू म्हटलेलं असलं तरी ज्या अर्थी ते भगवंताने माणसाला दिलेले आहेत त्या अर्थी त्यांचंही सृष्टीरचनेच्या दृष्टीने आणि जीवनात आनंद घेण्याच्या दृष्टीने आपलं एक महत्वाचं स्थान आहे. काम नसेल तर पुढची सुदृढ सुसंकृत पिढी तयार कशी होईल? क्रोध नसेल तर अन्याय, आततायीपणा याविरुद्ध माणूस कसा लढेल? मोह नसेल तर आधी दुसऱ्या मानवावर आणि नंतर भगवंतावर प्रेम करायला कसं शिकेल? मद नसेल तर सात्विक स्वाभिमान स्वत्व कसं राहील? मत्सर नसेल तर सात्विक चढाओढ करून स्वतःची प्रगती कशी करता येईल? आणि द्वेष नसेल तर वाईट टाकून देण्याची इच्छा कशी निर्माण होईल? त्यामुळे ह्या विकारांचं जर अतिसेवन झालं, त्यांच्या आहारी गेलं तरच ते रिपू ठरतात पण प्रमाणात आणि सात्विक वृत्तीने ते अनुभवले तर उलट जीवनात आनंद निर्माण करतात. आणि हा मोठा दिलासा आहे.
आता प्रश्न असा उरतो की या विकारांवर बांध कसा आणणार? तर अशावेळी रबरबँड संकल्पनेचा उपयोग होईल असं मला वाटलं. अभ्यासाच्या सुरुवातीस साहजिकच मनाचा रबरबँड क्षणाक्षणाला सारखाच ताणला जातोय हे लक्षात आलं. पण मग जाणीवपूर्वक स्वतःच्याच मनाला मित्रत्वाच्या नात्याने समजावून त्या काम, क्रोध, मोह, द्वेष, मद, मत्सर या भावनांमधून लवकरात लवकर बाहेर काढून शांत व्हायला शिकवायला लागलो.
थोडा अधिक अभ्यास झाल्यावर असं लक्षात यायला लागलं की हळूहळू विकारांना उद्दीपित करणाऱ्या वस्तूंचा परिणाम मनावर कमी होऊ लागला आहे. किंवा मन रबरबँडच्या स्वस्थ स्थितीत लवकर आणता येऊ लागलं आहे. त्यामुळे सकाळी चहा मिळाला तर आनंद होतो पण मिळाला नाहीं तर दुःख किंवा चिडचिड होत नाही. एखादी व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली तर बरं वाटत पण नाही वागली तर राग येत नाही. अशी स्थिती साधारण सगळ्याच विकारांच्या बाबतीत यायला लागली आहे असा अनुभव आला. म्हणजे जीवनाचा आनंद तर मिळतो पण अपेक्षाभंग आणि त्यातून दुःख होण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं हे लक्षात येऊ लागलं. आणि हेच या सगळ्या प्रयत्नांचं उद्दिष्ट नाही का ?

आता पावसाळ्यात कांदाभजी तितक्याच मनमुरादपणे आनंदात खाता येतात पण ती नसतील तरी त्याहीशिवाय नुसत्या पावसाचाही आनंद आता तितकाच घेता येतो. लोकांच्या गलक्यात चेष्टा मस्करी, मौज मजा करून आनंद लुटता येतो, खळखळून हसता येतं, पण एकटा असतानाही तितक्याच आनंदात राहता येतं.

रबरबँड संकल्पना जीवनात आल्यावर ‘स्थितप्रज्ञ होणं’ ही अतिशय कठीण गोष्ट असली तरी अशक्य नाही आणि अभ्यासाने हळू हळू का होईना ती साधता येउ शकेल हे लक्षात येऊन मनाच्या रबरबँडवरचा थोडा तरी ताण कमी झाला हे नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *