बुद्धिबळ हा खूप गमतीशीर खेळ आहे. हालचालीला केवळ ६४ घरं. वेगवेगळ्या स्वभावाची म्हणजेच चालीची ३२ प्यादी. त्यात एक वजीर आणि एक राजा. ६४ घरं पण दोनच रंगांची. घर एक तर काळं तरी नाहीतर पांढरं तरी. बुद्धिबळ खेळताना पहिल्या चालीपासून सावध असायला लागत कारण एक चाल, एक निर्णय चुकीचा घेतला आणि समोरचा चाणाक्ष असला की जी घसरण सुरु होते ती थांबते फक्त आपला चेक मेट होऊन.
बुद्धिबळाकडे पाहताना एक लक्षात आलं की भय आणि लालसेच्या काळ्या आणि पांढऱ्या आयुष्यपटावर आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि चालींच्या प्याद्यांबरोबर अगदी पहिल्या चालीपासून आयुष्याचा बुद्धिबळाचा डाव मांडलेला असतो. कधी प्यादी भयाच्या काळ्या घरात असतील किंवा कधी लालसेच्या पांढऱ्या घरात. मनुष्य याच दोन भावनांनी खेळवला जातो. मॅनॅजमेन्ट च्या भाषेतच सांगायचं झालं तर माणसावर एक तर गाजर (carrot) तरी काम करतं किंवा काठी (stick) तरी. अरे एवढंच काय अगदी श्री. सत्यनारायणाच्या कथेत सुद्धा अंगध्वज राजा असो, मोळीविक्या असो, तो गवळी असो, साधुवाणी असो किंवा साधुवाण्याचे जावई, बायको किंवा मुलगी असो, सगळे संतती, संपत्ती, यशाच्या लालसेने तरी श्री सत्यनारायणाला शरण जातात किंवा नौका बुडण्याचा भयाने तरी..
एकूण काय तर भय आणि लालसा ह्या दोनच भावनांवर आयुष्याचा बुद्धिबळाचा पट मांडलेला असतो. तिसरी भावनाच नाही. षड्रिपू सुद्धा याच दोन पैकी कुठल्यातरी खान्यात अगदी फिट्ट बसतात. एक एक घर पुढ चालणारं प्यादं असो, तिरकस उंट असो, सरळसोट हत्ती असो, दुडक्या चालीचा घोडा असो, किंवा मनमानी करणारा वजीर असो त्यांना चालायचंय ते भय-लालसेच्या काळ्या किंवा पांढऱ्या घरातच. अशावेळी प्रश्न एवढाच असतो की आपल्या चाली रचायच्या त्या आजूबाजूच्या प्याद्यांना भयानी खेळवण्यासाठी की लालसेने.
या सगळ्यात सर्वात गम्मत म्हणजे राजा म्हणवणारा सर्वात कमकुवत, एकंच घर चालणारा, दुसऱ्या प्याद्यांवर संरक्षणासाठी अवलंबून असलेला, कॅसलिंग ची वाट पाहणारा अगदीच हतबल. संपूर्ण डावात पळत पळत, चेक्स हुकवत दमून भागून सगळे उपाय थकले की चेकमेट मान्य करणारा आणि पुढच्या डावाला पुन्हा एकदा सज्ज होणारा, त्याच जोमानं.
आपला जीवात्मा असाच. या भय लालसेच्या पटावर षड्रिपूंयुक्त प्याद्यांच्या संगतीत, प्रत्येक नवीन जन्माचा नवीन डाव त्याच उत्साहाने मांडत, प्रारब्धाने सतत टाकलेले चेक्स हुकवत त्या जन्मातल्या आजूबाजूच्या सुहृदांच्या प्याद्यांपासून संरक्षण मागत मागत, थकून भागून शेवटी प्रत्येक जन्माच्या अंती चेकमेट मान्य करत राहणारा. डावात काय चुकलं याचा लेखाजोखा संचिताच्या बॅलन्सशीट मध्ये टाकून पुढच्या डावात चूक सुधारू या आशेवर पुढचा डाव मांडायची तयारी करणारा… किती जन्म ? भय लालसे चा पट मोडून मुक्ती मिळेपर्यंत..
पण एक प्रश्न मात्र सतावतोच की जीवात्मा असो किंवा बुद्धिबळाचा राजा, इतक्या हतबल प्याद्याला राजा का म्हटलं असेल?



