
कोणी जर कधी आपल्याला सांगितलं की कुणी आपल्याबरोबर २४ तास राहतं. त्याच्या इच्छेनुसार आपल्याला नाचवतं पण असं असूनही आपली त्याच्याशी फारशी ओळख नसते तर खरं वाटेल? अहंकाराचं तसंच नाही का?
खूप ऐकत आलोय या अहंकाराबद्दल. प्रत्येक जागृत क्षणी आपला अहंकार एक तर सुखावत असतो किंवा दुखावत असतो. पण हा अहंकार म्हणजे नक्की आहे तरी काय? याचा विचार कधी शांतपणे होतंच नाही. केवळ अहंकार सुखावल्यावर मिळणारं सुख आणि दुखावल्यावर होणारं दुःख यांच्या हिंदोळ्यावर अख्ख आयुष्य दोलायमान अवस्थेत व्यतीत होतं. गम्मत अशी आहे की या अहंकाराला एक ‘मन’ नावाचा मित्र खूप खट्याळपणे साथ करतो आणि हे दोघे मिळून हा सुख दुःख्खाचा खेळ खेळत राहतात.
अहंकार सुखावतो म्हणजे नक्की काय होतं? आणि दुखावतो म्हणजे नक्की काय होतं ?. मन सुखावतं म्हणजे नक्की काय होतं ? मनाला दुःख होतं म्हणजे नक्की काय होतं?. पण या सुखदुःखाच्या जाणिवेनं अख्ख आयुष्य व्यापलेलं असतं हेही खरंच. मग अशा वेळी नक्की काय होतं हे न कळताच आपण सुख तरी कशाचं मानायचं आणि दुःख तरी कशाचं? शरीर सुख दुःखाची भानगड त्यामानाने कळायला सोपी. सरळ सरळ कार्यकारण भाव त्याला लागू पडतो. इंद्रियजन्य असल्यामुळे त्याचं परिमाणही सांगता येतं थोड्याफार प्रमाणात. चांगला पदार्थ खाण्याचं सुख एक वेळ वर्णन करता येईल कारण जीभ या अवयवाचा प्रत्यक्ष संबंध त्या अनुभवाशी आहे. पण माझा अपमान झाला म्हणून वाईट का वाटतं आणि वाईट नक्की कोणाला वाटतं हेच सांगता येत नाही ही पंचाईत नाही का? ही गोष्ट मनालाही लागू आणि अहंकारालाही.
ज्याची आपल्याशी इतकी ओळखच नाही अशा मनाच्या किंवा अहंकाराच्या सुख दुःखाशी आपण इतके निगडित असतो आणि आपलं सगळं भावविश्व आणि संपूर्ण आयुष्यं या दोन अनोळखी मंडळींवर अवलंबून असतं ही बाब सारासार विचारी म्हणवणाऱ्या माणसाच्या ध्यानात येत नाही ही गंमतच नाही का?
हे प्रश्न अर्जुनालाही पडले ते एक बरं झालं नाहीतर भगवंत आपल्याला थोडीच गीता सांगायला अवतरले असते..