हॅप्पी डेथ ऍनिव्हर्सरी – २३ जुलै २०१८

/ / marathi

मी सकाळी उठलो आणि माझं व्हाट्सअप उघडलं.  नेहेमीचे ‘गुड मॉर्निंग’ चे संदेश, सकाळ प्रसन्न करू पाहणारे आणि आपण अगदीच ‘गये गुजरे’ आहोत अस उगाच अध्यारुत धरून पाठवलेले ज्ञानगुटी मिश्रित संदेश, फुलाचे इंटरनेटवर फुकट उपलब्ध असणारे म्हणून ‘दिल खोलके’ पाठवलेले फुलांचे फोटो, देवाचे फोटो व अग्रेशित भक्तीसंदेश इत्यादी बरीच नित्याची प्रभातसफाई झाली.आणि माझं लक्ष गेलं एका ‘हॅपी डेथ ऍनिव्हर्सरी’ या संदेशाकडे आणि मी अवाक झालो. कुणाच्या तरी वार्षिक श्राद्धाचा तो संदेश कुणासाठीतरी एका ग्रुपवर टाकला होता. इच्छा असो नसो पण इतरांनी ‘विशेस’ दिल्यामुळे आठवलेल्या वाढदिवसाच्या संदेशांवर ‘उप्पर मेरा एक’ असे असणारे ‘हॅपी बद्दे’ चे  संदेश मी खूप वाचले आहेत आणि पाठवलेही आहेत. (बरं ‘बर्थ डे’ असा घवघवीत शुद्ध मराठीत उच्चार केला तर कंडम माणूस समजतात हल्ली बरं का !…सुशिक्षित माणूस म्हणून समाजात स्थान मिळायला ‘गुद्दे’ या उच्चाराशी मिळताजुळता ‘बद्दे’ असा बोबडा उच्चभ्रू उच्चारच करावा लागतो. असो !!…) तर ‘हॅपी बद्दे’ पासून ते ‘हॅपी दसरा’, ‘हॅपी मकरसंक्रांत’, ‘हॅपी महाशिवरात्र’, ते अगदी आजच्या ‘हॅपी आषाढी एकादशी’ पर्यंतचे सगळे मानसिक धक्के मी ‘कालाय तस्मै नमः’ या वर्गीकरणात टाकून पचवले. पण ‘हॅपी डेथ ऍनिव्हर्सरी’ च्या हल्ल्याने माझा पूर्ण हिरोशिमा झाला. मला हसू का रडू हे कळेनासं झालं. एका लग्नात नवविवाहित जोडप्याला एका महानुभवाने ‘मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे’ अशा ‘विशेस’ दिल्यावर माझीच आंतरिक कुचंबणा सर्वाधिक झाली आणि त्यावर खळखळून हसत ‘थँक्स’ म्हणणाऱ्या त्या वधुवरांचे तर जाहीररित्या पाय पकडावे असा एक मानसिक आवेग मी कसाबसा मागे सारला.

प्रसंगातील गमतीचा भाग एकवेळ दुर्लक्षित केला तरी आपण इंग्रजीचं अंधानुकरण किती हद्दीपर्यंत नेलं आहे याची ही एक अंतर्मुख करणारी चुणूक होती. एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून घेऊन त्याचा योग्य शब्दात  वापर करण्याची इच्छा ठेवून अचूकतेची कास धरण्याची का मानसिकता नाही? वाढदिवस, दसरा , दिवाळी, महाशिवरात्र, आषाढी एकादशी आणि श्राद्ध या सगळ्यांनाच ‘हॅपी’ च्या ‘विशेस’ देणार आपण?
शुभेच्छांची योग्यायोग्यता शुभेच्छांचं गांभीर्य, त्यातील अर्थ, त्याची कारणमीमांसा समजून कधी घेणार आपण? की सगळंच जसं हलकेपणाने घेतलं जातंय तसंच चालू ठेवणार आपण ?

मराठी भाषेचा ऱ्हास हा काही नवीन विषय नाही आणि त्याची कारणमिमांसा करण्याची माझी योग्यताही नाही आणि अधिकारही नाही पण माझ्यापुरती माझ्या संदर्भाने ही अचूकता राखण्याचा प्रयत्न करणे आणि जेव्हा जेव्हा असं काहीतरी समाजमाध्यमांवर वाचायला मिळेल तेव्हा असं करणाऱ्याला त्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी मी नक्कीच पार पाडू शकतो. त्या विषयी जागृतता आणू शकतो आणि ‘मराठी वाचवा संस्कृती वाचवा’ या मोहिमेत माझा खारीचा वाटा तरी उचलूच शकतो. नाही का ?

असो. ‘हॅपी रिडींग’ अशा ‘विशेस’ देऊन मी माझं ‘हॅपी रायटिंग’ इथेच थांबवलेलं बरं !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *