
मध्यंतरी एका स्नेह्यांच्या घरी श्रीसत्यनारायणाच्या पूजेला दर्शनाला जाण्याचा योग आला. उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक टुमदार फ्लॅट होता
त्यांचा. श्रीसत्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि लगेच हातावर छानपैकी केशर घातलेल्या आटवलेल्या दुधाचं तीर्थ मिळालं. तीर्थामागे प्रसाद
येईल याची मी वाट पाहत होतो पण काही हालचाल दिसेना म्हणून मुकाट्याने जागेवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात एका छान चुटचुटीत
प्लॅस्टिकचा बॉक्स हाती आला. त्यात श्री सत्यनारायणाच्या प्रसादाची शिऱ्याची मूद, एक कचोरी, थोडासा चिवडा, एक पेढा असा नीटस
साजरागोजरा ‘प्रसादबॉक्स’; हातात मिळाला. मीही तो छानसा प्रसादबॉक्स हाती देणाऱ्या व्यक्तीला ‘थँक यु’ म्हटलं आणि चुपचाप जसा
परीटघडीत गेलो त्याच परीटघडीत घरी परत आलो. एका कॉर्पोरेट मीटिंगला जाऊन सूटबूट घालणाऱ्या एखाद्या दिग्गजाला भेटून
आल्यासारखं वाटलं या श्री सत्यनारायणाचं दर्शन घेऊन.
अशावेळी मला आठवला माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत दर वर्षी सत्यनारायणाची पूजा होत असे तो प्रसंग. त्या गल्लीच्या आजूबाजूने
राहणारे सर्व प्रकारचे अठरापगड जाती धर्माचे लोक त्या पूजेत उत्साहाने भाग घेत असत. साधारणतः रविवारी सुटीचा वार बघून ती पूजा
गल्लीत एका कोपऱ्यात मंडप घालून केली जायची. मोहल्ल्यात नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याचा सत्यनारायणाच्या पूजेचा मान
असायचा. सकाळी होणारी सगळी पूजा माईकवर मोठे कर्णे लावून सर्वांना ऐकवलीही जायची. गल्लीची पूजाकमिटी पूजेला कुठले गुरुजी
बोलवायचे कुणास ठाऊक पण श्रीसत्यनारायणाच्या पूजेत रामरक्षा आणि शुभंकरोती वगैरे श्लोकपण अगदी निधड्या छातीने ते गुरुजी
ऐकवायचे. आणि या बद्दल मोहल्ल्यातील कुणी फारसं मनाला लावून घेतल्याचंही ऐकिवात नाही. एकंदरीत श्लोकासारखं वाटणारं आणि
संस्कृतसारखं भासणारं असं काहीतरी साधारण तासभर कानी पडलं की पूजा यथासांग पार पडली याचं समाधान सगळ्यांच्या मुखावर
असायचं. गम्मत म्हणजे या पूजपद्धतीत अजून फार गुणात्मक बदल न होता ही परंपरा अजूनही सुरू आहे. पूजेनंतर माइकवरूनच
श्रीसत्यनारायण कथाही मनोभावे ऐकवली जायची. त्यानिमित्ताने अंगध्वज राजा, साधुवाणी, त्याची बायको, मुलगी, जावई, तो गवळी,
मोळीविक्या इत्यादी नेहेमीच्या मंडळींचं स्नेहसंमेलन झालं की एक वार्षिक सत्कर्माचा रकाना भरला जायचा. पूजा झाल्यावर ‘ही ऐक
सत्यनारायणाची कथा’ हे गाणं मग तेच कर्णे लावून दिवसभर ऐकवलं जायचं.
आम्हा मुलांना या सत्कर्मात आणि पुण्य जमवण्याच्या कार्यक्रमात फारसा रस नसे. आमचं सगळं लक्ष श्रीसत्यनारायण पूजा सुफळ संपूर्ण
झाली की नंतर हाती पडणाऱ्या छानश्या साजूक शिऱ्यात आणि नंतर दिवसभर निमित्ता निमित्ताने हाती पडणाऱ्या गोङ बुंदीत किंवा
साखरफुटाण्यात असायचं. त्या ओंजळभर फुकट मिळणाऱ्या शिऱ्याची, बुंदीच्या पाकळ्यांची किंवा त्या पांढऱ्या शुभ्र दातेरी साखरफुटाण्यांची
किंमत सांगूनही कळणार नाही. वेगवेगळ्या वेळी वेगळ्या माणसांकडून शिताफीने मिळवलेल्या बुंदीच्या पाकळ्या किंवा साखरफुटाणे
अधिक कुणाला मिळाले याचा मग हिशोब व्हायचा आणि सर्वात ज्यास्त बुंदीच्या पाकळ्या, किंवा साखरफुटाणे हस्तगत करणाऱ्याला
मुलामुलांमध्येच ‘मॅन ऑफ द मॅच’ सारखा ‘मॅन ऑफ द पूजा’ वगैरे असा पुरस्कार प्रदान सोहळाही होत असे. या प्रसादात मिळणाऱ्या
शिऱ्यापेक्षा आणि बुंदी, फुटाण्यापेक्षाही एका गोष्टीचं खूप अप्रूप असायचं ते म्हणजे रात्री गल्लीच्या मधोमध उभारलेल्या पांढऱ्या पडद्यावर
दिसणाऱ्या रंगीत सिनेमाचं. आम्ही मुलंच नाही तर सगळ्या गल्लीतल्या आजूबाजूच्या घरातले उतरायचे सिनेमा बघायला. टीव्ही सेट घरात
असणं हे श्रीमंती चोजले समजले जायचे असे ते दिवस. संध्याकाळी केवळ तीन तास कृष्णधवल दूरदर्शन दाखवलं जायचं त्यावेळी. आणि
त्या तीन तासात त्याच बातम्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत दाखवल्या जायच्या. माझे आजोबा त्याच दहा मिनिटांच्या बातम्या तीनवेळा
इतक्या इंटरेस्टने कसे पाहू शकायचे हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. तर या तीन वेळच्या बातम्या, आमची माती आमची माणसं,
आकाशानंदांचं ज्ञानदीप, इत्यादी कार्यक्रम आणि बऱ्याचवेळेला दाखवला जाणारा ‘व्यत्ययाबद्दल दिलगीर आहोत’ हा कार्यक्रम यातच
सगळा वेळ संपून जायचा. एकंदरीतच दूरदर्शनचं ‘करमणूक’ शब्दाशी फारसं घेणं देणं नसायचं आणि म्हणूनच गल्लीतल्या त्या पांढऱ्या
पडद्यावरच्या रंगीत सिनेमाला एक वेळगं महत्व असायचं. आणि त्यात तो फुकट पाहायला मिळत असल्यामुळे तो पर्वकाळ लहानांपासून
मोठ्यांपर्यंत सगळेच साधायचे. रात्री नवाला सुरु होणाऱ्या सिनेमासाठी मोक्याची जागा पकडायला आणि आपल्या घरच्यांसाठी जागा राखून
ठेवायला आम्ही मुलं सहा, सात वाजल्यापासून तिथे ठिय्या मारून बसलेली असायचो. अमिताभ बच्चनचे ‘आखरी रास्ता’, ‘अमर अकबर
ऍंथोनी’, जंजीर, दिवार, असे सगळे सिनेमे गल्लीच्या बाजूच्या एखाद्या कठड्यावर, किंवा रस्त्यावरती चपलेवर नाहीतर विटेवर प्लॅस्टिकची
पिशवी टाकून त्यावर आमची ‘तशरीफ ठेऊन’ मी पहिले आहेत. त्या अवघडलेल्या स्थितीत बसल्यामुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी शाळेत
बाकावर बसलं तरी आमची ‘तशरीफ’ दुखायची हा भाग वेगळा पण त्या वेदनेपेक्षा त्या सिनेमाची स्टोरी मित्रांना अभिमानाने सांगण्यात जी
मजा यायची त्याची खुमारी काही औरच होती.
प्रसंग श्रीसत्यनारायण पूजेचा असो, गणपतीउत्सवाचा असो, नवरात्रातील गरब्याचा असो किंवा ख्रिसमसचा असो. सणसमारंभ कुठलाही
असला तरी समाजाच्या एकसंध वस्त्राचा एक घटक असल्यासारखं वाटायचं. लोक एकमेकांशी भांडायचेही मनापासून आणि मदतही
करायचे मनापासून आणि थट्टामस्करीही करायचे खुलेपणाने. श्री सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त दाखवलेला सिनेमाही रस्त्यावर पाहत
असूनसुद्धा तो एक कौटुंबिक सोहळा असायचा आणि एकप्रकारचा सामाजिक सोज्वळपणा जाणवायचा मला त्यात. पण आता घरातला
सत्यनारायण सुटाबुटात आणि सार्वजनिक सत्यनारायण डीजे मध्ये हरवून गेला आहे असं मला वाटत. सत्यनारायण असो
गणपतीविसर्जन असो किंवा इतर कुठलाही समारंभ असो, खूप मोठया आवाजात, खूप वाद्यमेळ असणारी आणि कधीकधी सभ्यतेचा परीघ
ओलांडणारी गाणी स्पीकरच्या भिंतीतून कान दुखेपर्यंत रात्रभर सगळ्यांची रात्रीची झोप बिघडवून, कुणाचीही पर्वा न करता ऐकणे आणि
बरोबर विचित्र हावभाव करत बेधुंद होऊन नाचणं म्हणजे सण साजरा करणं हा समज आपल्या समाजात कसा आणि कधी पसरला हे
लक्षातच आलं नाही कुणाच्या. सत्यनारायणाच्या तिर्थप्रासादाची जागा एका वेगळ्याच अर्थाच्या तीर्थप्रसादाने घेतली. ज्या वागण्याची शरम
वाटायला पाहिजे ती गोष्ट कौतुकाने चारचौघात अभिमानाने सांगण्यात कुठला अहं सुखावला जातो कोण जाणे पण हा समाजाच्या
मानसिकतेमधला बदल इतका जलद झाला की आता तो समाजस्वभावाच झाल्यासारखा झाला आहे.
समाजमन बदलण्यासाठी विभूती जन्माला याव्या लागतात पण एक सर्वसामान्य सामाजिक घटक म्हणून मी काय करू शकतो असा विचार
करता लक्षात आलं की मी समविचारी मंडळी शोधू शकतो, त्यांच्याशी माझं मन या अशा लेखांमधून मोकळं करू शकतो. या प्रक्रियेत भेटले
समविचारी तर एक हाताला दुसरा हात जोडून एक शृंखला तयार होऊ शकेल जी त्या जोडलेल्या हातांना तरी पुरेसं मानसिक बळ देऊ शकेल
आणि न जाणो यातूनच समाज घडवण्यासाठी एक व्यक्तीऐवजी एक सात्विक समाजपुरुषच जन्माला येऊ शकेल.