
मला काही दिवसांपूर्वी कलासंदर्भातील एका व्हाट्सअप गटाचा सदस्य करण्यात आलं. त्या गटातील सर्व सदस्यांच्या अंगातील सर्व सुप्त कला बाहेर याव्या आणि इतरांनाही त्याचा आनंद मिळावा हा त्यामागचा त्या गटनियंत्याच्या मनातील प्रामाणिक मनसुबा होता. त्याने मलाही त्या गटात सामील करून घेतलं. माझं लिखाण किंवा माझ्या संवादिनीवादनाच्या वा इतरही पोस्ट तिथे मी टाकाव्या अशी त्याने मला विनंती केली. मी मान्यता दिली. त्या गटनियंत्याने मला त्या गटात सामील केलं मात्र, आणि माझ्या व्हाट्सऍपची निर्देशघंटी ( सद्यमराठीत नोटिफिकेशन अलर्ट) थांबता थांबेना. मी जाऊन बघतो तर त्या गटात मला समाविष्ट करून घेतला गेल्यानंतरच्या तासाभरात त्या गटातील संदेशांनी माझा व्हाट्सअप दुथडी भरून वाहू लागला होता. त्यातील काही संदेश म्हणजे गटातील साहित्यिकातील काव्यशिल्प होती. त्या कवितांमधील बऱ्याचशा स्वरचित, आणि त्यातील काहीच सुरचित होत्या. शिवाय काही लेख, काही सभासदांच्या स्वतःच्या कार्यक्रमांची जाहिरात, पोस्टर्स असा साधारण दुथडी भरून वाहणाऱ्या त्या गटगंगेतील मजकूर होता.
बरं ! या गटातील या सगळ्या संदेशशृंखलेत एक विशेष ढाचा होता. उदाहरणार्थ अगोदर एखाद्या जागृत सभासदाची (जे साधारण एकूण गटसंख्येच्या पाच ते दहा टक्के असतात.) एखादी कवितेची किंवा तत्सम कुठलीतरी पोस्ट. त्यावर इतर जागृत सभासदांच्या स्तुतीसुमानांचा वर्षाव आणि त्या प्रत्येक स्तुतीसुमनाला अत्यंत विनयपूर्वक दिलेली मूळ पोस्टकर्त्याची पोचपावती अशी ती पोस्टशृंखला होती आणि या प्रत्येक संदेशासाठी मात्र माझ्या मोबाईलची निर्देशघंटी प्रत्येक वेळी वाजत होती. अर्थात ही सगळी देवाण घेवाण गटातील जागृतावस्थेतील उत्साही दहा टक्के सभासदांमध्येच सुरू होती. बाकीचे सभासद त्या गटाच्या दृष्टीने सुप्तावस्थेत, सुस्तावस्थेत, मृतावस्थेत किंवा त्याहीपलीकडे म्हणजे अवस्थात्रयातीत होते.
या सगळ्या संदेशशृंखलेसंदर्भात माझं अजून एक निरीक्षण म्हणजे एखादी मूळ पोस्ट आणि त्यावरील उधळल्या जाणाऱ्या स्तुतीसुमनांमध्येही एक विशिष्ट तऱ्हा होती. साधारण ज्या सभासदाला आपल्या स्वतःच्या पोस्टला लोकांनी चांगलं म्हणावं असं वाटत होतं तो इतर सर्व जागृत सभासदांच्या पोस्टचं भारी कौतुक करत होता. किंवा असंही म्हणूया की कर्मसिद्धांताचा परिणामही असेल कदाचित पण जो बाकीच्यांच्या पोस्टचं भरभरून कौतुक करत होता त्याच्या पोस्टला इतर सभासदांचं भारी कौतुक मिळत होतं. या सगळ्याची परिणती म्हणजे ‘अहो रुपम अहो ध्वनिम्’. बरं कौतुक म्हणावं तर ते सुद्धा अद्वितीय, अप्रतिम, अवर्णनीय इत्यादी एकशब्दीय. ते शब्दही त्यांचे अर्थ आणि त्यांचा आवका लक्षात न घेताच वापरलेले गेलेले.
हल्ली तसंही वारेमाप कौतुक करण्यासाठी भारी शब्द वापरण्याची पद्धत सुरू झाली आहे. एक दोन उदाहरणं लगेच आठवली एकदा एका गल्लीतील कपोऱ्यातल्या गणेशोत्सवात फुटकळ वर्गणी तीही जबरदस्तीने गोळा करून आणणाऱ्या त्या मंडळाच्या म्होरक्याच्या नावाआधी ‘समाजातील लोकप्रिय कार्यसम्राट आणि जाज्वल्य युवा नेतृत्व’ असं लिहून वर त्याचा गॉगल घालून हात उभारलेल्या पोझ मध्ये फोटो लावला होता आणि खाली मित्रमंडळातील इतर डझनभर शुभेच्छुकांचे फोटो छापून तो फ्लेक्स त्या गणपतीच्या मंडपाच्या बाहेर असणाऱ्या मोठ्या कमानीवर टांगलेला होता. दुसरं उदाहरण म्हणजे कुठल्याही दूरचित्रवाणीच्या वाहिनीवर ( सद्यमराठीत टीव्हीचॅनल) एखाद्या रिऍलिटी शोमधलं (हा हल्लीच निर्माण झालेला मराठीच शब्द आहे) चाललेलं स्पर्धकांचं गुणगान, ब्लास्ट, अलिंगनं वगैरे वगैरे. एकंदरीतच कौतुकाच्या प्रमाणबद्धतेचा अभाव सगळीकडे जाणवतो आहे.
गटातील पोस्टवर वाहिली जाणारी अद्वितीय, अप्रतिम, अवर्णनीय इत्यादी एकशब्दीय स्तुतीसुमनं त्या मूळ पोस्टकर्त्याला तात्पुरती खूप सुखावून जातात पण त्याचा अर्थ केवळ ‘तुझी पोस्ट मी पहिली आहे’ (पूर्ण वाचलेलीही नसते बऱ्याच वेळा !) इतकाच घ्यायचा असतो हे आपणही लोकांच्या केलेल्या अशाच कौतुकाला स्मरून त्या पोस्टकर्त्याला लक्षात कसं येत नाही याचं आश्चर्य वाटतं. बरं ! गटातील कुणी एखादा आपलं परखड मत मांडतोय, विचारपूर्वक रसग्रहण करतोय, काही सुधारणा सुचवतोय, वेगळा विचार मांडतोय असं होताना क्वचित दिसतं आणि जेव्हा कुणी एखादा असं करतो त्यावेळी , ‘शहाणा समजतो स्वतः ला’ असा शिक्का मारून त्या गटात अशा माणसाला वाळीत टाकलं जातं. (मी बऱ्याच गटात असाच वाळीत पडलेला गटस्थ आहे हे इथे प्रामाणिकपणे नमूद करतो) बरं एकमेकांत केलेल्या या स्तुतीसुमानांच्या एक्सचेंजमुळे अहंकार(सद्यमराठीत ‘इगो’) सुखवण्यापालिकडे काय मिळवलं जातं?
या गटाच्या निमित्ताने मला समाजातील होत असणारा एक बदल प्रकर्षाने जाणवला. ‘कुणाला का दुखवा?’ किंवा तोंडावर कौतुक करून लोकांच्या सतत ‘गुड बुक्स’ मध्ये राहण्यासाठी चाललेला प्रयत्न मला हल्ली खूप जाणवत राहतो. म्हणूनच हल्ली परखड आणि अभ्यासपूर्ण नाट्यसमीक्षण, संगीतसमीक्षण, पुस्तकसमीक्षण, चित्रपटसमीक्षण इत्यादी, काही सन्मानानिय अपवाद वगळता, वाचायला मिळत नाही. समाजमाध्यमांमध्येही सध्या ‘लाईक्स’ ( हाही हल्ली मराठीच शब्द आहे) हेच लोकप्रियतेचं चलन आहे. ज्याला अधिक ‘लाईक्स’ तो अधिक श्रीमंत. कुणी पोस्ट लाईक केली नाही ( हल्लीचं मराठी) तर मित्रांत वैमनस्य आल्याच्या घटनाही कानावर आल्या आहेत. असो..
एखाद्या गोष्टीवर मला कुणी मत विचारलं तर मी प्रतिप्रश्न करतो की, “तुला छान वाटावं असं मत देऊ की खरं मत देऊ?’ या माझ्या प्रश्नामुळे बरेच फायदे होतात.
१. माझ्याकडून मत मागणाऱ्याच्या काय अपेक्षा आहेत ते कळतं.
२. मत मागणाऱ्याची त्याचं केवळ कौतुक होईल ही अपेक्षा नियंत्रित होते.
३. मी मत देताना प्रामाणिक राहू शकतो आणि म्हणून अभ्यासपूर्ण मत देण्याची माझी जबाबदारी वाढते.
४. माझ्या मताला आपोआप वजन प्राप्त होतं.
५. केवळ माझ्याकडून कौतुक व्हावं ही अपेक्षा बाळगून आलेला मला पुन्हा माझं ‘प्रामाणिक मत’ विचारत नाही.
मला वाटतं की ‘उगाच दुखवायच कशाला’ म्हणून केलेलं कौतुक किंवा राखलेलं मौन यापेक्षा प्रामाणिकपणे,अभ्यासपूर्ण आणि सौम्य शब्दात परखड मत मांडलं तर ते मत केवळ केवळ ‘स्तुतीची एक्सचेंज ऑफर’ या पुरतं मर्यादित न राहता माझा आणि दुसऱ्याचा वेळ, माझी आणि दुसऱ्याची शक्ती तर वाचतेच पण परस्पर संबंध वरवरचे न राहता अधिक अर्थपूर्ण होतात असं मला मनापासून वाटतं…