
मी ‘सोनी’ या जगद्मान्य कंपनीचे संस्थापक ‘अकिओ मोरिता’ यांचं “मेड इन जपान” हे पुस्तक वाचत होतो. दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण बेचिराख झालेल्या या देशात कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना ‘मासारु इबुका’ या सहसंस्थापकाबरोबर त्यांनी ‘सोनी’ सारखी कंपनी सुरु केली आणि नंतर ती जगाच्या पाठीवर एक बलाढ्य कंपनी म्हणून नावारूपाला आणली. पूर्वी “मेड इन जपान” ही ओळ म्हणजे सर्व जगासाठी हास्याचा विषय होता पण सोनी सारख्या कंपन्यांनी त्यांच्या मेहेनतीमुळे “मेड इन जपान” हीच ओळ आता उत्पादनाची गॅरेंटी म्हणून पाहायला जगाला भाग पाडलं आहे. अकिओ मोरितांना एकदा कोणी विचारलं की हे कसं शक्य झालं तेव्हा ते म्हणाले केवळ दोन शब्द, “दैनंदिन सुधारणा”. त्याच पुस्तकात दिल्याप्रमाणे जेव्हा सोनीचं एखादं उत्पादन बाजारात येत असे, त्याचवेळेला त्या उत्पादनाच्या पुढच्या आवृत्तीवर त्या अगोदरच प्रयोगशाळेत काम सुरु झालेलं असे. अनंत अडचणींवर मात करत आणि तोडगे काढत आज ती कंपनी संस्थापक निवर्तल्यानंतरही तितकीच बलाढ्य आहे ती केवळ एका तत्वावर “दैनंदिन सुधारणा”.
मनुष्याच्या बाबतीत काहीसं असंच नाही का? ईश्वराचं एक सर्वोत्तम उत्पादन म्हणजे माणूस. माणसांनी केलेल्या उत्पादनाच्या बाबतीत, ते उत्पादन निर्माण झालं, की त्यात फार बदल करता येत नाहीत आणि करायचे झालेच तर ते पुढच्या आवृत्तीत आणि ते सुद्धा उत्पादनकर्त्याकरवीच व्हावे लागतात. पण ईश्वराची कमाल बघा की त्यानी ‘माणूस’ नावाचं असं उत्पादन तयार केलं आहे की त्या उत्पादनालाच, स्वतःत बदल करून, आपलीच नवीन आवृत्ती निर्माण करण्याची ताकद आणि मुभा दोन्ही दिली आहे. एवढं करून भगवंत थांबले नाहीत. तर स्वतःचीच नवीन आवृत्ती कशी घडवायची याची प्रक्रियाही सांगितली आहे. कोणती ती प्रक्रिया?
उद्धरॆत् आत्मना आत्मानं न आत्मानम् अवसादयॆत् ।
आत्म एव हि आत्मनः बंधुः आत्म एव रिपुः आत्मनः ॥ गीता ६.५ ॥
भगवंत म्हणतात,
चित्त आत्म्यासी सुधारी तेच त्याला अंगिकारी ।
तोच आत्मा बद्ध होई रंगुनी विषयाविकारी ।
चित्त आत्म्याचा रिपु त्यानेच त्याचे मित्र व्हावे ।
कृष्ण ऐसे सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।
मग हा उद्धार होणार कसा? त्यावर असं लक्षात येतं की उद्धाराची सुरवात प्रथमतः लहान सुधारणांवरून होते. आणि “सुधारणा” बाबतीत थोडा अधिक खोलवर विचार केला तर त्यात ‘चुकांची दुरुस्तीं या भावनेपेक्षाही चांगल्या (सु) गोष्टींची धारणा सु-धारणा असा गर्भितार्थ दिसून येतो. मग अशी शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक दैनंदिन सु-धारणा माणूस वर्षानुवर्षे करत राहिला की मग माणसाचा उत्कर्ष होतो आणि असा उत्कर्ष पिढ्यानुपिढ्या होत राहिला की माणसाची उत्क्रांती होते.
डार्विन ने मांडलेल्या उत्क्रांतीवादात माकडाचा माणूस झाला असं मानलं जातं. ते खरं असेलही कदाचित. पण भगवदगीतेत सांगितलेल्या उत्क्रांतीवादात मानवाचा महामानव आणि पुढे महामानवाचा महादेव होऊ शकतो हे मात्र नक्कीच खरं…