
माझे संवादिनीचे गुरू पं. मनोहर चिमोटे यांची काल 5 वी पुण्यतिथी. त्यांचं सही सही वर्णन म्हणता येईल असं सूर संगम चित्रपटातील गाणं मला आठवतंय. ते गाणं असं ;
साधो ऐसा ही गुरू भावे l
राग रंग के भर भर प्याले
पीये और पिलावे l
साधो ऐसा ही गुरू भावेl
नाद छुपा तन मे लय मनमे
कोई पता न पावे l
चाँद सुरजका लोचन गुरुका
देखे और दिखावे l
साधो ऐसा ही गुरू भावे l
परमहंस गुरू अंस रूप जब
हिरदय बीच बिराजे l
सात सुरोंकी बानी मेरी
ओंकार धून गावे l
साधो ऐसा ही गुरू भावे l
साधो ऐसा ही गुरू भावे l
माझे गुरुजी, माझे पंडितजी !!! काय आणि कसं वर्णन करू ? आपल्या गुरूंचं वर्णन करताना, स्वसंवेद्याचंही वर्णन करू शकणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द, त्यांनीच कथन केल्याप्रमाणे जिथे तोकडे पडले तिथे म्या पामरे काय बोलणार?
असं म्हणतात की गुरू वेगळे आणि सद्गुरू वेगळे. पण दोघांमध्ये एकच गुरुतत्व वास करतं हेही तितकंच खरं ना?
गुरुतत्वांबद्दल बोलण्याची ना माझी पात्रता ना पावित्र्य. पण एकाच भेटीत माझ्यातल्या स्वरनास्तिकाला स्वरशरणागत करण्याची माझ्या पंडितजींमधील गुरुतत्त्वाची ताकद मी ह्याची देही याची डोळा पहिली आहे, त्याची अनुभूती घेतली आहे.
पंडितजी संवादिनीजवळ बसले की एका अद्भुत विश्वात शिरायचे. त्यांचे डोळे सुरांचा शोध घेताना, त्यांच्यासमोर विनवणी करताना दिसायचे. आणि त्यांना एकदा का स्वर वश झाले की पंडितजी त्यांना सन्मानाने, प्रेमाने आपल्या हृदयसिंहासनावर बसवून त्यांची मानसपूजा मांडायचे. मग त्यांचा देह देव्हारा व्हायचा आणि त्यांची संवादिनी म्हणजे त्यांचं पूजा साहित्य. रागांच्या श्रुती स्मृती व्हायच्या आणि बंदीशीच्या ऋचा. मग वाद्याच्या श्वेत कृष्ण पट्ट्या रासलीला मांडायच्या आणि पंडितजींनी उभ्या केलेल्या स्वरांच्या या रसलीलेत आम्ही सर्व शिष्यमंडळी आकंठ न्हाऊन निघायचो. काळ थांबायचा, क्षण रावखुळायचे आणि वातावरणही निःशब्द व्हायचं. आम्ही शिष्यमंडळी पंडितजींनी त्या स्वरसमाधी अवस्थेत आमच्यावर केलेला स्वरप्रपात पचवायच्या परिस्थितीतही नसायचो आणि तिथे याप्रकारे “देता किती घेशील दो करांनी” अशी परिस्थिती असताना मी त्या स्वरांच्या धबधब्यांत माझ्या तोकड्या बुद्धीचं बुडकुलं घेऊन थोडे स्वरशिंतोडे साठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत उभा असायचो.
गुरू म्हणजे काय हो ? समर्थ रामदास माउलींनी श्रीमद दासबोधात गुरूंची तुलना सोनं, चिंतामणी, कामधेनू, कल्पवृक्ष इत्यादी सर्वांशी केली पण शेवटी कुणीच गुरूंच्या तुलनेत पासंगालाही पुरलं नाही. शेवटी गुरुंसारखे गुरूंच असा निवाडा झाला.
मला वाटतं शिक्षक हे विद्यार्थ्यांना विषय शिकवतात पण गुरू शिष्यांना विषय कसा शिकायचा हे शिकवतात. कारण शिकवण्याच्या कलेला अंत आहे पण शिकण्याची कला गुरुंसारखीच अनंत आहे…