समाजमाध्यमांवरील नागरिकशास्त्र – ९ जानेवारी २०१८

/ / marathi

काही दिवसांपूर्वी मला एका whatsapp ग्रुपमध्ये समाविष्ट केलं गेलं. खरं तर मी स्वतःहून त्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी
तशी इच्छा प्रदर्शित केली नव्हती. पण आपली इच्छा असो व नसो एखाद्या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार
ऍडमिन या सर्वशक्तिमान मानवाला whatsapp ने दिलेला आहे. तो अधिकार वापरून मला त्या ग्रुपमध्ये ऍडमिन नेे
समाविष्ट केलं. बरं केलं तर केलं त्यावर ग्रुपमध्ये पाळायचे कायदे कानूनही पाठवले. त्या कायद्यातील तरतुदी
वाचताना मी पासपोर्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट किंवा अमेरिकन काँस्युलेट मध्ये व्हिसा मागितला की काय असं वाटायला
लागलं. त्या ग्रुपचा नागरिक बनणं हा इतक्या सन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि तितकाच गुंतागुंतीचा प्रश्न असेल असं त्या
ग्रुपच्या नावावरून तरी वाटलं नव्हतं. आणि शेवटी तळटीपेत तर नियम न पाळणाऱ्याला ग्रुपमधून निष्कसित करू अशी
धमकी देखील दिली होती. खरं तर मी ग्रुप सोडूनच जाणार होतो पण स्वतःहून ग्रुप सोडून तिथून निघून जाणं म्हणजे
ज्या ​व्यक्तीने मला त्या ​तथाकथित ​अतिविशिष्ट ग्रुपमध्ये समाविष्ट केलं त्याची प्रतिष्ठा पणाला लावल्यासारखं झालं
असतं आणि त्या व्यक्तीला वाईट वाटलं असतं म्हणून तो ग्रुप न सोडण्याचा मी निर्णय घेतला.
Whatsapp वर मी जसा जसा अधिक काळ घालवू लागलो तसे मानवी मनाचे अनेक कंगोरे माझ्या लक्षात येऊ लागले.
​पहिला महत्वाचा मुद्दा ​लक्षात आला तो ​म्हणजे प्रत्येकाची दुसऱ्याला शिकवायची, ज्ञानगुटी पाजयची किंवा प्रवचन
देण्याची हौस खूप प्रमाणात भागायला लागली. जीवन म्हणजे काय, आयुष्याचा अर्थ काय हे समजून देण्याची स्पर्धा
​लागलेली असते जणू आता. सकाळी उठल्यावर ऐच्छिक किंवा अनैच्छिक रित्या समाविष्ट झालेल्या ग्रुपमध्ये साधारण
दीड दोनशे गुड मॉर्निंग नंतर सकाळचे सुविचार वाचून देहाच्या अंघोळीपूर्वीच मनाची सचैल अंघोळ होते. ​आणि मग
दिवसभरात एकंदरीतच​ जीवन कसं सुंदर आहे इथून ते ‘पूर्वीचे दिवस राहिले नाहीत आता’ या आशयाचे निश्वासपूर्ण
संदेश, असं सगळंच संदेशरूपाने पुढे येतं. बरं फुकट मिळत असल्यामुळे बहुदा पण या संदेशात, पुष्पगुछ, फुले, झेंडे,
हसणारे, रडणारे मुखवटे, थंप्सअप, हात जोडून नमस्कार, टाळ्या इत्यादी भावनाचिन्ह(emoticons) ​यांची रेलचेल
असते संदेशात.​"जगाला शहाणं करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" या बाण्याने
अनेक जीवनपथदर्शी सुभाषितवजा वैचारिक माणिक मोती यांची किती उधळण होते त्याची तर गणतीच नसते.
या सगळ्या संदेशात विनोदांपासून ते गोनिदांपर्यंत, राजकारणापासून समाजकरणापर्यंत, समाजातील वादांपासून
समाजवादापर्यंत आणि संतवाचनांपासून ते अश्लीलमार्तंडांच्या साहित्यापर्यंत काय काय समोर येईल त्याची शाश्वती
नसते. आपली सत्कर्म करायची भूक इथे विनामूल्य भागत असल्यामुळे ‘अपणासारखे करिती तात्काळ’ या संतवचनाला
जागून बरीच मंडळी त्यांना मिळालेले सात्विक संदेश तात्काळ अग्रेषित करतात आणि थोडं इ-पुण्य गाठीला बांधतात
असही दिसतं. एखादा संदेश दहा जणांना अग्रेषित केल्यास अगदी रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती प्रसन्न होतील
आणि नाही केला तर महाभयानक ब्रह्मराक्षसामुळे काहीतरी अरिष्ट तुमच्यावर कोसळेल या अर्थाचे काही संदेश ​गेले
काही वर्ष​ समाजमाध्यमांवर फिरत आहेत. मी कधीच असे संदेश अग्रेषित करत नाही. पण मला तरी अजून ब्रह्मराक्षस
भेटायचा आहे आणि एखादं अरिष्टही कोसळलेलं नाही अजून. एकदा ​प्रयोग करावा ​आणि अनुभव तरी घेऊन बघावा
म्हणून गमतीने मी एक असाच संदेश अगदी १० च नाही तर जवळजवळ ५० जवळच्या मित्रांना​ अग्रेषित केला. पण
नंतर श्रीमहागणपती ​प्रसन्न व्हायचा ते ​सोडाच पण ​मित्रांकडून असलं काहीतरी अंधश्रद्धा पसरवणारं पाठवल्याबद्दल
अनंत शिव्या खाण्याचं अरिष्ट नक्कीच ओढवलं माझ्यावर. बहुतेक संदेश अग्रेषित करण्याची कृती चुकली असणार
माझ्याकडून म्हणून उलट परिणाम झाला असावा. असो.
विनोदाचा भाग सोडून देऊ पण या सगळ्या संदेशकल्लोळात आणि संदेशवहनाच्या गदारोळात अनेक गोष्टींना
माझ्यासारखे समाजमाध्यमांवरील नागरिक बळी पडतात हे माझ्या लक्षात आलं आहे.

समाजमाध्यमांच्या संदर्भात माझ्या बाबतीत अजून एक घडलेली गमतीची गोष्ट म्हणजे माझे स्वतःचे लेख मला
वेगवेगळ्या whatsapp ग्रुपवर फिरून मलाच परत मिळाले. काही लेख तर मीच ते लिहिले आहेत का ? हा प्रश्न पडावा
इतके बदललेले होते. काही लेख लिहिलेला काही भाग वगळून मिळाले, काही कुणीतरी त्यात आपले विचार घालून
पाठवलेले होते. काही नावाशिवाय मिळाले काही दुसऱ्याच नावाने मिळाले.
​मला या ​गोष्टीची गम्मत वाटली आणि थोडं वैषम्यही. एखाद्याची कलाकृती जी मंडळी बदलतात, नाव गाळतात किंवा
स्वतःच्या नावावर खपवतात यांची मानसिकता काय असेल असाही विचार मनात येतो कधी कधी. आपण काही चुकीचं
करतोय, सांस्कृतिक गुन्हा करतोय असं मनात येताच नसेल का अशा व्यक्तींच्या?
याप्रमाणेच भारतीय माणसाच्या सहज कुणावरही विश्वास ठेवण्याच्या मानसिकतेमुळे काही प्रवृत्ती समाजमाध्यमांवर
बळावलेल्या माझ्या लक्षात आल्या. काही चुकीच्या बातम्या, काही चुकीचे संदेश, काही धर्मभावना चिथावणारे संदेश
सरसकट अग्रेषित केले जातात. या बातम्या आणि संदेश यांच्याखाली लिहिणाऱ्याचं नाव किंवा संपर्क क्रमांक नसतो.
भ्याड आणि विकृत मनोवृत्तीची माणसंच असं निनावी लिहितात असं मला ठामपणे वाटतं. आणि भावनेच्या भरात
आपणही अश्या अफवा किंवा समाजविघातक गोष्टी पसरवण्यासाठी अनाहूतपणे मदत करत असतो असं माझ्या लक्षात
आलं आहे. यावर माझ्या पातळीवर मी काय करू शकतो याचा मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा अशा गोष्टींना आपण
बळी पडू नये यासाठी समाजमाध्यमांवरील नागरिकशास्त्राचे मी माझ्यापुरते काही नियम पाळायला लागलो आहे ते
असे;
१. कुठल्याही अंधश्रद्धा पसरतील असे संदेश मी अग्रेषित करणार नाही.
२. कुठल्याही एका समाजाच्या विरोधात किंवा समर्थानात असणारे निनावी संदेश मी अग्रेषित करणार नाही.
३. एखाद्या माहितीपूर्ण संदेशाच्या,किंवा बातमीच्या खाली त्या संदेशाच्या मूळ लेखकाचं नाव किंवा संपर्कक्रमांक नसेल
तर मी अग्रेषित करणार नाही. आणि जर मूळ लेखकाचं नाव आणि संपर्क असेल तर त्यावर संपर्क करून त्या लेखकाशी
प्रत्यक्ष बोलून मग त्या लेखातील विचार पटले, किंवा बातमीची सत्यता पडताळून बघितली की त्यानंतरच मी ते
अग्रेषित करेन.
३. ​​एखाद्या सुंदर लेखाच्या किंवा कवितेच्या खाली मूळ लेखक किंवा कवीचा पत्ता नसेल तर ज्या व्यक्तीने तो मला
अग्रेषित केला असेल त्याला त्याचा मूळ स्रोत माहित आहे का याची खात्री करून घेण्यास सांगेन. नाहीतर ज्याने मला
संदेश पाठवला त्याला ज्याने अग्रेषित केला त्या व्यक्तीला विचारायची विनंती करेन. या पद्धतीने मूळ लेखकापर्यंत ही
शृंखला पोहोचेल. जेव्हा या पद्धतीने मूळ लेखक किंवा कवीचं नाव मिळेल तेव्हा मी स्वतः ते घालूनच मी तो संदेश
अग्रेषित करेन. तसं केल्यासच सांस्कृतिक चोरीला माझ्याकडून तरी आळा बसेल. अगदीच मूळ स्रोत न मिळाल्यास,
‘अज्ञात मूळ लेखकाच्या/कवीच्या प्रतिभेला अभिवादन करून मूळ लेखकच्या/कवीच्या संपर्कांच्या इच्छेसह… ‘असा
संदेश घालून तो संदेश मी अग्रेषित करेन.
४. मी कुठल्याही लेख, कविता किंवा संदेशाच्या खाली असणारं लेखकाचं, कवीचं नाव काढून न टाकता ते जसं मला
प्राप्त झालं तसंच अग्रेषित करेन कारण लेखकाचं नाव काढून टाकणं किंवा स्वतःच्या नावावर तो अग्रेषित करणं हा
त्याच्या प्रतिभेचा अपमान आहे आणि सांस्कृतिक चौर्यकर्म आहे.
५. मूळ लेखकाच नाव आणि संपर्क असणारा संदेश, मला त्यातील काही मुद्दे पटले नाहीत किंवा अपुरे वाटले तरी मी
संदेशातील कुठलाही भाग न वगळता किंवा स्वतःचा न घालता तो संदेश तसाच्या तसा अग्रेषित करेन.
६.कुठल्याही व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे संदेश मी अग्रेषित करणार नाही.

७. माझ्या संपर्कातील व्यक्तींच्या ललालसंदेशांच्या गोपनीयतेसंदर्भात मी माझ्याकडून कसून पालन करेन.
८. कुठल्याही प्रकारचे कॉपीराईट असणारा मजकूर, उदाहरणार्थ गाणी, पुस्तकातील उतारे, कविता इत्यादी मी मूळ
कर्त्याच्या परवानगीशिवाय अग्रेषित करणार नाही. कारण याप्रकारचा मजकूर समाजमाध्यमांवर विनापरवानगी,
विनामूल्य, आणि निनावी वितरित केल्यामुळे त्या निर्मात्याच्या कष्टाचं मोल मातीला मिळतं आणि त्यामुळे नकळत
खूप सांस्कृतिक हानी होते.
9.एखादा संदेश मी लिहीत असेंन तर माझं नाव आणि संपर्क त्याखाली मी नेहेमी देईन ज्यायोगे त्या संदेशाचं
उत्तरदायित्व मी मान्य करत असल्याची ती ग्वाही असते आणि माझ्या विचारांचं मी समर्थन करतो हे त्यातून वाचकाला
दिसतं.
‘बुंद बुंद से सागर बनता है’ असं म्हणतात. म्हणून मी एका थेंबाप्रमाणे माझ्याकडून सुरवात करून मी स्वतःपासून
समाजमाध्यमांवरील सुसंस्कृतपणा पाळायला सुरवात केली तर हळू हळू एक एक करीत सर्व या समाजमाध्यमांवरचे
सुसंस्कृत नागरिक बनतील आणि हे माध्यम येणाऱ्या काळातील नागरिकांसाठी उत्तम व्यासपीठ बनेल याची मला
नक्कीच खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *