
भगवान गौतम बुद्धांची एक गोष्ट वाचनात आली. ती गोष्ट अशी. एकदा एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि
म्हणाला,’भगवान मी आपल्या संदेशाच्या प्रसारासाठी गेलो असता काही लोकांनी मला खूप अपमानास्पद वागणूक
दिली’ त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, ‘हो का !! पण बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही’. त्यावर तो शिष्य म्हणाला की
‘भगवान, त्यांनी मला मारलं सुद्धा’ त्यावर भगवान म्हणाले, ‘हो का !! पण बरं झालं तुला दुखापत नाही झाली.’
त्यावर पुन्हा तो शिष्य म्हणाला की ‘भगवान खरं तर त्यांनी मला खूप मारलं, माझ्या पाठीवरचे वळ पहा’ त्यावर
भगवान म्हणाले ‘हो का !! पण बरं झालं त्यांनी तुला जीवे मारलं नाही ते.’ हे ऐकल्यावर तो शिष्य हिरमुसला आणि
म्हणाला ‘भगवान मी आपल्याला माझं दुःख सांगतोय आणि तुम्ही मला त्यातून काय चांगलं घडलं हेच सांगताय. असा
विचार तर मीही करू शकतो.’ त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, ‘हो का !! बरं झालं तुलाच कळलं की माझा शिष्य म्हणून
काय अपेक्षित आहे ते’
कुठल्याही गोष्टीत सकारात्मकता कशी शोधता येते ते शिकवणारी ही गोष्ट वाचली आणि मी अंतर्मुख झालो. मन
भूतकाळात गेलं. माझ्या इंजिनिअरिंगचं पाहिलं वर्ष होतं. कॉम्पुटर सायन्सचा अभ्यासक्रम त्यावेळी चारच कॉलेजमध्ये
शिकवलं जात होत. मी ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली ते माझ्या घरापासून खूप दूर होतं. घर ते कॉलेज आणि पुन्हा
घर असे जवळजवळ पाच तास केवळ प्रवासात जात असत. पहिले दोन महिने ठीक गेले पण नंतर प्रवासाचा कंटाळा येऊ
लागला होता. कॉलेज करून घरी आल्यावर पूर्ण थकून जायला व्हायचं. बाकी काहीच करता येत नसे. एक तर तरुण वय.
त्यात इंजिनीअरिंगला मेरिटवर ऍडमिशन मिळालेली. त्यात वयोपरत्वे अंगात थोडी बेदरकारी येऊ लागली होती आणि
रागही नाकाच्या शेंड्यावर लवकर हजेरी लावायला लागला होता. एकंदरीत मी कॉम्पुटर इंजिनिअर होतो आहे म्हणजे मी
फार ग्रेट काहीतरी करतो आहे आणि आईवडिलांवर उपकार करतो आहे असा तोरा थोडा थोडा अंगात भिनू पाहत होता.
आणि त्यात भर म्हणून प्रवासाच्या थकव्यामुळे माझी चिडचिड थोडी अधिकच वाढली होती. कर्मधर्म संयोगाने त्याच
दरम्यान आमच्या बिल्डिंगमधल्या मंडळींनी एक सहल काढली त्यात एका वनवासी कल्याण आश्रमाला भेट देण्याचा
योग आला. मी थोड्या नाराजीनेच सहलीत सामील झालो कारण दररोज इतका प्रवास करून कंटाळा आल्यावर माझा
रविवार जाणार म्हणून जीवावर आलं होतं. पण भिडेखातर मी तयार झालो आणि त्या दिवशी गेलो.
त्या आश्रमात पोहोचलो आणि तिकडच्या कार्यकर्त्यांनी तिथली माहिती सांगायला सुरवात केली. आदिवासी कशा
परिस्थितीत अजूनही राहत आहेत. त्यांच्याकडे दररोजचं अन्न, वस्त्र, निवारा यांची कशी कमतरता आहे त्यामुळे
आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधा तर त्यांच्यासाठी कशा स्वप्नवत आहेत वगैरे वर्णन ऐकताना मी कुठेतरी स्वतःच्या
आयुष्याशी तुलना करू लागलो. नंतर त्या कार्यकर्त्यांनी तिथली प्राथमिक शाळा आणि शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं
वसती गृह दाखवलं. वसतिगृह म्हणजे त्या इटुकल्यांचा पिटुकला संसारच होता. एक छोटी ट्रंक त्यात त्याचे दोन जोडी
कपडे पुस्तकं वह्या एक अंथरायला चादर आणि एक पांघरायला बस एवढंच. ना बूट ना मोजे ना खेळाचं सामान ना
काही. या सामुग्रीवर वर्ष काढायचं. त्याउपर त्या कार्यकर्त्याने जे सांगितलं ते ऐकून मी हबकलोच. त्याने सांगितलं कि
साधारण १५ मेल परीघाच्याही दूर राहणाऱ्या मुलांनाच वसतिगृहात आळीपाळीने राहायला मिळतं. ती सोडून बरीच मुलं
दररोज जवळजवळ दहा ते पंधरा मैल चालत शाळेत येतात आणि तितकीच चालत परत घरी जातात. जंगलातून थंडी,
उन्हाळा, पाऊसपाणी या सगळ्यात अनवाणी ही मुलं दररोज जवळजवळ २०-३० मैल चालतात. कशासाठी तर प्राथमिक
शिक्षणासाठी. आणि एवढं करून बऱ्याच मुलांची उपस्थिती ही ९० टक्क्यांपेक्षा जास्त होती. मी दिग्मूढ झालो. त्यावेळी
मला आठवला तो मला लांब जावं लागत म्हणून मिळालेला लोकल ट्रेन चा फर्स्ट क्लासचा पास. मला आठवले एवढावेळ
बाहेर काढावा लागतो म्हणून मिळालेले आरामदायी स्पोर्टशूज. मला आठवला प्रवासात कंटाळा येऊ नये म्हणून मला
मिळालेला वॉकमन. मला आठवला दिवसभर बाहेर राहावं लागतं म्हणून पहाटे ताजा करून आईने माझ्याबरोबर दिलेला
चार डब्ब्यांचा भाजीपोळीचा, दहीभाताचा भरपेट डबा आणि एवढं करूनसुद्धा पाकिटात मिळालेला पॉकेटमनी.
मी मनातल्या मनात ओशाळलो, लाजलो, शरम वाटली माझी मलाच माझ्या वागण्याबद्दल. कुठलं सुख मला बोचत
होतं म्हणून मी चिडचिड करत होतो? कुठली सुविधा मिळत नव्हती म्हणून रागावत होतो? कुठलीही तोशिश न पडता
उच्चशिक्षण घेतोय हे खरं तर आईवडिलांनीच माझ्यावर केलेले उपकार आहेत. मन आत खात होतं, पश्चात्ताप करीत
होतं. त्या लहानग्या मुलांनी मला जीवनभराचा धडा दिला होता. त्या दिवसानंतर मी कधीही ना माझ्या प्रवासाविषयी
कुरकुर केली ना माझ्या दमणुकीविषयी. कुठल्या तोंडाने करणार होतो?
आजही आयुष्यातील घडामोडींविषयी सकारात्मक राहण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. हळू हळू दररोजच्या जीवनात
मनातील सकारात्मकता टिकण्यासाठी काही तंत्र मिळाली आहेत.
१. सकाळी उठल्यावर माझ्याकडे ईश्वराने काय दिलं आहे याचा पाढा वाचतो. सुंदर शरीर, सुंदर मन, सद्बुद्धी, सुंदर
कुटुंब, उत्तम मित्र, उत्तम सगे सोयरे, सुंदर घर, सुंदर शिक्षण, सुंदर संस्कार, सन्मानाने जगता येईल इतकी सुबत्ता, कला,
विद्या आणि आयुष्यातल्या आजूबाजूच्या सगळ्याच सुंदर गोष्टी. या पाढ्यातच माझ्या सद्भाग्यचं दर्शन दररोज
दिवस सुरु करताना मला घडतं.
२. वर्तमानपत्रातील नकारात्मक बातम्या, नकारात्मक प्रतिक्रिया मी वाचून सोडून द्यायला लागलो आहे. त्यावर चर्चा
तर सोडाच पण त्यावर नकारात्मक विचारसुद्धा न करण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही
त्याची वायफळ चर्चा करून उगाच मनाची नकारात्मकता का वाढवायची?
३. तरीही दिवसभरातल्या घटनांतून मन चलबिचल झालं आणि कटकट करावीशी वाटली तर भगवान बुद्धांच्या त्या
गोष्टीप्रमाणे त्या घटनेतली चांगली बाजू काय आहे या कडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून माझं
कर्तव्य पूर्ण झालं आहे ना याची खात्री करतो आणि मग बाकीच्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो.
समस्येवर याच सकारात्मकतेने तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतो.
४. जेव्हा जेव्हा एखाद्या समस्येमुळे म्हणा, प्रसंगामुळे म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीमुळे म्हणा, नकारात्मकता मनात
येते त्यावेळी तीच नकारात्मकता घोळवत राहायची मनाला एक प्रकारे सवय झालेली असते. त्यावर तोडगा म्हणून आता
मी काही काळापुरता त्या समस्येपासून, प्रसंगापासून किंवा व्यक्तीपासून दूर जातो. बाहेर चालायला जाऊन येतो.
कुठल्यातरी मित्राला मनस्थिती नसताना सुद्धा बळेच फोन करतो आणि कुठल्यातरी वेगळ्या विषयावर गप्पा मारतो.
युट्युबवरचा एखादा भलत्या विषयाचा विडिओ बघतो. किंवा एखाद्या पुस्तकाचं एखादं प्रकरण वाचतो किंवा या सारखी
कुठलीही कृती ज्यामुळे माझं मन त्या समस्येवरून, प्रसंगापासून, व्यक्तीपासून दूर जाईल. आणि अशी कृती केल्यावर
मन पुन्हा शांत झालं कि त्याच समस्येकडे, त्याच प्रसंगाकडे किंवा त्याच व्यक्तीच्या संपर्कात पुन्हा येतो ती मनात
पुन्हा सकारात्मकता घेऊनच. या उपायामुळे एक घडू लागलं आहे की बऱ्याच समस्या, प्रसंग किंवा व्यक्तींच्या क्रिया
प्रतिक्रिया मध्ये थोडा वेळ जाऊ दिल्यामुळे आपोआपच शांत होतात आणि उत्तम तोडगा काढण्याचा मार्ग लवकर सुचतो.
अर्थात मी कुणी संत नाही, मनुष्यच आहे. आणि हे मान्यही करतो की तोल सुटतो माझा अजूनही कधी कधी. पण असं
कधी झालं आणि आयुष्याविषयी तक्रार करावीशी वाटली नं तर अजूनही वनवासी कल्याण आश्रमातलं ते वसतिगृह
आठवतो, ती लहान लहान मुलं आठवतो, त्या लहान मुलांच्या नजरेतून माझ्याकडे बघतो त्रयस्थासारखा आणि मग मी
खूप भाग्यवान आहे हे जाणवून ईश्वराने दिलेल्या अपरंपार सुखासाठी ईश्वराचेच आभार मानून आयुष्याकडे पुन्हा नव्या
उमेदीने पाहायला लागतो…