
एक दिवस एका मित्राकडे जाण्याचा योग आला. चांगला प्रशस्त बंगला. घराचं इंटेरिअर डेकोरेशन खूप सुंदर केलेलं. कोपऱ्या कोपऱ्यात छान छान शोभेच्या वस्तू. उंची पडदे, घरात ५५ इंची LED TV. अतिशय छान सजवलेली मास्टर बेडरूम, दोन मुलांच्या दोन वेगळ्या खोल्या. प्रत्येक मुलाची खोली वेगळी सजवलेली. प्रत्येक खोलीत स्वतंत्र TV, प्रत्येकाला लॅपटॉप. प्रशस्त किचन, डायनिंगरूम ,गेस्टरूम, एक आरसेदार मिनीबार, त्यात नुसत्या आकाराकडे बघून झिंग येईल अशा सुबक ठेंगण्या उंची मद्याच्या बाटल्या. एकंदरीतच सुबत्ता सर्वत्र प्रतीत होत असलेली. या सगळया प्रशस्तपणात एक गोष्ट मला लक्षात आली ती म्हणजे देवघर होतं ते मात्र किचनच्या एका कोपऱ्यात कपाटाच्या एका खणात. पूजेत फुलं वाहिलेली दिसली नाहीत त्यावरून ते देवघर फार जागृत नसावं याचा अंदाज येत होता.
नंतर गप्पांना सुरवात झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी मित्राला म्हटलं खूप छान घर आहे रे तुझं. एकंदरीत छान चाललंय. तुझी प्रगती पाहून खूप बरं वाटलं. माझ्या या कौतुकभरल्या वाक्याने तो अभिमानाने फुलून जाईल असं वाटलं होतं. पण त्याची प्रतिक्रिया वेगळी होती. तो म्हणाला “वरवर पहिला गेलं तर छान चाललंय रे सगळं. पण काहीतरी चुकतंय. भरपूर सुबत्ता आहे पण एकप्रकारचा कोरडेपणा आहे सगळ्यात. मी आणि बायको दोघेही आपापल्या क्षेत्रात उच्चपदस्थ आणि खूप व्यस्त. मुलं त्यांच्या विश्वात. टीनेजर झाली आहेत त्यामुळे काही सांगायला जावं तर ऐकत नाहीत उलट रागावतात. म्हणे त्यांची प्रायव्हसी बिघडते. या वयात काहीतरी भलतंच करून बसू नये ही भीती असते रे मनात. एकंदरीत बाहेरही परिस्थिती खूप चांगली नाही. वाहवत जाण्यासारखी खूप प्रलोभन आहेत बाहेर. आपण संस्कार करतो रे पण मुलांवर पण मुलांनी ऐकायला पाहिजे ना ? आम्ही सुद्धा हे सगळं करतोय ते मुलांसाठीच ना. आम्ही त्यांना आम्हाला शक्य होईल तेव्हा “क्वालिटी टाइम” देण्याचा प्रयत्न करतो रे पण त्यांनाच नको असतं. तुला आठवतं आपल्या लहानपणी आपल्याला हे सगळं काहीच नव्हतं रे पण काय मस्त जीवन होतं आपलं. आपल्याला आपल्या आईबाबांनी खास वस्तू आणून दिल्या नाहीत की फार लाड केले नाहीत पण धमाल लहानपण गेलं आपलं. काय चुकतंय रे? का अशी मुलं वागतात सगळ्या सुखसोयी मिळूनसुद्धा ?” माझा मित्र भरभरून बोलत होता. बऱ्याच दिवसांनी त्याच्या कोंडलेल्या भावनांना मोकळं व्हायला माझ्या कानांची सुरक्षित जागा मिळत होती बहुतेक. तो मोकळा होत होता आणि मी ऐकत होतो.
ऐकता ऐकता मीही माझ्या लहानपणीच्या दिवसात गेलो. पाच बिऱ्हाडांच्या चाळीतलं तीन खोल्यांचं आमचं घर. म्हणायला आमच्या तीन खोल्या पण अख्खी चाळच आमची सगळ्यांची. आम्ही मुलं तर घुसत होतो कुणाच्याही घरात पण मोठेही कोणाच्याही घरी कधीही जा ये करत असत. पदार्थांपासून सुखदुःखांपर्यंत सगळ्यांचीच देवाणघेवाण मुक्तपणाने होत असे एकमेकात. आमच्या पालकांना तर सोडाच, पण चाळीतल्या कोणालाही आम्हा मुलांवर डाफरण्याचा अलिखित अधिकार होता. प्रायव्हसी या शब्दाचा दुरान्वयानेही संबंध नव्हता आमच्याशी. सगळ्याच चाकरमान्यांचे टुकीने चाललेले कमीअधिक फरकाने मध्यमवर्गीय संसार होते सगळे. मला आठवतंय माझे आजी आजोबाही आमच्याकडे राहायचे त्यावेळी. आजोबांचा “दिव्यात वात आणि पानात भात” हा मंत्र असल्यामुळे संध्याकाळी आई कामावरून आली की लगेच स्वैपाकाला लागायची. आम्हीही त्यामुळे “सातच्या आत घरात” असायचो. वडीलही तोपर्यंत कामावरून आलेले असायचे मग जेवायची वेळ होईपर्यंत रामरक्षा, मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्र पाढे इत्यादी परवाचा चालायचा. मग जेवल्यावर दप्तर भरणे आणि मग रेडिओवरची “आपली आवड” ऐकत आजीजवळ झोप असा संध्याकाळचा कार्यक्रम कित्येक वर्ष होता. विचार करता लक्षात आलं की नुसता संध्याकाळचाच नाही तर दिवसभराचा परिपाठ असाच आखीव रेखीव होता मग वाटलं अमच्यावर पालकांनी संस्कार केले कधी ? आमच्याकडे प्रायव्हसी नव्हती तर आमचं बिघडलं कुठे? आम्हाला तोंडातून निघेल ते मिळालं नाही म्हणून कधी चिडचिड का झाली नाही आमची. कधी राग आला जरी मनात तरी उलटून बोलण्याची शामत नव्हती आमची आणि त्याही विषयी तक्रार नव्हती कधी. मग अमच्या लहानपणी असं काय होतं की जे आता नाही म्हणून सुबत्ता असूनही कोरडेपणा वाटतोय? असं काय त्या पिढीतले पालक करत होते ते आमची पिढी पालक झाल्यावर करू शकत नाहीये ?
विचार करता लक्षात आलं की तोंडातून आलं की न मिळणं हा आर्थिक परिस्थितीपेक्षाही संस्काराचा भाग अधिक होता. सकाळी आजोबांची साग्रसंगीत पूजा नकळत पहिली जाणं हा संस्कार होता. शाळेत “याकुंदेदुतुषारहार धवला” ही सरस्वतीची प्रार्थना म्हणून तासांची सुरवात होणं हा संस्कार होता. संध्याकाळी जेवायची तयारी होईपर्यंत परवाचा म्हणणं हा संस्कार होता. “दिव्यात वात पानात भात” हा संस्कार होता. अशासारख्या आजूबाजूला सतत घडणाऱ्या गोष्टीचा असा हा नकळत होत असलेला परिणाम हा संस्काराचाच भाग होता.
मला असं वाटतंय की आमची पिढी सुविधा आणि संस्कार यात गल्लत करत्ये. सुविधा पुरवणे म्हणजे संस्कार करणे असं आम्हाला वाटतंय. उपदेश आणि संस्कार यातही आमची पिढी गल्लत करत्ये. तोंडाने सांगितला जातो त्याला उपदेश म्हणतात आणि स्वतःच्या कृतीने घडवला जातो त्याला संस्कार म्हणतात. संस्कार हा दाखवण्याची किंवा करण्याची गोष्टच नाही ती मोठ्याच्या वागण्याचं निरीक्षण करून मुलांनी अंगात बाणवण्याची गोष्ट आहे. आपले वडील त्यांच्या आईवडिलांना दररोज सकाळी उठून नमस्कार करताना पाहिले तर मातापित्यांचा आदर करण्याचे संस्कार मुलांवर वेगळे असे करावे लागतच नाहीत. घरात आलेल्या माणसांची अगत्याने चौकशी आणि व्यवस्था करताना आपल्या पालकांना मुलांनी पाहिलं तर अतिथीसत्काराचे वेगळे संस्कार करावे लागत नाहीत.
मला असं लक्षात आलं आहे की मुलं ऐकत नाहीत ही मुलांची समस्या नाहीच आहे. मुलांनी आपलं ऐकावं यासारखं आमची पिढी वागत नाही किंवा काही कारणांनी वागू शकत नाही ही खरी समस्या आहे. आदर्श मुलं घडत नाहीत याचं कारण मुलं नसून आम्ही पालक त्यांच्यापुढे आमचे स्वतःचे आदर्श आमच्या कृतीतून घालून देण्यात कमी पडतो हा आहे. मुलांना पालकांनी काही विचारलं की त्यांना त्यांची प्रायव्हसी बिघडली असं वाटतं कारण त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या पालकांना सांगावी असा विश्वास निर्माण करण्यात आम्ही पालकच कमी पडतोय कुठेतरी.
मला त्या दिवशी त्या मित्राला एक सल्ला देण्याचा मोह झाला. जितक्या सुंदरपणे त्याने गेस्टरूम सजवली त्याच्या एकचतुर्थांश जागेत जरी देवघर केलं आणि देवाची पूजा केली ना तर देवच गेस्ट म्हणून घरी येईल आणि त्याचं जीवन आनंदाने भरून जाईल आणि हाच “क्वालिटी टाइम” मुलांवर अधिक संस्कार करेल. पण मी तो सल्ला त्याला दिला नाही. कारण न जाणो मी त्याची प्रायव्हसी बिघडवली तर…