
दोन तीन दिवसांपूर्वी मी एक अफलातून किस्सा ऐकला.
कुणीतरी एकदा एकाला विचारलं,”श्रीमद्भग्वद्गीतेविषयी कधी ऐकलं आहे का ? ” त्यावर “अहो ऐकलंय म्हणजे काय ? हे काय विचारणं झालं का? श्रीमद्भग्वद्गीता म्हणजे कोर्टात साक्ष देण्यासाठी जे पुस्तक वापरतात तेच ना?” असं छाती फुगवून अभिमानाने उत्तर मिळालं म्हणे!! आणि कहर म्हणजे हा किस्सा निवडणुकीला नुकताच उभ्या राहिलेल्या एका उच्चशिक्षित उमेदवाराच्या बाबतीत खरंच घडलाय म्हणे! आणि ‘श्रीमद्भग्वद्गीता’ हा शब्द सुद्धा त्या उमेदवाराला दोन वेळा आपल्या समोरच्या कागदावर इंग्रजी वर्णाक्षरात लिहिलेला वाचायला लागला म्हणे !!
खरं खोटं परमेश्वरास ठाऊक आणि या किश्श्यामधला विनोदाचा भाग सोडून दिला तरी हे घडणारच नाही असंही छातीठोकपणे सांगता येणार नाही ही खरी परिस्थिती आहे. एकंदरीतच भारताची भावी पिढी म्हणून ज्याचाकडे पाहिलं जातंय त्या पिढीला
भारतीय भाषा, साहित्य, इतिहास, संस्कृती, विचार, भारतीय परंपरा यांच्याविषयी किती माहिती असेल याचा विचार केला तर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ते चिंता वाटण्याइतकं गंभीर आहे असं जाणवतं. सर्वसामान्यपणे उच्चशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींनी अष्टावक्रगीता, रामगीता, उद्धवगीता ही नावंही कधी ऐकलेली नसतात. (श्रीकृष्णाचा जो उत्तम भक्त उद्धव त्याला श्रीकृष्णांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान म्हणजे ‘उध्दवगीता’. त्या गीतेबद्दल मी म्हणतोय बरं का !, महाराष्ट्रात दररोज ज्याचा ‘सामना’ करावा लागतो ती ‘उध्दवगीता’ वेगळी हे इथे मुद्दाम नमुद करतो) तर इतर गीता आणि त्यातील तत्वज्ञान तर सोडाच पण वर उधृत केलेल्या किश्श्याप्रमाणे श्रीमद्भग्वद्गीतेची सुदधा तोंडओळखही बऱ्याच जणांना नाही.
मला यावरून माझी श्रीमद्भग्वद्गीतेशी झालेंली पहिली ओळख आठवतेय.
मी साधारण सातवीमध्ये असेन. त्यावेळी कधीतरी एका कीर्तन प्रवाचनाच्या निमित्ताने श्रीमद्भग्वद्गीतेतील एक प्रसिद्ध श्लोक कानी पडला,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
या श्लोकाचा साधारण अर्थ असा की “मानवाला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण कर्मफळावर मात्र नाही. तसंच कर्माचं फळ हे कर्म करण्याच्या मागील उद्देश असू नये”
मी हा श्लोक आणि त्यावरचं त्या प्रवचनकारांचं विवेचन ऐकलं आणि माझ्या सातवीच्या आकाराच्या मेंदूत प्रचंड थैमान सुरू झालं.
घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी आईने अभ्यास करायला बसवलं तर माझा आईला एक बिनधास्त प्रश्न,” जर मार्क मिळवणे या फळाची अपेक्षा करायची नसेल तर अभ्यास तरी कशाला करायला पाहिजे आणि मार्क मिळायची चिंता तरी कशाला पाहिजे? करीन तेवढा अभ्यास आणि मिळतील तेवढे मार्क !” माझ्या स्वभावातली विद्रोही छटा आई असल्यामुळे तिला अर्थातच माहीत होती आणि मी मनापासून हा प्रश्न विचारतोय हे लक्षात आल्यामुळे माझ्या या आगाऊ प्रश्नावर न रागावता तिने सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली , “त्या श्लोकाचा तुझ्या बाबतीतला अर्थ असा की केवळ मार्क मिळवण्यासाठी तू अभ्यास करू नकोस. तुझी सध्याची विद्यार्थी दशा आहे म्हणून अभ्यास करून ज्ञान मिळवणं हे तुझं कर्तव्य आहे या भावनेने अभ्यास कर. कारण अभ्यास करून परीक्षा देण्याच्या कर्माचं ‘परीक्षेत मार्क मिळणं’ हे फळ तुला हवं असो किंवा नसो मिळणारच आहे. मग अभ्यास करताना मार्कांची चिंता का करायची? तू तुझ्यादृष्टीने सर्वोत्तम अभ्यास कर की झालं” त्यावेळी हे उत्तर माझ्या सातवीच्या आकाराच्या मेंदूला पटलं. आणि या उत्तरातच, माझ्या शालेय अभ्यासासंदर्भात मला त्या इयत्तेत असणारे विषय कळले आहेत याची खात्री झाल्यावर नंतर माझा वर्गात कितवा नंबर येतो याविषयी माझ्या आईने माझ्यावर कधीच दबाव का आणला नाही याचंही उत्तर मिळालं. पुढेही खूप वेगवेगळ्या कारणाने श्रीमद्भग्वद्गीता आयुष्यात भरून राहिली आणि वेगवेगळ्या प्रसंगातील माझ्या राजेंद्रविषादावर नेहमीच ‘प्रेयस’पेक्षा ‘श्रेयस’ निवडण्यासाठी मार्गदर्शन करत राहिली.
याच श्रीमद्भग्वद्गीतेची संतश्रेष्ठ ज्ञानदेवांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत सर्वांनाच भुरळ पडली आणि केवळ श्रीमद्भग्वद्गीतेच्या अभ्यासाने आणि अल्पांश आचरणाने अनेक लोक शहाणे झाले अनेक उद्धरून गेले.
तसं पाहायला गेलं तर हल्ली ‘सेल्फ हेल्प’ किंवा व्यक्तित्वविकासाच्या विषयावरची देश विदेशातील अनेक पुस्तकं आणि अनेक सेमिनार उपलब्ध आहेत. त्या पुस्तकांच्या किंवा त्या सेमिनारच्या किमती पहिल्या तर ते साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना त्यासाठी चांगली भरपूर रॉयल्टी मिळत असेल या विषयी शंकाच नाही. गम्मत म्हणून माझ्या मनात विचार आला की श्रीमद्भग्वद्गीता हा ग्रंथ ‘पब्लिक डोमेन’ मध्ये सर्वांसाठी उपलब्ध नसता आणि गेली किमान पाच हजार वर्ष जर भगवंतांना श्रीमद्भग्वद्गीता निर्माण करण्यासाठी रॉयल्टी मिळत राहिली असती तर आज श्रीकृष्ण भगवान केवळ श्रीमद्भग्वद्गीतेच्या रॉयल्टीवर मल्टिट्रिलियनेअर झाले असते. या कल्पनेने माझं मलाच हसू आलं. कारण त्यांनीच सांगितल्याप्रमाणे रॉयल्टीवर लक्ष ठेऊन त्यांनी श्रीमद्भग्वद्गीता निश्चितच निर्माण केलेली नाही. अर्जुनाच्या विषादाचं निमित्त करून जडजीवाला श्रेयसाचा मार्ग दाखवून मुक्ती देण्याच्या कर्तव्य बुद्धीने निर्माण झालेलं हे त्रिकालाबाधित, कालातीत साहित्य आहे. आणि तसंही जो त्रैलोक्याचा स्वामी त्या भगवंतांना कोण आणि काय रॉयल्टी देणार? हे महान तत्वज्ञान जगाला उपलब्ध करून देऊन, ज्याची खरच तळमळ असेल त्याच्याकडून केवळ पुष्पम्, पत्रं, फलं, तोयं इतक्या कमी रॉयल्टीवर मार्गदर्शन करणाऱ्या आणि त्याच रॉयल्टीत ‘योगक्षेमं वहाम्यहं’ हा बोनसही देणाऱ्या त्या भगवंताला आपण काय रॉयल्टी देणार? माझ्या कडून मी इतकंच करू शकेन की कृतज्ञता भावाने, शरणागत होऊन, श्रीमद्भग्वद्गीतेच्या तत्वज्ञानाला माझ्या जीवनात अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करून मी माझ्याकडून भगवंताची यथाशक्ती यथामती रॉयल्टी देण्याचा प्रयत्न नक्की करू शकेन. नाही का ?