
माझ्या माहिती तंत्रज्ञानाच्या कारकिर्दीत म्हणा किंवा सांगीतिक प्रवासात म्हणा, मला खूप चांगल्या मंडळींबरोबर काम करण्याचा योग आला. त्यात खूप दिग्गज माणसं होती आणि त्यांनी सहज बोलता बोलता मला इतक्या गोष्टी शिकवल्या की त्या सहज अंगी मुरत गेल्या आणि त्याचा एकंदरीत माझ्या वैयक्तिक जीवनावर आणि व्यावसायिक कारकिर्दीवर मूलगामी परिणाम झाला. एकदा माझा एक बॉस मला सहज म्हणाला, ” राजेंद्र, माणसाची पारख ही तो कुठल्याही गोष्टीचा शेवट कसा करतो या वरून करत जा. एखाद्या कामाला सुरुवात करणारी खूप मंडळी असतात, पण कामाचा उत्तम शेवट करणारी मंडळी यशस्वी होतात हे लक्षात घे. त्यामुळे कामाचा शेवट कसा सुंदर होईल याकडे अधिक लक्ष देत जा”. माझ्या बॉस ने हे वाक्य एखाद्या प्रकल्पावर काम करण्याच्या दृष्टीने जरी उद्गगारलेलं असलं तरी खोलवर विचार करता मला त्याही वेळी जाणवलं होतं की ते तत्व आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकणारं आहे. संगीताची मैफिल असो, नाटक किंवा सिनेमा असो एखादी कादंबरी असो किंवा एखादं संभाषण असो, या सगळ्याचा श्रोत्यावर , प्रेक्षकांवर, वाचकांवर होणारा परिणाम हा त्या गोष्टीचा शेवट कसा झाला यावर खुपसा अवलंबून असतो असा सगळ्यांचाच अनुभव आहे.
एखादा प्रकल्प हाती घेतल्यावर त्याच्या शेवटाचा आणि त्यातून अपेक्षित परिणामाचा विचार आधी केला तर प्रकल्पाच्या नियोजनात अधिक खोली येते आणि तपशीलवार त्याचा विचार होतो हे त्यावेळी लक्षात आलं आणि तसा अनुभवही आला. मॅनेजमेण्टच तत्व ‘Start with End in mind’ किंवा शेक्सपिअरचं एक नाटक आणि प्रसिद्ध वाक्य, ‘All’s well that ends well’ हे याच विचारधारेवर आधारित आहे.
हाच विचार अधिक व्यापक दृष्टीने मानवी जीवनालाही लागू आहे असं लक्षात आलं माझ्या. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमात काल स्थितीनुसार आपली त्या त्या आश्रमातील कर्तव्ये चोख बजावून त्यातून उत्तमरित्या उत्तीर्ण होऊन शेवटी जीवन सफल झाल्याचं समाधान मिळणं हेच यशस्वी जीवनाचं मोजमाप नाही का? मग असं असेल तर या जीवनरूपी प्रकल्पाचा अंत कसा असावा, या जीवनाचा शेवट कसा व्हावा याची थोडी उजळणी शक्य तितक्या लवकर जर मनाशी झाली तर त्या दृष्टीने जीवनाची आखणी आणि त्याप्रमाणे शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक आणि या सर्वांचा परमोच्च बिंदू म्हणजे अध्यात्मिक तयारी करण्याची सजगता वेळीच आली तर आयुष्य आणि त्याचा शेवट दोन्ही निश्चितपणे सुंदर नाही का होणार?
मला आठवतंय, माझे आजोबा दररोज रात्री जेवल्यानंतर अगदी छोटा गुळाचा तुकडा तोंडात टाकायचे. आता आजोबाच गूळ खातायत म्हटल्यावर आम्हा मुलांनाही मग आपोआप एखादा छोटा तुकडा हातावर मिळायचा आणि आम्ही खुश असायचो. एकदा मी सहज त्यांना “तुम्ही नेहेमी जेवून झाल्यावर गूळ का खाता?” अस विचारल्याचं मला आठवतंय. त्यावर ते म्हणून गेले होते. “जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे ‘शेवट गोड करी'”. माझ्या बालबुद्धीला त्या वेळी एवढंच कळलं की आजोबांना गोड खायला आवडतं म्हणून ते शेवटी गूळ खातात. आणि खरंच त्यांची एक सवय म्हणून ते गूळ खात असंत हे जरी मान्य केलं तरी त्यांच्या गमतीने म्हटलेल्या ‘शेवट गोड करी’ या वाक्यात किती खोल अर्थ दडलेला होता हे आता डोक्यावरचे थोडे केस निघून गेल्यावर आणि बरेचसे पांढरे झाल्यावर लक्षात येतंय. स्वतः अतिशय आदर्शवत जीवन जगणाऱ्या माझ्या आजोबांनी किती सोप्या शब्दात जीवनाच्या व्यवस्थापनातील किती महत्वाचा सिद्धांत आम्हाला सहज सांगून टाकला होता!!
प्रत्येकाचा अंत्यबिंदू अटळ असल्यामुळे ‘शेवट गोड करी’ हा सिद्धांत प्रत्येकासाठी कमी अधिक फरकाने लागू आहेच. पण ज्याचं त्याचं आयुष्य वेगळं, परिस्थिती वेगळी, आशा आकांशा वेगळ्या आणि यशापयशाचं मोजमाप करणाऱ्या फुटपट्ट्याही वेगवेगळ्या. आणि म्हणूनच ‘शेवट गोड’ करण्यासाठी प्रत्येकाने निवडायचा गुळाचा तुकडा प्रत्येकाचा वेगवेगळा असेल हाच काय तो फरक…