
एकदा असंच काहीतरी पहावं म्हणून मोबाईल वर सहज युट्युब सुरू केलं. तिथे कथक या नृत्यप्रकाराचे अनभिषिक्त सम्राट बिरजू महाराज यांचा एक विडिओ होता. तो विडिओ म्हणजे त्यांची एक प्रकट मुलाखत होती. त्या व्हिडिओमध्ये मी एक वाक्य ऐकलं. ‘शांती की अपनी एक लय होती है’
हे वाक्य ऐकलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले. त्या वाक्यात खरा किती विरोधाभास होता. ‘शांतीची लय’ ? दोन शब्दात इतका गहन अर्थ! इतकं अनुभवसिद्ध वाक्य ती अनुभूती जगलेल्या माणसाकडूनच येऊ शकतं.
अधिक विचार करायला लागलो आणि भारतीय शास्त्रीय संगीतातल्या संज्ञांसाठी वापरलेले शब्द आणि त्यांचा गूढार्थ, भावार्थ, लक्षात येऊ लागला आणि मी भारावून गेलो.
‘सम’ ही अशीच एक संकल्पना. पूर्ण अवर्तनभर वाट पाहिल्यावर, मात्रा मात्रा करत प्रवास करताना तो उत्कट बिंदू जवळ येतो मनातली हुरहूर वाढवतो आणि त्या बिंदूवर प्रत्यक्ष पोहोचल्यावर आत्मिक आनंदाचा अनुभव येतो पण विरोधाभास असा की त्या क्षणी चित्तवृत्ती ‘सम’ झालेल्या असतात , शांत झालेल्या असतात एक त्रयस्थ स्थितप्रज्ञता आलेली असते. कारण त्या बिंदूपासून पुन्हा एका आवर्तनाचा प्रवास सुरु करायचा असतो. हा ‘सम’ बिंदू पुन्हा पुन्हा अनुभवता यावा म्हणून आवर्तनाचं प्रयोजन. संगीत म्हणजे समेपासून सुरू झालेला समेपर्यंतचा प्रवास आहे. प्रत्येक मात्रेचा आनंद घेत घेत थोडं प्रत्येक मात्रेभोवती रमतगमत पण एकाच मात्रेपाशी न घुटमळता सतत समेकडचा प्रवास म्हणजेच संगीत. नाही का?त्या आवर्तनाची लय कमी जास्त असेल, आवर्तनातील मात्रा कमी जास्त असतील पण प्रत्येक अवर्तनाचं ध्येय एकचं. ‘सम’.
संगीत शिकायला सुरुवात केल्यावर दोन मात्रांमधली जागा जास्तीत ज्यास्त सुरावटींनी भरण्याची उर्मी असते. पण हळू हळू सुरावटींमध्ये अवग्रहांचं महत्व वाढायला लागतं. आणि मग अशी एक वेळ येते की आवर्तन सुरू आहे, मात्रा येत जात आहेत पण त्या दोन मात्रांच्या मधलं अवकाश फक्त शांतीने भरलं आहे. तिथे त्या क्षणाला लय तर सुरू आहे पण स्वर नाहीत , तिथे शांतीही आहे आणि लयही आणि तोच अनुभव पंडित बिरजू महाराजांना ‘शांतीची लय’ या विरोधाभासात अपेक्षित असावा बहुतेक. संगीताचा अभ्यास करताना, बुजूर्गांच्या वर्णनावरून आणि कधीतरी एखाद क्षण मिळणाऱ्या स्वानुभवावरून हे ही लक्षात आलंय की ‘स्व’ चा लय झाल्याशिवाय ही शांतीची लय अनुभवताच येत नाही, येणार नाही.
हाच विचार थोडा पुढे नेला मग वाटलं की हीच प्रक्रिया म्हणजे मानवाच्याही जीवनसंगीताचा प्रवास नाही का? स्वस्वरूपाच्या समेपासून चौऱ्यांशी लक्ष मात्रांच्या या दीर्घ आवर्तनात प्रत्येक मात्रेच्या आसपास थोडं रमतगमत पण तिथेच न घुटमळता शेवटी, स्वस्वरूपाच्या समेकडेच जाण्याचंच जीवाचं अंतिम ध्येय नाही का ?
या जीवनसंगीतातील दोन मात्रातील अवधीत म्हणजेच जन्मापासून ते मृत्युपर्यंतच्या कालावधीत माणसाच्या जीवनसंगीतातील भावभावनांच्या, वासनांच्या, महत्वाकांशांच्या, षड्रिपूंच्या सुरावटी कमी करत करत त्याची जागा शांति समाधानाच्या अवग्रहांनी भरत शेवटी ‘स्वतः’ चा लय करून याच जीवनसंगीतात ‘शांतीची लय’ अनुभवणे म्हणजेच ‘नादब्रम्ह’ किंवा ‘ब्रम्हनाद’, यांचाच साक्षात्कार नाही का?