
आज माझा मुलगा त्याच्या एका मित्राच्या ‘बद्देपार्टी’ हुन परत आला आणि त्या पार्टीचं रसभरीत वर्णन करू लागला. एका अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये साधारण 100 लोकांची पार्टी होती. त्या पार्टीतला मेनू त्याने सांगितला तेव्हा, तुडुंब पोट भरलेलं असूनसुद्धा पुन्हा एकदा त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, आणि मी हेही प्रामाणिकपणे मान्य करतो की तो मेनू ऐकून या वयातही माझे ओठ थोडे ओलसर झालेच!!. त्यानंतर मग DJ काय, केक काय, चॉकलेट फोंड्यु काय, सगळ्यांचंच वर्णन झालं आणि ते करता करता माझ्या मुलाने ती पार्टी पुन्हा एकदा अनुभवली. एकंदरीतच आमचे चिरंजीव ‘भट्ट जेऊनी तट्ट फुगले’ अशी स्वतःची अवस्था करून घरी परतले होते. मग मित्राला दिलेली गिफ्ट आणि त्याच्याकडून परत मिळालेली रिटर्न गिफ्ट याची चर्चा झाली…. एकंदरीत त्याच्या भाषेत सांगायचं तर एकदम ‘दसवाला जबर’ (जबरदस्त) अशी बड्डेपार्टी अनुभवली म्हणून पोरगं खुश होतं हे नक्की.
या पार्टीचं वर्णन ऐकता ऐकता माझं मन मला माझ्या शाळेत घेऊन गेलं. शाळेत कुणाचा वाढदिवस असेल तर ‘बड्डेबॉय’ ला गणवेशाचे कपडे न घालता नवीन कपडे घालायला मिळायचे आणि चेहऱ्यावर VIP चा भाव आणून पूर्ण वर्गात लिम्लेटच्या गोळ्या वाटण्याचा मान मिळायचा’. बड्डेबॉयच्या घरची मंडळी फारच हौशी असली तर लिम्लेटच्या गोळी ऐवजी ‘कॅटबरी इक्लेयर’ चं एक चॉकलेट हाती पडायचं. आणि त्या ‘कॅटबरी इक्लेयर’ च खूप अप्रूप असे त्या वेळी. हे VIP सुख मला मात्र कधीच अनुभवता आलं नाही. मे महिन्यात मला जन्माला का घातलं या बद्दल लहानपणी माझा माझ्या आईवर थोडा रोष होता कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे माझ्या वाढदिवसाला शाळेला नेहेमी सुट्टी असायची आणि बालवाडी ते दहावी अशी पूर्ण बारा वर्षे चॉकलेट न वाटता आल्यामुळे शाळेत मला VIP म्हणून कधीच भाव खायला मिळाला नाही.. असो.
वाढदिवशी कपडे मात्र नवीन मिळायचे आणि त्यापाठोपाठ माझी स्वभाववैशिष्ट्ये माहिती असल्यामुळे, “राजेंद्र, नवीन कपड्यावर डाग पाडायची किंवा शिवण उसवायची तारीखही लगेच शर्ट पॅन्ट वर टाकून ठेव हो !!” असा आजीकडून प्रेमाने आणि माझ्या कौतुकाने ओथंबलेला पण खोचक सल्लाही यायचा मागोमाग. आणि लगेच,”अगं आज दृष्ट काढून टाक हो याची, अशी आईला एक सुचनावजा आज्ञाही यायची”.
“जन्माला आलास तर त्यात तू काय विशेष केलंस? “असा एक तिरकस प्रश्नही कुणीतरी जिभेच्या प्रत्यंचेवरून माझ्यावर सोडायचा आणि त्या व्यक्तीचा खूप रागही यायचा पण कितीही राग आला तरी वाढदिवस असल्याने त्या प्रश्नकर्त्याला मनातल्या मनात क्षमा करून मी दुर्लक्ष करीत असे. आई त्यादिवशी माझ्या आवडीचं गोडधोड आणि संध्याकाळी आमच्या चाळीतल्या सवंगाड्यांसाठी घरच्या घरी केकही करायची. आणि याच एका गोष्टींमुळे माझी बालबुद्धी तिने मला मे महिन्यात जन्माला घातलं असलं तरी त्यासाठी तिला क्षमा करून टाकायची.
म्हणजे एकंदरीतच वाढदिवसाची थोडीशी नवलाई आणि कौतुक सोडलं तर दिवस दररोज सारखा सामान्यपणेच संपायचा. ना भपका होता, ना महागड्या पार्टीज होत्या ना मित्रांना गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट होत्या. खूप दिवस वाट पाहून आलेला तो दिवस निघून मात्र पटकन जायचा.
पु.लं. देशपांडे यांनी वाढदिवसाबद्दल एका ठिकाणी लिहिलं आहे. ते मला आठवलं. ते लिहितात, “आम्हाला आमचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी आमचं वय किती झालं हे आम्हाला सकाळी आमचे तीर्थरूप जेव्हा उठवायचे तेव्हा कळायचं. बारा वर्षाचा घोडा झाला पण लोळत कसा पडलाय पहा गाढवासारखा.. वाढदिवस आहे म्हणून ढोणकुरासारखं लोळत पडणार का राजश्री आज? अशा आशीर्वचनांनी दिवसाची सुरुवात व्हायची”
खरं तर सण समारंभांपासून ते उत्सवांपर्यंत सगळ्याच गोष्टींचे इव्हेंट व्हायला सुरुवात होण्याआधी सगळ्याच गोष्टी सरळ सध्या सोप्या पण जिव्हाळा आणि आस्थेने ओथंबलेल्या असायच्या. ना कशाचा गाजावाजा ना अनाठायी खर्च. सध्या दिखावा आणि बडेजाव या मध्ये वाढदिवस गुंतून राहिले आहेत असं वाटतं कधी कधी.
असं असलं मी सध्याच्या परिस्थितीवर नाखूष आहे आहे आणि ताशेरे ओढतोय असं मात्र अजिबात नाही बरं का !! कारण वाढदिवस खास दिवस असतोच मुळी आणि तो खास पद्धतीनेच साजरा व्हावा असंच माझं ठाम मत आहे. या खास दिवसाचं संतुलन कसं साधणार असा प्रश्न मनात पडलेला असतानाच परवा माझ्या मित्राने मला वाढदिवसाचा एक वेगळाच पैलू दाखवला.
मी माझ्या मित्राला त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी व्हाट्सअप्पवर शुभेच्छा संदेश पाठवला अगदी ‘वर्चुअल चॉकलेट’ आणि इ-पुष्पगुच्छासह. पण पठ्याने उत्तर दिलं नाही दिवसभर. निदान संदेश मिळाल्याची पोचपावती तरी ?
दुसऱ्या दिवशी मी फोनच केला आणि त्याने तो उचलला. आणि माझ्या शुभेच्छांना उत्तर किंवा निदान पोचपावती तरी न देण्याच्या तक्रारीवर तो बोलायला लागला. तो म्हणाला,
“राजेंद्र तू मला काल शुभेच्छा संदेश पाठवलास पण माझा फोन मी काल बंद ठेवला होता म्हणून उत्तर देऊ शकलो नाही” माझ्या मनातला संदेह आणि चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह त्याला फोनवरही जाणवलं असेल कदाचित म्हणून तो पुढे म्हणाला,” राजेंद्र, माझा वाढदिवस मी जीवनाचा उत्सव म्हणून साजरा करतो. या दिवशी मला या सुंदर आयुष्याची भेट दिली म्हणून तो दिवस मी कुटुंबाबरोबर घालवतो. घरात कुणाचाही वाढदिवस असेल तर घरातले सगळे त्या दिवशी सुट्टी घेतात आणि दिवाळी किंवा दसऱ्याच्या सणासारखा आम्ही त्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या जन्माचा सण साजरा करतो आम्ही. तो दिवस फक्त आमच्या कुटुंबाचाच असतो. आम्ही आईवडिलांना आयुष्याची अनमोल भेट दिली म्हणून कृतज्ञतेने नमस्कार करतो आणि मग कुटुंबातल्या सगळ्या मोठ्याना नमस्कार करतो कारण मागची पिढी असते म्हणून पुढची पिढी घडते यावर आमचा दृढ विश्वास आहे. यानंतर आम्ही सगळे देवळात जातो आणि ईश्वराचे आभार मानतो. मग सगळे कुटुंबीय मिळून जेवतो. आम्ही मग जुने फोटो अल्बम काढतो आणि आतापर्यंत जगलेल्या सुखद आठवणींना उजाळा देतो. नाहींतर घरातले सगळे मिळून फोटो कधी बघतो का आपण?
मग संध्याकाळनंतर माझी निवडक मित्रमंडळी येतात आणि गप्पाटप्पा खानपान करत रात्री दिवस संपतो.
बरं फोन किंवा फेसबुक व्हाट्सअप्प वर मिळणाऱ्या शुभेच्छांना संदेशांना दुसऱ्या दिवशीही उत्तर देता येतच की. म्हणून तो दिवस मी फोन बंद करून ठेवतो त्याला हात लावत नाही”
मी हे ऐकल्यावर दोन मिनिटं नि:शब्द होतो. आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी वाढदिवसाचं वेगळं रूप आणि वाढदिवस साजरा करण्याची एक अनोखी पद्धत सांगत होता. दिखाव्या पासून, बडेजावापासून दूर जाऊन आयुष्यात येणारा वार्षिक सण म्हणून त्याकडे पाहण्याची आणि तसा तो साजरा करण्याची ही दृष्टी मला खूप भावली आणि खूप काही शिकवून गेली.
आता मोठा झाल्यावर मला मे महिन्यात जन्माला का घातलं हा आईविषयी रोष तर अर्थातच उरला नाहीये. पण माझ्या मित्राने करून दिलेली वाढदिवसाबद्दलची नवी जाणीव आणि आणि नव्या दृष्टीमुळे यापुढचा प्रत्येक वाढदिवस कृतज्ञतेने आणि उत्साहाने भरलेला वार्षिक सण होईल हे नक्कीच..