
मुंबईबाहेरची एका निवांत ठिकाणची एक सुंदर आणि निवांत संध्याकाळ. लांबून कुठून तरी पं. जितेंद्र अभिषेक यांची ‘लागी कलेजवा कटार’ ही अप्रतिम ठुमरी कानावर पडते. ऐकणाऱ्याला उन्मनी करून स्वतःबरोबर अलगद घेऊन जाण्याची स्वरमोहिनी आजही माझ्यावर परिणाम करते आणि मी त्या स्वरहिंदोळ्यावर ‘झोपाळ्यावाचून झुलायला’ लागतो. त्या परिचित स्वरांबरोबरच मी माझ्याच मनोराज्यातील खूप खोलवरच्या आणि बऱ्याच वेळा अपरिचित असणाऱ्या ठिकाणांची सैर करून आलो आहे. ह्या आंतरिक सफरी विशेषतः मी एकटा असताना अशाच एखाद्या गाण्याने किंवा प्रसंगाने सुरू होतात आणि विचारांचे रूळ बदलत बदलत कुठल्यातरी अनामिक ठिकाणी जातात. या सफरीत मी मलाच खूपवेळा नव्यानेच भेटतो. या सफरींवरून परत येणारा मी एक वेगळाच मी असतो त्या सफरीमुळे कायमचा बदललेला.
त्या संध्याकाळी त्या ‘कलेजवा’ वर वार केलेल्या त्या तिखट धारेच्या काट्यारीवर स्वार झालो आणि गेलो त्या कटारीनेच केलेल्या अनाघाती वेदनेवर स्वार होऊन वेदनेच्या गूढ राज्यात. ‘बुंद ना गिरा एक लहू का ! कछु ना रही निशानी’ हे या अव्यक्त वेदनांचं सार्थ वर्णन. वेदनेच्या राज्यात शिरताना आधी मला वाटलं की दुःखच दुःख बघायला मिळेल इथे. वेदनेचं च राज्य म्हटल्यावर अपेक्षा होती की विव्हळणारी मनंच भेटतील इथे, पोळलेले जीव गाऱ्हाणी सांगतील, आणि कधी व्यक्त आणि बऱ्याच वेळा अव्यक्त वेदनांचं रुदनच ऐकायला मिळेल.
पण आश्चर्य म्हणजे वेदनेच्या या राज्यातही सप्तरंगी अजब दुनिया दिसली मला. काही शारीरिक वेदना भेटल्या पण त्यांची फार तक्रार नव्हती. कुणीतरी आस्थेने विचारपूस करावी औषधपाणी मिळावं इतकीच माफक अपेक्षा होती त्या वेदनांची. काही मानसिक वेदनांशी मुलाखत झाली. त्या कुठेतरी मोकळ्या होऊ पाहत होत्या पण तसं कुणी आस्थेनं लक्षपूर्वक ऐकत नाही हेच त्यांचं मुख्यतः गाऱ्हाणं होतं.
भावनिक वेदना थोड्या आक्रस्ताळ्या वाटल्या. कारण वरवर पाहता त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यांनी पण खोलवर पाहिल्यावर स्वतःच्याच ‘अहं’च्या वारांनी अधिक घायाळ झालेल्या दिसल्या त्या, मग तक्रार तरी कुणाकडे करणार होत्या.. म्हणून मग आक्रस्ताळेपणाकडे झुकल्या होत्या.
पण या वेदनांच्या राज्यात खरं अप्रूप वाटलं ते आनंदाश्रू डोळ्यात साठवून ज्या वेदना मला भेटल्या त्यांचं. बाळाला जन्म देताना झालेल्या तीव्र वेदनांना प्रसूतीनंतर मात्र वात्सल्याच्या अश्रूंनी सचैल स्नान घडून सोवळ्यात ईश्वराला कृतज्ञतेने नमस्कार करताना पाहिलं मी.
रियाझ किंवा साधना करताना झालेल्या वेदना स्वरसिद्धीचं लेणं अंगावर लेऊन रंगमंचावर उधळत कृतार्थ झालेल्या तिथे भेटल्या मला.
देह छिन्नविच्छिन्न होत असताना मातृभूमीला नमन करत आनंदाने शाहिद होण्याचा अभिमान बाळगणाऱ्या वेदना भेटल्या तिथे.
मग लक्षात आलं की या वेदना म्हणजे वेदना नाहीतच मुळी. या आहेत संवेदना. वेदनेवर संस्कार झाले की संवेदना जन्म घेते असा साक्षात्कार झाला मला यांना भेटून.
मग लक्षात आलं की लोकांना दुःख किंवा वेदना आहेत असं जे वाटतं त्या असतात फक्त स्वार्थात लडबडलेल्या तक्रारी. संवेदनेची जननी हीच वेदनेची खरी ओळख आहे. आणि म्हणूनच एखादी कुंती भगवंताला ‘दुःख दे देवा परंतु सोसण्याचे धैर्य दे’ असा वेदनेचा वर मागते.
त्या सफरीत वेदनांना भेटल्यावर ‘सावरीया से नैना हो गये चार, लागी कलेजवा कटार’ अशीच खरोखर परिस्थिती झाली. आणि जेव्हा सफरीवरून परतलो तेव्हा खरच अनुभवलं की
‘मन घायल पर तन पे छायी मिठी तीस सुहानी, सखी री मै तो सुध बुध गयी बिसार !
हे राम,
लागी कलेजवा कटार
लागी कलेजवा कटार’