
अगदी कालचीच गोष्ट. मी आणि माझा मुलगा एक विडिओ पाहत होतो. त्यात एक कथक नर्तिका देवतेची पूजा करण्याचे भाव करून दाखवत होती. ते करता करता तिने गंध उगाळून देवाच्या भाळवर ते गंध लावण्याचे भाव व्यक्त केले. माझ्या मुलाचा मला निरागस प्रश्न. “बाबा तिने देवाला गंध लावल्याचं लक्षात आलं पण त्याअगोदर तिने जमिनीवर काहीतरी केल्याचे भाव करून दाखवले ते काय होतं?”
“अरे ते तिने गंध उगाळलं”, माझं उत्तर.
“बाबा, गंध उगाळलं म्हणजे काय केलं?”
मग मी त्याला दगडाच्या सहाणेवर चंदनाचं खोड उगाळून गंध कसं करतात ते सांगितलं. पण तो संवाद संपल्यावर माझं विचारचक्र सुरू झालं. मला लक्षात आलं की, माझ्या लहानपणी माझे आजोबा पूजा करत त्यावेळी आजी गंध उगाळून देत असे हे चित्र मी पाहिलं आहे आणि ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. पण जेव्हापासून उत्तम दर्जाचं रेडिमिक्स गंध बाजारात उपलब्ध झालं तेव्हापासून गंध उगाळणे ही प्रक्रियाच देवपूजेतून बाद झाली आहे. घरात दररोज पूजा करत असताना उत्तम दर्जाचं अगदी केशरयुक्त सुगंधी पण तरी तयारच अष्टगंध वापरण्यात येऊ लागलं. त्या अष्टगंधाची पूड पाण्यात मिसळली की छान गंध तयार होतं. त्याला सुवासही अप्रतिम असतो. पण या रेडिमिक्स गंधामुळे सहाण आणि चांदनाचं खोड हळू हळू दैनंदिन पूजविधीतून कालबाह्यच झालं. बरं, जी गत गंधाची तीच पूजेतल्या बहुतांशी गोष्टींची. पूर्वी परसातली किंवा परिसरातली ताजी फुलं आणि पत्री (तुळस, दुर्वा, बेल इत्यादी) आजोबा देवासाठी खुडून आणायचे आता मुंबई सारख्या शहरात रेडिमिक्स फुलपुडी येते. पूर्वी कापसाच्या वाती करून त्या तुपात भिजवून आजी देवासाठी वाती करायची. आता तर वेगवेगळ्या सुगंधांच्या रिडेमिक्स वाती सुद्धा मिळतात. एका ठिकाणी तर मी निरांजन लावण्यासाठी लायटर वापरताना पाहिलं आहे. तसा विचार करायचा तर लायटर म्हणजे रेडिमिक्स अग्नीच की !
तसं पाहिलं तर हल्ली रेडिमिक्सचाच जमाना आहे. सकाळी उठल्यापासून रेडिमिक्स कॉर्नफ्लेक्स सीरिअल चा ब्रेकफास्ट, रेडिमिक्स कॉफी किंवा चहा. एवढंच काय पण रेडिमिक्स किंवा ‘रेडी टू कुक’ पॅकेट मध्ये आता पनीर माखनवाला पासून अगदी साबुदाण्याच्या खिचडी पर्यंत सगळं मिळतं. मला आठवतंय की घरात डोसा करायचा म्हणजे आदल्या रात्री उकडे तांदूळ आणि उडीद डाळ भिजत टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याला मिक्सर ग्राइंडर मध्ये बारीक करून दिवसभर आंबत ठेऊन मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पिठाचा डोसा होत असे. माझ्या लहानपणी फक्त मॅगी दोन मिनिटात तयार होत असे. पण आता रेडिमिक्स जमान्यात डोसा सुद्धा दोन मिनिटात तयार व्हायला लागला आहे.
आता एका फोनमध्ये गुरुजी रेडिमिक्स पूजा साहित्यासकट हजर होतात. नेहेमीच्या सत्यनारायण पूजेसाठी सत्यनारायणाच्या किंवा दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी लक्ष्मी सरस्वती गणपतीच्या फोटोसहित मी ‘पूजा बास्केट’ नावाचा प्रकार विक्रिला आल्याचं पाहिल्यावर माणसाच्या सृजनशक्तीला मी मनोमन कुर्निसात केला होता.
एकदा एका मुलगी दाखविण्याच्या कार्यक्रमात मुलीच्या आईने “पोहे मुलीने केलेत बरं का !” असं कौतुकाने सांगितलं. त्या बैठकीत विशेष म्हणून आलेल्या मुलाच्या ‘लुडबुड आत्या’ने “पोहे कसे केलेस सांग बरं!” या (मुलीच्या आईच्या दृष्टीने’ उगाचच मुद्दाम आगाउपणे’) विचारलेल्या प्रश्नावर, “सोप्प आहे!. शेजारच्या वाण्याकडून रेडिमिक्स पोहे पाकीट आणायचं. त्यात थोडं पाणी घालायचं आणि मायक्रोवेव्ह मध्ये गरम केले की पोहे तयार ! ” असं त्या पोह्याच्या रेडिमिक्स ब्रँडची जाहिरात केल्यासारखं उत्तर दिलं म्हणे. यातला गमतीचा भाग सोडू पण लग्नाच्या ‘मार्केट’ मध्ये उपलब्ध झालेल्या मुलींना असा प्रश्न विचारला असता त्यातील काही जणींकडून तरी असं उत्तर येणारच नाही याची खात्री नाही. अर्थात आता समानतेचा जमाना असल्यामुळे ‘त्याला’ ही स्वयंपाक आलाच पाहिजे ही सुद्धा पूर्वअट असल्यामुळे खरतर आता ‘रेडिमिक्स पोहे’ ही मोठी सोय झाली आहे. आणि या पुढे ‘मुलगा दाखवण्याचे’ कार्यक्रम तितक्याच चिकित्सेने पार पडू लागतील किंबहुना लागलेही असतील याची शक्यता नाकारता येत नाही.
तसं पाहता मीही काही प्रमाणात रेडिमिक्स संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे. या रेडिमिक्स गोष्टींचा तोट्यापेक्षा फायदा अधिक आहे हे मला मनापासून वाटतं. उदाहरणार्थ पूर्वी एखाद्या माहितीसाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथालयात जाऊन संदर्भग्रंथ धुंडाळायला लागायचे त्यात श्रम आणि वेळ खूप जात असे आता गुगल नावाचं ‘माहितीचं रेडिमिक्स’ हाती लागल्यावर ते श्रम आणि वेळ तर वाचतोच पण माहितीही संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्ही दृष्टीने कितीतरी अधिक चांगली मिळते. आता अगदी काँक्रीटपासून ते चिंचखजुराच्या चटणीपर्यंत सगळंच रेडिमिक्स मिळतं यामुळे वेळ आणि श्रम यात प्रचंड बचत होते यात दुमत नाही.
फक्त मला प्रश्न कधी कधी असा पडतो की या वाचलेल्या वेळाचं आणि श्रमाचं मी काय करतो? इतक्या रेडिमिक्स सोयी सुविधा झाल्या, त्यामुळे जो वेळ आणि जे श्रम वाचतात त्याचा उपयोग माझ्या आयुष्यात गुणात्मक फरक होण्यात होतोय का? माझे छंद जोपासायला यातून मदत होत्ये का ? मी कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकतोय का? मी साहित्य संगीत किंवा तत्सम गोष्टी ज्या माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक आहेत त्यात अधिकाधिक वेळ घालवू शकतोय का? मी वेळ नाही म्हणून जो व्यायाम टाळतो तो करण्यासाठी मी तो वेळ वापरतोय का? वेळ आणि श्रम वाचवण्याच्या प्रचंड धडपडीतून मी स्वतःच ओढवून घेतलेल्या माझ्या रेडिमिक्स जीवनातून मला नक्की काय मिळतंय याचा शांतपणे विचार करायला तरी या वाचलेल्या श्रमाचा आणि वेळेचा उपयोग मी करतोय का?
देवाची पूजा करताना गंध उगाळायला वेळ नसेल आणि प्राणापान समान युक्त अन्नाचं सेवन करण्यासाठी एक एक करत ‘कवळ’ वदनी भरवून भोजन नावाचं यज्ञकर्म करण्यासाठी वेळ मिळत नसेल आणि या रेडिमिक्स वस्तूंमुळे वाचलेल्या श्रमांचा आणि वेळेचा खऱ्या जगण्यासाठी उपयोग होत नसेल तर या जीवनाच्या रेडिमिक्स पॅकेजचा खरंच काय उपयोग?
यावर पहिला उपाय म्हणून सजग राहून, ज्या रेडिमिक्स गोष्टी जीवनात आल्यामुळे माझा वेळ आणि श्रम वाचले तो वेळ ‘जगण्यात’ खर्च झाला की ‘जिवंत राहण्यात’ याचं स्वतःच माझ्यापुरतं ‘टाइम अँड एफर्ट ऑडिट’ करून स्वतः पुरता ऑडिट रिपोर्ट तयार करून त्यावर होऊ शकणाऱ्या उपाय योजनांचा विचार करण्यात तरी किमान वाचलेल्या वेळेचा आणि श्रमांचा सदुपयोग होऊ शकेल असं मनापासून वाटतंय. !