
मी नुकताच एक प्रसंग ऐकला. एकदा पंढरीची पन्नास वर्ष वारी करणाऱ्या एका वारकऱ्याला कुणी एका चॅनेलवाल्या अँकरनं खोचकपणे विचारलं,” आजोबा, एवढे कष्ट घेऊन, वेळ, पैसे खर्च करून पंढरीला येता पण इथे येणाऱ्या गर्दीमुळे विठुरायाचं दर्शन सुद्धा तुम्हाला नीट होत नाही. जेमतेम एका क्षणाच्या या दर्शनानं कशी काय भक्ती जडते आजोबा?”
ते वारकरी आजोबा मोठे इरसाल होते. त्यांनी विचारलं,” का रं बाबा ! लग्न झालया का तुजं ?”
त्यावर तो अँकर हो म्हणाला.
“काही प्वारं बाळं ?” आजोबांचा पुन्हा प्रश्न .
” हो एक मुलगा आहे छोटा” अँकरच उत्तर .
त्यावर वारकरी आजोबा म्हणाले, ” मग बायको पोराचा फोटू ठ्येवतो का न्हाय पाकिटात?”
त्यावर त्या अँकरने पुन्हा होकारार्थी मान हलवली.
त्यावर वारकरी आजोबा म्हणाले, ” मग तो फोटू दिवसातून किती येळा काढून बगतो?”
त्यावर त्या अँकरने उत्तर दिलं. “आजोबा तसं फार वेळा बघत नाही पण आठवण आली की बघतो कधीतरी.”
वारकरी आजोबांचा पुन्हा एकदा प्रश्न, ” किती येळ पाहतो रे फोटूकडं?”
“किती वेळ बघणार आजोबा, एक क्षण बघितलं तरी पुरतं हो, त्यांच्या जवळ असल्यासारखं वाटतं!” अँकरचं उत्तर.
मग ते वारकरी आजोबा म्हणाले, ” ह्ये झकास बोल्ला ! बरं आता सांग, तू मला इचारलेला प्रश्न पुन्हा इचारायचा हाय की मिळालंय उत्तर?”
तो प्रश्न ऐकून ओठावर लाचार हास्य आणि डोळ्यात शरम घेऊन तो अँकर दुसरीकडे वळला .
या प्रसंगाचा विचार करताना मला काही गोष्टी जाणवल्या.
पहिली म्हणजे आपण नुसते प्रश्न विचारून सुद्धा आपल्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं बिनतोड उत्तर देऊ शकतो. उत्तरादाखल उगाच चर्पटपंजरी लावण्याची गरज नसते.
दुसरी गोष्ट ही लक्षात आली की सगुणभक्ती पटवण्याचा हा अतिशय सोपा दाखला आहे.
आणि तिसरी गोष्ट ही की वारकरी भोळे, भावुक असतात आणि ते केवळ भाबड्या अंधश्रद्धेपायी विठुरायाच्या समचरणांचं क्षणैक दर्शन घेण्यासाठी इतका वेळ, पैसे खर्च करून आणि कष्ट सोसून उगाच येतात असा बुकं शिकलेल्या पंढरपेशांचा समज असतो तो अजिबात खरा नाही. या वारकरी आजोबांच्या बुद्धीनं, उत्तर देण्याच्या हातोटीनं आणि मिश्किल दाखल्यानं दिसून येतं की वारकरी भक्तिमार्गी असून भगवंताला शरण गेलेला असला तरी तो व्यवहारात सुबुद्ध आणि शहाणा असतोच.
मला या प्रसंगावरून एक अजून गोष्ट आठवली. मानसशात्रामध्ये एक प्रयोग खूप प्रसिद्ध आहे . त्या प्रयोगाला ‘रबर हॅन्ड एक्सपेरिमेंट’ असं म्हणतात. या संदर्भात युट्यूब वर छान विडिओ पण पाहायला मिळतात. या प्रयोगात एका माणसाला टेबलाजवळ एका खुर्चीत बसायला सांगतात. त्याचे दोन्ही हात कोपऱ्यापासून टेबलबर एकमेकांपासून दूर ठेवायला सांगतात. मग त्याच्या दोन हातांमध्ये एक पडदा किंवा तत्सम अपारदर्शक अडथळा ठेवतात. मग उजव्या हाताच्या शेजारी एक डाव्या हाताची रबराची प्रतिकृती ठेवतात. त्यावर त्या माणसाच्या खांद्यापासून ते त्या रबराच्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत शाल किंवा तत्सम काहीतरी पांघरतात जेणेकरून तो हात त्या माणसाच्या शरीराचाच भाग आहे असा आभास निर्माण करतात. मग प्रयोग करणारा शास्त्रज्ञ दोन ब्रश घेतो आणि त्या माणसाच्या खऱ्या आणि खोट्या अशा डाव्या हाताच्या बोटांवरून एकाचवेळी एकाच पद्धतीने फिरवतो. हळू हळू त्या माणसाला तो रबराचा हात आपलाच आहे असं वाटायला लागतं आणि तेवढ्यात तो शास्त्रज्ञ त्या रबराच्या हातावर प्रहार करतो. या अचानक झालेल्या प्रहारावर ती व्यक्ती जणू त्याच्या खऱ्या डाव्या हातावर कुणी प्रहार केल्याप्रमाणे प्रतिक्रिया देते.
मी हा व्हिडिओ जेव्हा पाहिला त्यावेळी मला सगुणोपासनेचं वर्म चटकन लक्षात आलं. काही क्षणांच्या आभासाने जर तो रबराचा हात आपला आहे असं त्या प्रयोगात भाग घेणाऱ्या मनुष्याला वाटायला लागतं, तर मग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युगं समचरणाने उभी असणारी विठुरायाची सावळी मूर्ती वारकऱ्यांच्या पिढीजात भावभक्तीने भरलेल्या मनाला का नाही आपली वाटणार? विठुरायाविषयी आस्था का नाही निर्माण होणार? आणि त्याच्याविषयी अद्वैतभाव का नाही जागृत होणार?
या भावनेनेच मग “आजी सोनियाचा दिनू। वर्षे अमृताचा घनू । हरी पहिला रे। हरी पहिला रे ” असं ज्ञानोब्बा माऊली म्हणाले किंवा “अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग।” असं किंवा “मी तू पण गेले दुरी” असं ‘चोखियाची महारी’ म्हणाली तर ते विज्ञाननिष्ठ म्हणवणाऱ्या मंडळींना का नाही पटणार ?
आता कुणी सगुणोपासनेविषयी शंका जरी काढली तर मी त्यांचे कान पकडून युट्युब वरचा ‘रबरहँड एक्सपरिमेंट’ दाखवणार आणि त्यांच्या डोळ्यावरची झापडं काढण्याचा प्रयत्न करणार. किंवा अगदीच कान पकडणं नाही जमलं तर त्या वारकरी आजोबांसारखा उत्तरादाखल ,” ‘रबरहँड एक्सपरिमेंट’ पहिला आहे का ?” हा प्रश्न विचारूनच त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देणार.