यशाच्या नशेचे विड्रॉवल सिम्टम्स – ३ मार्च २०१८

/ / marathi

मी काही दिवसांपूर्वी एका कलाकाराची जीवनी वाचत होतो. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला स्वप्नवत वाटावं असं त्या कलाकाराला यश मिळालेलं होतं. अत्यंत देखणं रूप, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता सर्वच. एका काळी तो कलाकार इतका यशस्वी होता की प्रत्येक उदयोन्मुख कलाकाराचं त्या कलाकारासारखं यशस्वी व्हायचं हेच ध्येय असायचं. पण पुढे त्या कलाकाराला व्यसन लागलं आणि हळू हळू तो त्याच्या इतका आहारी गेला की मिळालेलं सर्व ऐश्वर्य त्या व्यसनापायी निघून गेलं आणि संपूर्णपणे कंगाल होऊन तो दरिद्रावस्थेत अज्ञात काळाच्या पडद्याआड विरून गेला. ना कुणी त्या कलाकाराच्या निधनाची दखल घेतली ना त्याला त्याच्या मरणापूर्वीच्या भणंगावस्थेत कोणी मदत केली.  एके काळी त्याच्या दर्शनासाठी तासनतास त्याच्या घरासमोर तिष्ठत असणारे, त्याचा शब्द न शब्द झेलण्यासाठी तयार असणारे त्याचे चाहते, आणि इतर मित्र, सहकारी कुणीही त्याच्या अंतकाळी त्याच्यासोबत नव्हते. अतिशय भकास अवस्थेत अंत झाला त्या कलाकाराचा. मी या कलाकाराची जीवनी वाचत असताना, संपूर्ण जगभरातील संगीत, साहित्य, चित्रपट इत्यादी कलाक्षेत्रातील कलाकारांची अशी अनेक उदाहरणं डोळ्यासमोर तरळायला लागली आणि कुठल्यातरी व्यसनाच्या आहारी जाऊन कित्येक कलाकारांच्या बाबतीत हीच शोकांतिका कमी अधिक फरकाने घडलेली मला लक्षात आली. खरं तर इतर क्षेत्रातही अशी उदाहरणं खूप आहेत पण ती कलाकाराच्या संदर्भात अधिक ठळकपणे जाणवतात.

‘कलाकारांच्या बाबतीत असं का होत असावं’ असा मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा एक कलाकार म्हणून काय मनोव्यावापार होत असेल याचा एक आढावा घेऊ लागलो.  त्यावेळी मला माझ्या मैफिली आठवल्या आणि मैफिलीपूर्वी आणि मैफिलीनंतरच्या कलाकाराच्या मानसिकतेचा अभ्यास स्वतःकडे एक त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहत सूक्ष्मपणे करत गेलो. या विश्लेषणात माझ्या प्रश्नाचं उत्तर  त्या मैफिलीनंतरच्या कलाकाराच्या होत असलेल्या मानसिकतेत दडलेलं आहे हे मला लक्षात आलं.

एक सोलो संवादिनीवादक म्हणून मी जेव्हा जेव्हा मी मैफिल वाजवण्यासाठी जातो त्या वेळेला रंगमंचावर असताना त्या काळापुरता का होईना मी रंगमंचाच्या आकाराच्या त्या साम्राज्याचा सम्राट असतो. सर्वांच्या नजारा माझ्यावर  रोखलेल्या असतात. मी लोकांच्या कौतुकाच्या झोतात असतो. माझ्याकरवी मला उमगलेल्या आणि अवगत झालेल्या कलेची उधळण मी प्रेक्षकांवर करीत असतो. प्रेक्षकांच्या डोळ्यात माझ्या कलेचं, माझ्या सादरीकरणाचं कौतुक मला दिसत असतं आणि त्याची एक प्रकारची एक झिंग चढायला लागते. एक तर कला सादर करताना एक प्रकारची प्रचंड सकारात्मक ऊर्जा अंगात उत्पन्न होत असते. मन एक प्रकारच्या राजसी उन्मनावस्थेत असतं आणि त्यात प्रेक्षकांच्या डोळ्यांत दिसणाऱ्या कौतुकामुळे, त्यांच्या प्रकट वाहवाहीमधून, टाळ्यांच्या कडकडाटातून जी झिंग चढते त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून माझ्यातल्या कलाकाराचा अहं पोसला जातो. माझ्यासारखं जगात कोणीच नाही ही भावना त्यावेळी निर्माण होते. ती झिंग, ती मानसिक उन्मनीअवस्था वर्णनातीत असते. मी जी ही अवस्था माझ्या कार्यक्रमात अनुभवतो तीच अवस्था कुठल्याही रंगमंचावर आपली कला सादर करणाऱ्या कलाकाराची होत असावी असा माझा कयास आहे.

कार्यक्रम यशस्वी झाल्यावर मग कलाकाराला वेळ येते रंगमंचावरून उतरायची. कार्यक्रम संपला की आपली वाद्य आवरून त्या कार्यक्रमाच्या जागेवरून निघून जाण्याची. रंगमंचावरून उतरलं की  रंगमंचावरची ती अनुभवलेली झिंग, ती मानसिक उन्मनी उच्चावस्था हळू हळू उतरू लागलेली असते. कार्यक्रमानंतरही प्रेक्षक चाहते भेटायला कलाकाराचं कौतुक करायला रंगमंचाच्या मागे येत असतात. पण त्या गाठीभेटीत एक प्रकारची औपचारिकता असते. कलाकार त्या संवादात असून नसल्यासारखा असतो कारण मानसिक उन्मनावस्थेतून सामान्य परिस्थितीत परत येताना होणारी मनाची अवस्था अस्वस्थ करणारी असते. आणि ही अवस्था सहन झाली नाही तर ती झिंग, ती उन्मनी अवस्था पुन्हा मिळवण्याचा आणि त्याच मानसिक अवस्थेत राहण्याचा कलाकार प्रयत्न करू लागतो. अशावेळी कलाकारासमोर तीन पर्याय उरतात.

एक पर्याय असतो राजसी ज्यात तो कलाकार त्याच्या आजूबाजूला त्याचं सतत कौतुक करणाऱ्या तोंडपुज्या मंडळींचं कोंडाळं जमवतो आणि त्यांच्याकरवी स्वतःचं कौतुक सतत ऐकून त्याचा तो सूक्ष्म अहंकार पोसू लागतो. दुसरा पर्याय असतो तामसी पर्याय.  या पर्यायात तो कलाकार एखाद्या उत्तेजित करणाऱ्या द्रव्याच्या अमलाखाली राहून ती झिंग परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला हे दोन्ही पर्याय म्हणजेच राजसी आणि तामसी पर्याय कमी अधिक फरकाने आणि कमी अधिक मात्रेने पण एकत्रितपणे कलाकार निवडून त्या गोष्टी सतत करू पाहतो. हीच त्या कलाकाराच्या व्यसनाधीन होण्याची पहिली पायरी असते. आणि जसा जसा कलाकार यशस्वी होत जातो तसा तसा खिशातला पैसा आणि तोंडपुज्या माणसांचं कोंडाळं त्याच्याभोवती वाढत जातं आणि यशाची, पैशाची, कौतुकाची हवा इतकी डोक्यात जाते की कलाकाराचा अहंकार पराकोटीला जाऊन पोसला जातो. मग त्याची ही यशोगाथा, त्याची यशाच्या शिखरावर असण्याची परिस्थिती कधीच बदलणार नाही हा विश्वास त्या अहंकारापोटी त्या कलाकाराला येतो आणि मग त्याचा परिणाम त्याच्या कलेवर होऊ लागतो आणि मग त्या कलाकाराची उतरती कळा सुरु होते. त्याच्या कलेशी तो प्रतारणा करू लागतो. त्याच्या मायबाप चाहत्यांना तो गृहीत धरू लागतो. त्यामुळे त्याची कला आणि लोकप्रियता हळू हळू कमी होऊ लागते. त्यामुळे स्वार्थापायी जमलेलं तोंडपुज्यांचं कोंडाळं विरळ होऊ लागतं. या गोष्टीची जाणीव कलाकाराला अधिक भकास, एकटं करते आणि मग ते विसरण्यासाठी कलाकार अधिक नशा करू लागतो. हळू हळू या नशेमुळे पैसाही दूर होऊ लागतो आणि शेवटी व्यसनाच्या आहारी गेलेल्या कलाकाराला विपन्नावस्था प्राप्त होते. जीवन भकास होऊन जातं.

पण काही कलाकार मात्र ईश्वरकृपेने आणि त्यांच्यावर झालेल्या उत्तम संस्कारामुळे  तिसरा पर्याय निवडतात तो म्हणजे सात्विक पर्याय. हा पर्याय, हा उपाय ध्यानावस्थेतून परत येताना ध्यानमार्गातील किंवा योगमार्गातील लोक अवलंबतात.  या पर्यायात, कला सादरीकरणाच्या एका विशिष्ट उन्मनी मानसिक अवस्थेत वाढून पोसल्या गेलेल्या सूक्ष्म अहंकाराला “इदं न मम” असं म्हणून तो कलाकार जगन्नियंत्याला समर्पित करत असतो. त्याची कलासुद्धा तो त्या ईश्वराची अर्चना म्हणून भक्तिभावनेने आणि अर्पणभावनेने करतो. भगवदगीतेत सांगितल्याप्रमाणे तो सात्विक कर्ता होतो म्हणजेच कला सादरीकरणाचं कार्य जरी त्याच्या हातातून होत असलं तरी त्याचं कर्तेपण तो जगन्नियंत्याला देतो आणि “योग: कर्मसु कौशलम” या अवस्थेत राहून उत्तम कला सादर करूनही एका वेगळ्याच योगस्थितीत तो राहतो. पूर्ण जगभरात आणि विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीतात असे योगस्थितीला  पोहोचलेले सात्विक महान कलाकार आपल्याला नक्कीच सांगता येतील. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर किंवा उस्ताद बाबा अल्लाउद्दीन खानसाहेब ही जगद्मान्य आणि प्रकर्षाने आठवणारी दोन ठळक उदाहरणं.

एखाद्या झिंगलेल्या माणसाची झिंग कमी होऊ लागली की त्याला ‘विड्रॉवल सिम्टमस’ येतात असं वैद्यकशास्त्र सांगतं. हे  ‘विड्रॉवल सिम्टमस’ सहन न झाल्यामुळे तो नशेच्या आहारी गेलेला माणूस परत नशा करू लागतो. प्रत्येक यशस्वी कलाकाराने त्याच्या आयुष्यात अपयश खूप पचवलेलं असतं. किंबहुना अपयशाच्या खूप पायऱ्या खूप काळपर्यंत चढत राहिल्यानंतर कधीतरी यशाने त्यांना विजयमाला घातलेली असते. पण जो कलाकार अपयश इतक्या समर्थपणे पचवू शकलेला असतो तो कलाकार त्याला मिळालेलं यश मात्र बऱ्याच वेळा पचवू शकत नाही आणि मग यश कमी होऊ लागलं कि त्या “यशाच्या नशेचे ‘विड्रॉवल सिम्टमस” दिसू लागतात. आणि त्यावर उपाय म्हणून बहुतांशी कलाकार राजसी तामसी पर्याय निवडतात. कारण एक तर ते उपाय सोपे असतात आणि कलाकाराच्या अहंभावी मानसिकतेला पोसणारे असतात. या उलट जर कलाकार जेव्हा तो कलासाधना करत असतो तेव्हापासूनच आणि नंतर कलाकार म्हणून यशाच्या पायऱ्या चढायला लागल्यावर  कलासाधनेबरोबरच यशाची नशा उतरवण्याच्या सात्विक पर्यायाचा अभ्यास समांतरपणे करत गेला तर कुठल्याही कलाकाराला भौतिक यश तर सतत मिळेलच पण “यशाच्या नशेचे विड्रॉवल सिम्टमस” यांनाही कधीच सामोरं जावं लागणार नाही कदाचित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *