
नुकताच मी एका परिसंवादात भाग घेतला. परिसंवादात खूप अनुभवी, खूप विद्वान आणि खूप यशस्वी व्यक्तींनी भाग घेतला होता. प्रत्येकाची कहाणी, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांना मिळालेलं यश हे ऐकणं, आयुष्याच्या विविध कंगोऱ्यांवर त्यांच्याशी चर्चा करणं व्यक्तीगतरित्या खूप प्रेरणादायी ठरलं. त्या सगळ्या चर्चेत माझ्या सहवासात आलेल्याच काय पण जगात कुठेही यशस्वी झालेल्या व्यक्तीच्याबाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या माणसांवर यशाचे काही शारीरिक साईड इफेक्ट्स होतात. ते कुठले ?
1. त्यांच्या डोक्यात हेलियम किंवा तत्सम हवेत उंच उंच घेऊन जाणारे वायू कमी तयार व्हायला लागतात. आणि अधिक अनुभवांमुळे आणि ज्ञानामुळे ते अधिक जमिनीकडे झुकतात.
2. त्यांच्या कानांना ‘selective hearing’ ची व्याधी जडते. त्यांना इतरांचे चार मोलाचे बोल अगदी कुठूनही आले तरी ऐकू येतात. पण टीका किंवा “नाही” हा शब्द ऐकूच येत नाही.
3. त्यांच्या डोळयांना अर्धपारदर्शक चष्मा लागतो. म्हणजे स्वतःतील उणिवा आणि दुसऱ्यातील चांगल्या गोष्टीच दिसतात. या उलट दिसत नाही.
4. त्यांच्या शरीरातली वाढेल न वाढेल, पण त्यांची जिभेवरची शुगर मात्र खूप वाढलेली असते.
5. त्यांची झोप कमी होते कारण त्यांना डोळे उघडे ठेवून पहायची स्वप्न खूप मोठी आणि मोठ्या संख्येत पडायला लागतात.
6. त्यांचा हृदयाचा FSI वाढलेला असतो कारण आजूबाजूच्या लोकांना त्यांनी तिथे खूप सामावून घेतलेलं असत.
7. त्यांची अन्नाची भूक खूप कमी आणि यशाची भूक खूप वाढलेली असते.
8. त्यांच्या खांद्यातून बरेच अदृश्य हात फुटलेले असतात. आणि त्या अदृश्य हातांचा उपयोग ते अनेक दृश्य कामांचा उरका पाडण्यासाठी करतात.
9. ते अधिकाधिक परावलंबी होतात. कामांसाठी सहकाऱ्यांवर आणि कर्तेपणासाठी ईश्वरावर अवलंबून राहतात.
10. त्यांच्या बुद्धीवर परिणाम होतो. आयुष्यभर कष्टाने उभं केलेलं, मिळवलेलं ते बरचसं ज्या समाजानी त्यांच्यावर टीका केलेली असते त्या समाजासाठीच ते खर्च करतात.
मला तर वाटतं, देवसुध्दा यशाचं माप पदरात टाकायला अशी साईड इफेक्ट होणारीच शरीरं निवडतो बहुतेक….