
माझे आजोबा आणि नंतर माझे वडील यांच्याकडून मी एक कवन लहानपणापासून ऐकत आलो आहे. अदमासे शंभर वर्षे तरी ते कवन आमच्या कुटुंबात परंपरेने म्हटलं जातं आहे. ते कवन असं
सावधान सावधान ।
वाचे बोलो राम नाम ।
सावधान सावधान ।। धृ।।
दश वर्षे बालपण ।
वीस वर्षे तारुण्य ।
अंगी भरलासे मदन ।
तेथे कैसा नारायण ।
सावधान सावधान ।।१।।
तीस वर्षे पूर्ण होती।
धन, दारा लागे प्रीती।
त्यायोगे पडेल भ्रांती।
कुणी नको हो सांगाती।
सावधान सावधान ।।२।।
चाळीस वर्षे भरली।
डोळा चाळीशी आली।
नेत्रासी भूल पडली।
कुणी दिसेना जवळी।
सावधान सावधान ।।३।।
पन्नास वर्षे होती।
हलती दातांच्या पंक्ती।
कृष्णकेस शुभ्र होती।
त्याला म्हातारा म्हणती।
सावधान सावधान ।।४।।
साठीची बुद्धी नाठी।
हाती घेऊनिया काठी।
वसावसा लागे पाठी।
त्याला हासती कारटी।
सावधान सावधान ।।५।।
सत्तरीची होय रचना।
बसल्या जाग्या उठवेना।
गळाले हात पाय ।
प्राणी दिसे दैन्यवाणा।
सावधान सावधान ।।६।।
चार वीसा गुणुनी ऐशी।
जीव होतो कासविसी ।
जळावीण मत्स्यी जैसी ।
तैसी तळमळ जीवासी।
सावधान सावधान ।।७।।
वर्षे भरली ती नव्वद।
मुखी निघेना हो शब्द।
दारा, पुत्र म्हणती प्रसिद्ध।
देवा सोडी यांचा संबंध।
सावधान सावधान ।।८।।
शतमान पुरुष झाला।
नामावीण वाया गेला।
रामदास सावध झाला।
रामभजनी लागला।
सावधान सावधान ।।९।।
या कवनात काहीतरी गारूड आहे नक्की. कारण वर्षानुवर्ष हे कवन ऐकत असून सुद्धा कधीच याचा कंटाळा येत नाही आणि हा केवळ माझाच नाही तर अनेक लोकांचा अनुभव आहे. मला असं वाटतं की संपूर्ण मानवी जीवनपट यात इतक्या सोप्या शब्दात मांडलाय की त्या सोपेपणातच त्याची शक्ती आणि त्याचा गोडवा भरला आहे.
मी जेव्हा जेव्हा हे कवन ऐकतो तेव्हा आनंद होतोच पण खरं सांगायचं तर माझ्या हृदयाचे ठोकेही वाढतात. कारण ज्या आयुष्याला तरुणपणात अध्यारुत धरतोय त्याच आयुष्याचं पुढच्या काळातलं चित्रण मला कुठेतरी मनात कातर करून जातं. काळ झरझर पुढे सरकतोय आणि मी माझ्याच धुंदीत आहे याची जाणीव या कवनामुळे तीव्र होते.
मानवी जीवनाचा सखोल विचार करून पूर्वीच्या ऋषी मुनींनी चार भाग पाडले. साधारण शंभर वर्षाच आयुष्य गृहीत धरून पहिली पंचवीस वर्ष ब्रह्मचर्याश्रम म्हणजे शिक्षण, नंतरची पंचवीस गृहस्थाश्रम म्हणजे संसार, नंतरची पंचवीस वानप्रस्थाश्रम म्हणजे समाजसेवा, आणि शेवटची पंचवीस संन्यासाश्रम म्हणजे अध्यात्मसाधना असे साधारण विभाग पाडलेले आहेत. पूर्वसूरींनी त्या त्या आश्रमात व्यक्तीची अपेक्षित कर्तव्य खूप स्पष्ट पद्धतीने मांडली आहेत. या आश्रमांचं चिंतन करताना मला असं लक्षात आलं की एका आश्रमात जीवन जगत असताना व्यक्तीने पुढच्या आश्रमाची तयारी करणं आवश्यक आहे आणि अपेक्षितही. जसं तरुणपणात उत्तम धनार्जन करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक शिक्षणाची तरतूद अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी बालवाडी शाळेपासून होते. तसंच जर पन्नाशीनंतर समाजसेवेत जीवन व्यतीत करून आपल्या शक्तीचा उपयोग समाजासाठी करायचा असेल तर गृहस्थाश्रमात असतानाच काही काळ समाजासाठी आणि काही काळ अध्यात्मासाठी काढणं आवश्यक आहे. बालवयात जर काहीच शिक्षण घेतलं नाही आणि तरुणपणी एकदम पैसे मिळवायला सांगितले तर ते जसं शक्य नाही तसंच पन्नाशीनंतरचं समाजजीवन आणि पंचाहत्तरीनंतरचं अध्यात्मिक जीवन कुठल्याही तयारीविना उत्तमपणे व्यतीत होईल असं कसं म्हणता येईल.
तरुणपणात नोकरीव्यवसायात पूर्णपणे व्यग्र व्यक्ती निवृत्तीनंतर खूप सैरभैर झालेल्या मी पहिल्या आहेत. हातातल्या वेळेचं आणि अंगातल्या शक्तीचं काय कारायचं असा प्रश्न त्यावेळी बहुतकरून पडलेला असतो. मी जेव्हा अशा व्यक्ती पाहतो त्यावेळी असं लक्षात येत की त्या व्यक्तींनी आणि त्यांच्या सारख्या अनेकांनी अंगात शक्ती असतानाच म्हातारपणाची प्रॅक्टिसच केली नाहीये.
हे माझ्या बाबतीत घडू नये म्हणून मी काय करावं याचा जेव्हा विचार झाला तेव्हा मला म्हातारपणाच्या प्रॅक्टिसचे काही उपाय सुचले.
1. दिवसभरात अर्धा तास तरी काहीही बाह्यसाधनांशिवाय (दूरदर्शन, वर्तमानपत्र, फेसबुक, व्हाट्सअप्प, इंटरनेट) काहीही न करता स्तब्ध राहून मला स्वतःला स्वतःत रमता आलं पाहिजे.
2. आठवड्यातील काही वेळ समाजसेवेसाठी द्यायला सुरुवात करावी लागेल. ही समाजसेवा करताना मी समाजावर काही उपकार करत नसून समाजसेवा ही माझ्या उन्नतीसाठी सुरू आहे हा भाव मनात ठेवावा लागेल.
3. म्हातारपणी खूप व्याधी अंगात शक्ती नसताना सहन कराव्या लागतात. त्याची प्रॅक्टिस म्हणून होणारे छोटे छोटे शारीरिक त्रास सहन करण्याची प्रॅक्टिस सुदृढ असतानाच केली पाहिजे. उदाहरणार्थ कधीतरी अर्धा तास पंखा किंवा वतानुकूल यंत्रशिवाय गर्मीत रहायचा प्रयत्न करायचा.
4. आजूबाजूला मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीबद्दल तक्रार किंवा नाराजी व्यक्त करण कमी करायचं. माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या स्वभावाला थोडी सवलत देण्याची सवय आत्तापासून लावायचा प्रयत्न करायचा.
5. दिवसातला निदान अर्धा तास उपासना किंवा नामस्मरण इत्यादींसाठी मुद्दाम काढण्याची सवड सवय आणि आत्तापासूनच करायला हवी.
6. एकंदरीतच राजकारणा पासून ते पेट्रोलच्या भावापर्यंत ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही त्याविषयी उगाच चर्चा वा कटकट न करणे
यादी करायची तर मोठीच होईल पण निदान म्हातारपणाच्या या अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रॅक्टिसमुळे क्षणाक्षणाने सरणाऱ्या काळाची आणि अटळ वर्धक्याची जाणीव राहील आणि कवनात सांगितल्याप्रमाणे ‘सावधान सावधान’ म्हणत आयुष्याचा तो तो टप्पा ओळखून त्यात आपलं कर्तव्य करताना नामस्मरण आणि समाधानाने तो टप्पा व्यतीत होईल एवढं मात्र नक्की.