मी आणि माझा राष्ट्रवाद – १८ एप्रिल २०१९

/ / marathi

काल ताशकंत फाईल्स हा सिनेमा पहिला. एक कलाकार म्हणून एक सिनेमा पाहतो आहे इतक्या तटस्थतेनं पहिला. कुठल्याही रंगाच्या चष्म्याशिवाय पहिला. कुणाचाही भक्त म्हणून कुठलीही टोपी डोक्यावर न ठेवता पहिला. त्या सिनेमाची समीक्षा हा या लिखाणाचा उद्देश नाही. एक राष्ट्रप्रेमी सामान्य नागरिक म्हणून जे तरंग मनात उठले ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
१. एक सिनेमा म्हणून निर्माता, दिग्दर्शक, कलाकार आणि या चित्रपटाच्या निर्मितीत भाग घेतलेल्या अगदी स्पॉटबॉय पासून सगळ्यांचं मनापासून कौतुक. एक चित्रपट बनवणं यामागची मेहेनत किती असते याची पूर्ण जाणीव असल्यामुळे सर्व चमूला या चित्रपटनिर्मितीसाठी हॅट्स ऑफ !! खरोखर एक अप्रतिम कलाकृती पाहिल्याचा अनुभव हा चित्रपट पाहताना येतो. त्यामुळे एक कलाकृती म्हणून तिकीट फूल वसूल आहे !

२. चित्रपटात मुख्य विषय कुठेही ढेपाळलेला नाही.  त्यातील वेग आणि पात्रांचे अभिनय यामुळे या चित्रपटानं मला पूर्णवेळ खिळवून ठेवलं.

३.कुठल्याही प्रकारचा आव न आणता तथ्यावर आणि पूर्ण संशोधन करून, त्यावर विचार करून केवळ सत्य समोर आणण्याचा प्रयत्न होतोय हे मला संपूर्ण चित्रपट पाहताना जाणवलं.

४. सर्वसाधारणतः प्रत्येक गोष्टीत नायक आणि खलनायक असतो. तो चित्रपट पटकथेच्या दृष्टीने मुद्दाम रंगवलाही जातो. यात पटकथाकारानं त्याच्या पटकथेतून आणि दिग्दर्शकानं त्याच्या  मांडणीतून इतक्या सफाईनं हा चित्रपट बांधला केला आहे की यात नायक किंवा खलनायक रंगावण्याचा मुद्दाम प्रयत्न केला आहे असं दिसत नाही. उलट नायक आणि खलनायक हा प्रत्येक प्रसंगानुरूप एक प्रेक्षक म्हणून माझ्या मनात  आपोआप रंगत जात होता हा मला अनुभव आला.

५. यात प्रेक्षकांना कुठलीच टोपी चढवण्याचा, किंवा मुद्दाम कुणाची टोपी उडवण्याचा उद्देश मला तरी दिसला नाही. उलट ऐतिहासिक घटनांकडे सत्यशोधन या उद्देशाने कसं पहावं याचा विचार करण्यास भाग पाडणं हा या चित्रपटातील मुख्य उद्देश जाणवला.

६. समाजात असणारी अनेक स्तरातील मंडळी आणि त्यांचे सामाजिक उद्देश आणि मानसिक कंगोरे वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून या चित्रपटात अप्रतिम मांडलेले आहेत. प्रत्येकाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने प्रत्येक जण त्याच घटनेकड़े कसा वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतो यातील मानसशास्त्र दाखवण्याचा अप्रतिम प्रयत्न दिसला.

७.  या चित्रपटात मला जाणवलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्य, स्वार्थ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, वैयक्तिक महत्वाकांशा, वैचारिक महत्वाकांशा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवाद, दहशतवाद यांच्या व्याख्या.  या व्याख्यांची पार्श्वभूमी, या संकल्पनांच्या आधारानं उभं असलेलं सत्ताकारण, समाजकारण आणि अर्थकारणसुद्धा . या व्याख्या करण्यामागची भूमिका आणि त्यातील क्लिष्ट गुंतागुंतीचा उहापोह या निमित्ताने करण्याचा लेखक, दिग्दर्शकाचा प्रयत्न अभिनंदनास पात्र आहे. याच व्याख्यांच्या प्रकाशात राष्ट्रवाद आणि दहशतवाद यांचा एकसंध राष्ट्राचा एक महत्वाचा घटक म्हणजे या राष्ट्राच्या नागरिकाच्या दैनंदिन जीवनावर होणारा त्याचा परिणाम याची सर्वांगसुंदर मांडणी या चित्रपटात केली आहे.

८. मी एका राष्ट्राचा घटक म्हणून माझ्या राष्ट्राच्या इतिहासाकडे , त्यातील तथ्यांच्या आणि सत्याच्या मुळाशी जाण्याचा विचार मी केला पाहिजे आणि त्या अभ्यासावर, माझ्या इतिहासाच्या आकलनावर आणि विश्लेषणावर आधारित माझ्या पुढच्या पिढ्यांचा इतिहास माझ्या सद्य वर्तमानातील माझ्या कृतींनी मी पुढच्या पिढ्यांना देणार आहे हे मला प्रकर्षानं जाणवलं. इतिहासात काय घडलं असेल यात थोडी संदिग्धता असू शकते आणि त्यातून वेगवेगळे अर्थ सोयीनुसार काढलेही जाऊ शकतात पण आजच्या वर्तमानात उद्याचा इतिहास घडवण्याची माझ्यापुरती ताकद माझ्यासारख्या एका सामान्य नागरिकाच्या हातात आहे हा माझ्यापुरता राष्ट्रवाद मला समजावून देण्यात हा चित्रपट  यशस्वी ठरला आहे हे नक्की. एखादी समाजघातक घटना घडण्यात खलनायकाच्या दूष्प्रवृत्त कृतीपेक्षा सर्वसामान्यांच्या निष्क्रियतेचा दोष अधिक असतो असं इतिहास सांगतो. म्हणून माझ्या राष्ट्रासाठी निदान माझ्यापुरतं तरी सक्रियता दाखवणं हे माझं कर्तव्य आहे हे या चित्रपटानं माझ्यापुरतं तरी अधोरेखित केलं अस मी नक्कीच म्हणेन.

वर नमूद केलेलं माझं अनुभवकथन पटो अथवा न पटो पण एका अप्रतिम कलाकृतींचा आस्वाद म्हणून हा चित्रपट लवकरात लवकर तिकीट काढून सर्वांनी पहावा हा माझा सर्व सुहृदांना मनःपूर्वक आग्रह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *