
माझ्या भावाने मला नुकताच घडलेला एक गमतीशीर प्रसंग सांगितला. तो आणि त्याचा ८-९ वर्षाचा मुलगा एकदा एका
मंदिरात गेले होते. दर्शन झाल्यावर थोडावेळ दोघेही तिथे बसले. येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच गर्दी होती. शनिवारचा
दिवस होता म्हणून भक्तमांदियाळी मारुतीरायांकडे जरा अधिकच होती. सगळ्या भक्तमंडळींच्या नमस्काराच्या आणि
पूजेच्या वेगवेगळ्या तऱ्हा तो मुलगा पाहत होता. त्याच्या डोक्यात काय सुरु होतं ते त्यालाच माहित पण थोडा वेळ
झाल्यावर त्याने एक निरागस प्रश्न आपल्या बाबांना विचारला. ‘बाबा काही लोक दर्शन घेताना मारुतीबाप्पाला फ्लाईंग
किस का देतात?’ माझ्या भावाला काय उत्तर द्यावं हा प्रश्नच पडला. ‘अरे असेल काही जणांची ही नमस्काराची पद्धत’
असं काहीतरी गुळमुळीत सांगून वेळ मारून नेली त्याने आणि पुन्हा प्रश्नांची सरबत्ती सुरु होईल या भीतीने लगेच तिथून
उठून मुकाट्याने माझा भाऊ माझ्या पुतण्याला घरी घेऊन आला. हा प्रसंग जेव्हा माझ्या भावाने मला सांगितला तेव्हा
आम्ही सगळेच अगदी मनापासून हसलो. मी कल्पना केली आणि एक क्षणभर मारुतीरायांच्या भूमिकेत शिरलो.
चिरंजीव, ब्रह्मचारी मारुतीरायांची त्यांच्या भक्तांनी हवेवर पाठवलेले असे फ्लाईंग किस घेताना काय पंचाईत होत
असेल असा विचार करून मलाच कसंसं झालं तर त्या मारुतीरायांचे काय हाल होत असतील याची कल्पनाही मला पुढे
करवेना.
साधारणपणे उजव्या हाताच्या पहिल्या बोटाचा आकडा करून एकदा ओठावर मग डोक्यावर मग पुन्हा ओठावर मग
गळ्यावर मग पुन्हा ओठावर अशा पद्धतीने हा ‘फ्लाईंग किस नमस्कार’ चालतो. ज्याची श्रद्धा अधिक किंवा ज्या
देवाला अधिक साकडं घालायचं तेवढी त्या देवाला ‘फ्लाईंग किस’ची आवर्तनं अधिक असं काहीतरी गणित असावं बहुदा.
या नमस्कार पद्धतीचा उगम कुठे आणि कसा झाला कुणास ठाऊक पण साधारण ख्रिश्चन पद्धतीत क्रॉसला किस
करतात त्यासदृश हा ‘फ्लाईंग किस नमस्कार’ असतो साधारण. जसजसा मी अधिक विचार करू लागलो तसं लक्षात
आलं की या ‘फ्लाईंग किस नमस्कार’ पद्धतीतून कुणीच सुटलं नाहीये. त्यातल्यात्यात रस्त्यातून जाताजाता ज्या
देवळातली देवाची मूर्ती रस्त्यावरूनच दिसते त्या देवाला हे ‘फ्लाईंग किस नमस्कार’ अधिक पोचते होतात असं माझं
निरीक्षण आहे. साधारणतः साईबाबांची झाडाखालची छोटी देवळं, झाडाखालचे शेंदूरचर्चित मारुतीराया इथपासून ते
रस्त्यातून दर्शन घेता येतं अशा दगडूशेट हलवायाच्या गणपतीबाप्पापर्यंत सगळ्यांना हे ‘फ्लाईंग किस नमस्कार’ जाता
येता नियमित पोहोचत असतात असं निरीक्षणांती मला लक्षात आलं आहे. मला असं वाटत की दोन हात जोडून, डोळे
मिटून, देवाचं ध्यान डोळ्यासमोर आणून मनःपूर्वक प्रार्थना करणे याला लागणारा वेळ हल्लीच्या धावपळीच्या
जीवनपद्धतीत मिळत नसल्यामुळे हा शॉर्ट अँड स्वीट ‘फ्लाईंग किस नमस्कार’ अधिक लोकप्रिय झाला असावा. चपला
न काढता, चालण्याचा वेग कमी न करता, देवाची मूर्ती दिसायला लागल्यापासून ते दिसेनाशी होईपर्यंत रस्त्यातूनच
मान वाकडी करून बोटाचा आकडा करून ‘फ्लाईंग किस’ नमस्काराची आवर्तनं देवावर लांबूनच उडवली जातात. त्या
नमस्काराच्या बदल्यात त्या देवाकडून आशीर्वाद मिळाला की नाही, किमानपक्षी नमस्कार केल्यानंतर मनात जे
सात्विक भाव निर्माण व्हायला पाहिजेत ते होतात की नाही हे तपासून बघायला वेळ आहे कुणाला तेवढा? गम्मत
म्हणजे काही काही भक्तमंडळींना तर मोबाईलवर बोलता बोलता त्याच वेळेला देवाला फ्लाईंग किस नमस्कार
केल्याचंही मी बऱ्याचवेळा पाहिलं आहे. मोबाइलवर बोलणे, एकीकडे घड्याळात पाहून ट्रेन किंवा बसची वेळ चुकत नाही
ना याची खातरजमा करून घेणे, रास्ता क्रॉस करणे, त्याचवेळी रस्त्यावरचे खड्डे, घाण चुकवणे, त्याचवेळी अंगावर
येणारा ट्रॅफिक हुकवणे, एखादा परिचित रस्त्यात दिसलाच तर दुरूनच हात करून त्याला अभिवादन करणे आणि या
सगळ्यात नेहेमीच्या वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली छोट्याश्या देवळात असणाऱ्या देवाला दररोजचा फ्लाईंग
किस नमस्कार पोहोचता करणे या सगळ्या गोष्टी एकावेळी चाललेल्या असतात. अष्टावधानी असणं म्हणजे काय याच
उत्तम उदाहरण देता येईल या माणसांकडे पाहून.
जसा हा ‘फ्लाईंग किस’ नमस्कार तसाच दुसरा प्रकार म्हणजे ‘गुडघाधरू नमस्कार’. कोणी मोठी व्यक्ती दिसली की
थोडंसं कमरेत वाकून त्या व्यक्तीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचून एकाच हाताने गुढग्याला हात लावून नमस्कार करणे याला
मी ‘गुडघाधरू नमस्कार’ असं म्हणतो. साधारणतः कलाक्षेत्र, सिनेमाक्षेत्र, राजकारण इत्यादी ठिकाणी हे ‘गुडघाधरू
नमस्कार’ अधिक पाहायला मिळतात. मनात असो किंवा नसो, निदान लोकलाजेस्तव, आपली निष्ठा व्यक्त
करण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीला नमस्कार करतो त्याला थोडा मान मिळाल्यासारखं वाटावं म्हणून हा ‘गुडघाधरू
नमस्कार’; केला जातो असं माझं निरीक्षण आहे.
‘गुडघाधरू नमस्कार’ असो किंवा ‘फ्लाईंग किस नमस्कार’ असो, या अशा प्रकारचे नमस्कार लोक का करत असतील
याचा थोडा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार कशासाठी
करायचा असतो याची संकल्पनाच विसरल्यासारखी झाली आहे. अन्नाला पूर्णब्रह्म मानून श्रीहरीचे नाम घेता घेता
वदनी कवळ घेण्याऐवजी फास्टफूड सेंटरवरून वडापाव किंवा समोसापाव विकत घेऊन त्याचे घास रस्त्यात खात खात
जाताना ज्यांना काहीच वाटत नाही, आशा मनोवस्थेच्या मंडळींना या ‘फ्लाईंग किस’ नमस्कारामध्येही काहीच वावगं
वाटत नसावं असा माझा अंदाज आहे. कारण अन्नग्रहण काय किंवा नमस्कार काय या देहापेक्षाही मानसिक क्रिया
अधिक आहेत हे विसरल्याचा हा परिणाम असावा कदाचित. फास्ट फूड अन्नाने नुसताच अन्नमय कोष भरेल
एखादवेळा पण प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशाचं पोषणही आपलं अन्नच करतं हे शिकवलं जातं
का हल्ली? नमस्कार करण्यामागे आपल्या कर्तेपणाचा लय होणे आणि ज्याला नमस्कार करतो त्या तत्वातील सात्विक
शक्ती आपल्यामध्ये संक्रमित होण्याची क्रिया नमस्कारात घडली नाही तर ती एक शारीरिक क्रिया बनून राहते, पण त्या
नमस्काराचा फार उपयोग नाही हे लक्षात किती जणांच्या येत असेल ? कोणीही जेव्हा कोणालाही नमस्कार करतो
त्यावेळी आपोआप ज्याला नमस्कार केला जातो त्याच्या मनात जो नमस्कार करतो त्या व्यक्तीसाठी जे आशीर्वचन
उमटतं ते संक्रमित पोहोचण्याइतका तरी वेळ आणि लक्ष नमस्कार करताना नको का? जे ‘फ्लाईंग किस नमस्कार’
करतात त्यांच्या श्रद्धेबद्दल शंका नाहीये माझ्या मनात आणि सश्रद्ध मानाने केलेला ‘फ्लाईंग किस नमस्कार’ न
जाणो देईल सुद्धा श्रद्धेचं फळ. पण याच श्रद्धेला नमस्काराच्या विज्ञानाची, आणि सजग मानसिकतेची जोड दिली तर
खरंच तो नमस्कार अधिक फळणार नाही का?
माझ्या पुतण्याचा मनात पडणारा प्रश्न हा नवीन पिढीतील हजारो लाखो मुलांच्या मनात असणारा प्रश्न असेल
कदाचित. माझ्या पुतण्याने तो विचारला, काही जण विचारणारही नाहीत उघडपणे, पण या प्रश्नामागची आणि
त्याअनुषंगाने सध्याच्या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेतली नाही आणि वेळेवर हे नमस्कारामागचं मानसशास्त्र
मुलांपर्यंत पोहोचलं नाही तर आज पासून काही वर्षांनी दोन हात जोडून डोळे मिटून नमस्कार करणाऱ्या माणसाला ‘हा
कोण वेडा आलाय’ अशा वेगळ्या नजरेने लोक बघतील आणि सगळेच देव फ्लाईंग किस नमस्कारांनी चिंब न्हाऊन
निघत असतील असं चित्र आत्ताच डोळ्यासमोर येतंय माझ्या…