
काही दिवसापूर्वी एक माणूस मला भेटला. एका मित्रामुळे त्यांची आणि माझी ओळख झाली. फारशी ओळख नसून तो खूप मित्रत्वाने वागत होता माझ्याबरोबर. एक दोन वेळा भेटल्यावरच त्याने मला एका कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं. इतकच नव्हे तर त्याचा गाडीतून मला घेऊन जाण्याची तयारीही दर्शवली. मी त्याला विचारलं की काय कार्यक्रम आहे तर त्यावर त्यानं मला अगदी वचनच दिलं की “माझ्यावर विश्वास ठेवून ये. तुझं आयुष्य बदलून जाईल असं काहीतरी आहे”. मी कुतूहल म्हणून गेलो. तो एक सेमिनार होता. विषय होता ‘मल्टि लेवल मार्केटिंग’ (MLM) चा. त्या कार्यक्रमात एकंदरीत एखाद्या कंपनीची प्रॉडक्ट विकण्यासाठी माणसांच्या जोडणीतून कसं पिरॅमिड बनत जातं आणि त्या पिरॅमिड चा वापर करून त्या कंपनीचा माल कसा विकला जातो आणि पुढे पुढे त्या पिरॅमिडच्या वरच्या भागात असणाऱ्यांना कसा गलेलठ्ठ चेक दर महिन्याला काही न करता मिळत राहतो, वगैरे वगैरे बरीच चर्चा मी ऐकली. त्यातून माझ्या त्या नवमित्राला माझ्या मैत्रीत इतका का इन्टरेस्ट होता तेही लक्षात आलं. MLM हे बऱ्याच जणांना फायदेशीर झालं असेलही कदाचित पण मी काही त्या पिरॅमिडचा एक दगड होण्यासाठी बधलो नाही. आणि माझ्यात केलेली वेळ आणि शक्तीची गुंतवणूक वाया गेली हे स्वच्छ भाव त्या नवमित्रच्या चेहऱ्यावर पहात पहात मी त्याच्याच गाडीतून घरी परत आलो. उगाच रविवारचा अर्धा दिवस फुकट गेला ही चुटपुट मात्र माझ्या मनाला लागली होती.
पण तो काहीतरी विशेष दिवस असावा किंवा योगायोग म्हणा कदाचित, पण संध्याकाळी एखादा सिनेमा बघावा म्हणून एका इंग्रजी चॅनेलवर एक नुकताच सुरु झालेला सिनेमा पाहायला लागलो. त्या सिनेमाचं नाव होतं “पे इट फॉरवर्ड” (Pay It Forward). शाळेतला एक शिक्षक एक प्रकल्प मुलांना करायला सांगतो ज्यामुळे मुलांच्या आजूबाजूच्या व्यंक्तींच्या आयुष्यात काहीतरी परिणाम घडेल. त्यावर त्यातला एक मुलगा, जो सिनेमाचा खरा हिरो, तो एक कल्पना मांडतो. तो म्हणतो ” मी दररोज केवळ तीन वेगळ्या लोकांसाठी आपल्या शक्तीनुसार अशी गोष्ट करणार की ज्यामुळे त्यांचा दिवस खूप छान जाईल. आणि त्यांनाही त्याच प्रमाणे दररोज त्यांच्या माहितीतल्या तीन लोकांसाठी एक छान गोष्ट करायला विनंती करणार.” ती कल्पना हळू हळू मूळ धरते आणि प्रत्येकजण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी यथाशक्ती काहीतरी चांगली गोष्ट करायला लागतात आणि त्याचा एकंदरीत परिणाम काय होतो हे त्या चित्रपटातून दाखवलं आहे. एकदा तरी जरूर पहावा असा अप्रतिम सिनेमा आहे तो.
मी स्वतः माझ्या आयुष्यात याचा अनुभव घेतला आहे. जवळजवळ २० वर्षांपूर्वी माझं व्यावसायिक व्यक्तिमत्व घडवणाऱ्या माझ्या पहिल्या बॉसला मी विचारलं होतं की “तू माझ्यासाठी इतकं केलं आहेस त्याची मी परतफेड कशी करू शकेन?” त्यावर तो मला म्हणाल्याचं स्पष्ट आठवतंय की, “पुढे आयुष्यात तुझ्या हाताखालच्या निदान ४ माणसांना जर तू त्यांच्या व्यवसायिक जडणघडणीत मदत करू शकलास तर तुझ्यावर खर्च झालेली माझी शक्ती आणि वेळ सत्कारणी लागला असं मी समजेन !”
मी जेव्हा MLM किंवा ‘पे इट फॉरवर्ड’ या संकल्पनेचा खोलवर विचार करू लागलो तेव्हा लक्षात आलं की भारतीय संस्कृतीत आपण एक प्रार्थना दररोज म्हणतो,
“ॐ सर्वे भवन्तु सुखिनः ।सर्वे सन्तु निरामयाः ।सर्वे भद्राणि पश्यन्तु ।मा कश्चिद्दु:खभाग्भवेत्।ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
याचा अर्थ असा की
“सर्व सुखी होवोत, सर्वांचं आयुष्य निरामय होवो, सर्वांना पवित्र गोष्टी दृष्टीस पडो आणि कुणालाही दुःखाचा अनुभव न येवो. सर्वत्र त्रिकाळ शांती नांदो”
सर्वांचं सुख चिंतणारी ही प्रार्थना, दररोज म्हणण्यासाठी आणि सकारात्मक विचार जगात पसरवण्यासाठी तर उत्तम आहेच. पण मनात आलं, की ही प्रार्थना प्रत्यक्षात, माझ्या कृतीत दररोज आणण्यासाठी MLM, किंवा ‘पे इट फॉरवर्ड’ सारख्या संकल्पना मला अमलात आणता येतील का? मग अधिक विचार करायला लागल्यावर खूप संधी आजूबाजूलाच दिसू लागल्या. उदाहरणार्थ आमची सोसायटी दररोज झाडणाऱ्या आणि आमच्या घरचा कचरा घेऊन जाणाऱ्या झाडूवालीला कधीतरी एक कप चहा मी देऊ शकतो. पावसात रिक्षाची वाट पाहत भिजत असणाऱ्या एखाद्या वयोवृद्धाला मी रस्त्यावर पाहिल्यावर त्यांच्या मुक्कामापर्यंत किंवा अगदी वाट वाकडी करायची नसेल तर निदान त्यांना रिक्षा मिळण्याच्या ठिकाणापर्यंत तरी मी माझ्या गाडीतून घेऊन जाऊ शकतो. एखाद्या गरीब मुलाला विनामूल्य एखादा विषय शिकवू शकतो. घरी येणाऱ्या पोस्टमनकाकांना कधीतरी एक पेला सरबत देऊ शकतो. आणि अशा कितीतरी छोट्या मोठया गोष्टी मी दिवसभरात करू शकतो. आणि जर कुणी विचारलंच तर, किंवा संधी मिळेल तेव्हा ‘पे इट फॉरवर्ड’ ची संकल्पना सांगू शकतो आणि शक्यतो ती त्यांनाही अमलात आणायची विनंती करू शकतो. अर्थात यात एक नियम पाळायचा असा की केलेल्या चांगल्या गोष्टीची जाहिरात किंवा उल्लेखही कुठे करायचा नाही. नाहीतर सात्विकतेचाच अहंकार व्हायचा.
मनुष्य स्वभाव कसा असतो पहा! ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यावर मला जाणवलं की अगदी साध्या सोप्या गोष्टी करण्यातही कधी लाज आड येते, कधी अहंकार, कधी तथाकथित स्टेटस, कधी कुठलंतरी असंच लंगडं कारण. पण मी जाणीवपूर्वक प्रयत्न जरूर करतोय. कारण मला लक्षात आलंय की माझी खरंच मनापासून इच्छा असेल, तर लोकांसाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी वेळेचं, पैशाचं, शक्तीचं, साधनांचं, कसलंच दारिद्र्य माझ्याकडे नाही. उलट मला दररोज तीन चांगल्या गोष्टी तीन वेगवेगळ्या लोकांसाठी यथाशक्ती करता आल्या तर थोड्याच काळात माझ्या आजूबाजूचं जग थोडं तरी अधिक सुंदर झालेलं असेल. आणि असं सुंदर जग निर्माण करण्याच्या या सिस्टिमच्या पिरॅमिडचा दगड होण्यात मला धन्यताच वाटेल. कारण या माणुसकीच्या MLM सिस्टिम मध्ये भले गलेलठ्ठ आयता चेक घरबसल्या मिळणार नसेल पण त्या नवमित्राने दिलेल्या वचनाप्रमाणे या माणुसकीच्या MLM मध्ये माझं आयुष्य बदलण्याची ताकद मात्र खचितच आहे आणि ते ही कायमचं…