
मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि त्यातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स या विषयाशी अधिक निगडित असलेला. आमच्या अभ्यासक्रमात आम्हाला खूप इलेक्ट्रॉनिक्स च्या सर्किट्स चा आणि विविध सुट्या भागांचा अभ्यास होता. आम्ही विद्युतवाहक पदार्थ, विद्युतनिरोधक पदार्थ शिकलो. रेसिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इन्डक्टर्स इत्यादी सुटे भाग, त्यांचे गुणधर्म, ते कसे बनवले जातात आणि त्यांचा सर्किट मध्ये कसा उपयोग होतो तेही शिकलो. रेसिस्टर्स हे विद्युतप्रवाहास अवरोध करून नियंत्रित करायला मदत करतात. कॅपॅसिटर्स हे विद्युत शक्ती साठवून ठेऊ शकतात. आणि इन्डक्टर्स हे विद्युत शक्ती, चुंबक शक्तीच्या रूपात साठवून ठेवतात. त्यावेळी आम्ही काही समजून आणि काही घोकंपट्टी करून हे सगळे सुटे भाग त्यांचे गुणधर्म, त्यांचा वापर इत्यादी सगळ्या गोष्टी त्यावेळी लक्षात ठेवल्या. प्रत्येक सर्किट मध्ये या तीनही भागांचा वापर करून वेगवेगळॆ परिणाम आपल्याला मिळतात हेही आम्हाला उमगलं होतं. शिकलेलं पडताळण्यासाठी प्रयोगशाळेत काही सर्किटही आम्ही तयार करून पहिली होती.
आता थोडं मोठं झाल्यावर, उघड्या डोळ्यांनी आणि थोड्या अधिक जागृततेनी पाहिल्यावर, जग नावाच्या माणसांच्या या प्रयोगशाळेत खूप गंमतीजंमती लक्षात येत आहेत. असं लक्षात येतंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि माणसांमध्ये खूप साम्य आहे. एक उदाहरण देतो. जशी विद्युत शक्ती प्रत्येक सर्किटमधून फिरते पण त्या शक्तीचा परिणाम काय दिसणार हे, ते सर्किट कसं डिझाईन केलं आहे या वर अवलंबून असतं. तशीच चिदशक्ती ही प्रत्येक माणसामध्ये आहे आणि ती षडचक्रांमधून वाहते पण त्या चिदशक्तीचा परिणाम त्या माणसावर कसा होणार हे त्या माणसाचं आतलं सर्किट कसं आहे यावर अवलंबून असतं. एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये कपॅसिटर व इन्डक्टर्स नसतीलही कदाचित, पण एखादा रेसिस्टर मात्र नक्कीच असतो. आणि रेसिस्टर असल्याशिवाय ते सर्किटही पूर्णही होत नाही. आणि इलेक्ट्रॉनिक्समधलं एक मुख्य तथ्य असं आहे की सर्किटमधली सर्वात जास्त विद्युत शक्ती, उष्णतेच्या रूपात वाया जाण्यासाठी हा रेसिस्टरच कारणीभूत असतो.
आता माणसामधल्या सर्किटचा आणि त्यांतल्या भागांचा विचार केला तर असं लक्षात येतं की माणसांच्या सर्किट मध्ये, ‘अहं’ नावाचा रेसिस्टर असतो. तो वेगवेगळ्या क्षमतेचा आणि कमी अधिक प्रमाणात शक्तिप्रवाहाला अवरोध करणारा असतो आणि मानवी शरीरातल्या या इडा, पिंगला, सुषुम्नेच्या सर्किट मधून ह्या साठवलेल्या किंवा प्रवाहित होणाऱ्या चिदशक्तीचा सर्वात जास्त ह्रास हा ‘अहं’ नावाचा रेसिस्टरच करतो. आणि तो ह्रास क्रोध, लोभ, मत्सर इत्यादी रूपात प्रतीत होत असतो.
इलेक्ट्रॉनिक चा पहिला आणि मुख्य नियम असा सांगितला जातो की ‘सर्किट मधून वाहणारा विद्युतप्रवाह हा सर्किटमधल्या रेसिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो’ . म्हणजे सर्किटमध्ये जितका रेसिस्टन्स कमी तितका विद्युतप्रवाह अधिक. खोलवर विचार करता, हेच माणसालाही तंतोतंत लागू नाही का? माणसामधून वाहणारी चिदशक्ती ही माणसामध्ये असणाऱ्या ‘अहं’ च्या रेसिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असते.’ म्हणजेच जितका ‘अहं’ कमी तितका चिदशक्तीचा प्रवाह अधिक.
या इलेक्ट्रॉनिक्स मधल्या मूलभूत नियमाला ओहम चा नियम ( Ohm’s Law) असं म्हणतात. आता इलेक्ट्रॉनिक्स मधला ‘ओहम’ चा नियम आणि माणसांच्या बाबतीतला ‘अहं’ चा नियम हा निव्वळ शाब्दिक योगायोग मानायचा की एक प्रकारचा गूढ ईश्वरी संकेत ?…