
एकदा आमच्याकडे अचानक आमच्या झाडूपोछा, भांडी घासणे या कामांसाठी असणाऱ्या मावशी आल्या नाहीत. त्यामुळे सहाजिकच ही सगळी कामं घरातल्या सगळ्या माणसांमध्ये वाटली गेली आणि माझ्याकडे घराची स्वच्छता ही कामगिरी येऊन पडली. हल्ली या अशा कामांची सवय थोडी मोडली होती ही गोष्ट खरीच. पण आईनेच परिस्थिती हातात घेतल्यामुळे नाही म्हणणं तर शक्यच नव्हतं. या माझ्या अवघडलेल्या स्थितीचा फायदा घेऊन, इतकी उत्तम संधी समोर आल्यावर, अगदी साळसूssद चेहऱ्याने घरातील झाडू माझ्या हाती आणून मला खिजवण्याचं सत्कार्य आमच्या अर्धांगिनी सोडणं हेही शक्यच नव्हतं. मग मात्र माझ्या संयमाचा बांध फुटला. मी म्हणालो, “अरे मावशी आल्या नाही म्हणून तुम्हीं मला कामाला लावणार का? माझ्या वेळेची काही किंमत आहे की नाही? माझ्या वेळेचा ताशी दर जर विचारात घेतला आणि माझा जितका वेळ या साफसफाईत जाईल त्याची किंमत काढली तर मावशींचा काही महिन्यांचा पगार देता येईल मला. बरं त्या मावशींना पण नीट अगोदर सांगून नाही का सुटी घेता येत….!”. माझा सात्विक मनस्ताप बोलत होता. खरं म्हणजे या सर्व कामांची लहानपणी सवय होती, नाही असं नाही. कुठलंही काम कमी दर्जाचं नसतं आणि प्रत्येक काम स्वतःला करता आलंच पाहिजे असंच लहानपणापासून मनावर बिंबवलं गेलं होतं आणि घरचा तसाच पायंडा असल्यामुळे कुठलंही काम करण्यात कधी कमीपणाही वाटला नाही. पण नोकरीत मोठ्या हुद्द्यावर असताना किंवा नंतर उद्योजक झाल्यावरही मनाचा ताठा थोडा अधिकच वाढला होता ही बाबही प्रामाणिकपणे मान्य करण्यासारखी. याचा परिणाम असेल कदाचित किंवा परिस्थितीसमोरची शरणागती आणि त्यातून निर्माण झालेली असहायता यामुळे असेल कदाचित पण माझी त्यादिवशी मात्र खूप चिडचिड झाली होती. अर्थात त्या चिडचिडीचा फार काही उपयोग होणार नव्हता हा भागही तितकाच खरा. कारण माझी आईच ती. माझी चिडचिड शांतपणे ऐकून घेतल्यावर ती म्हणाली, ” तुझा ताशी हिशोब नंतर सांग, आधी कामाला लाग. आणि नंतर तुझ्या लहानपणापासूनचा माझ्या तासांचा हिशोब काढून त्यातून तुझ्या वेळेची किमंत वळती करून घे. “. या वाक्याने मात्र मी क्लीन बोल्ड होऊन मुकाटपणे कामाला लागलो. कारण तसा हिशोब मांडला असता तर मला दिवाळखोरीच घोषित करायला लागली असती हे मलाही माहीत होतं आणि तिलाही.
कधीतरी तो प्रसंग आठवला की आता हसायला येतं. खरं पाहता व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या वेळेची किंमत कळायला लागते. मी एखाद्या गोष्टीसाठी खर्च केलेला वेळ आणि त्यासाठी मला मिळालेला मेहेनताना यांच्या गणितातून मला माझ्या वेळेची किंमत कळते. एकदा घडलेल्या त्या प्रसंगाची अशीच आठवण आल्यावर मी गंमत म्हणून सहज गणित करायचं ठरवलं. मी ठरवलं की समजा मी दिवसातून ८ तास आणि महिन्यातले २५ दिवस काम करतो. म्हणजे मी साधारणतः महिन्यात २०० तास काम करतो. आता हिशोबाच्या सोपेपणासाठी असं धरू की मला महिन्यात त्यासाठी सरासरी १ लाख रुपये मिळतात. याचा अर्थ माझ्या एका तासाची किंमत ही ५०० रुपये इतकी झाली. आता हा आकडा कळल्यावर मी ज्या काही कृती करतो त्याची किंमत किती? हे काढायचं ठरवलं. गणिताच्या या आकडेमोडीतून खूप गमतीशीर गोष्टी समोर यायला लागल्या. उदाहरणार्थ मी दररोज ८ तास झोपत असेन तर माझ्या दररोजच्या झोपेची किंमत ४००० रुपये झाली. माझ्या दात घासण्याची किंमत पंधरा मिनिटं म्हणजे सव्वाशे रुपये झाली. सकाळी अंघोळवगैरे नित्यकर्मांची किंमत साधारणपणे दोन तास म्हणजे हजारभर रुपये झाली. बायकोबरोबर शॉपिंगला गेलो तर खिशातले पैसे प्रत्यक्ष खर्च होतात ते वेगळे पण चार तासांच्या शॉपिंगवर माझ्या वेळेचे २००० रुपये खर्च झालेले असतात. मी टीव्हीवरची मालिका बघितली आणि दोन तास घालवले तर त्याची किंमत १००० रुपये झाली. अर्थात या माझ्या गणितावर माझे इकॉनॉमिस्ट मित्र मला निश्चित सांगतील की माझ्या विचारात कॉस्ट अकाउंटिंग किंवा इकॉनॉमिक्स च्या दृष्टिकोनातून खोट आहे आणि याची मला पूर्ण जाणीवही आहे. अर्थशास्त्रिय सिद्धांतानुसार माझ्या वेळेची प्रत्यक्षात किंमत किती हा भाग अलाहिदा पण माझी कच्ची पद्धत वापरून माझ्या वेळेची किंमत काढायचा या प्रयत्न गमतीशीर तात्पर्य देऊन गेला हे नक्की.
गम्मत म्हणून ही आकडेमोड करत असताना काही गंभीर गोष्टीही लक्षात आल्या. एक म्हणजे माझ्या वेळेची व्यावहारिक किंमत जी काही असेल ती असेल पण माझा वेळच मुळात खूप किमती आहे. माझा वेळ मी कुठे खर्च करतो याचा बारकाईने हिशोब होणं खूप आवश्यक आहे. माझी कुठली कृती मला किती महागात पडते हे ढोबळपणे माझ्या कच्या गणिताने माझ्या लक्षात येऊ शकतं. एखाद्या कृतीतून मिळणारे लघुकालीन व दीर्घकालीन परिणाम आणि त्या कृतीत खर्च झालेला माझा वेळ याचं त्रैराशिक मांडून त्या कृतीची किंमत मी ठरवू शकतो. या जगातलं सर्वात महागडं संसाधन (रिसोर्स) जर कुठलं असेल तर वेळ हेच आहे. इतर संसाधनं हवी तशी, हवी तेव्हा, कमी अधिक प्रमाणात उपलब्ध होऊही शकतील पण आयुष्यात प्रत्येकाला मिळणारा वेळ हा मर्यादित असतो आणि म्हणून वेळ या संसाधनाची किंमत तर अधीकच वाढते. याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट ही की माझा वेळ एकदा खर्च झाला की तो मला कधीच परत मिळणार नसतो. त्यामुळे येणारा प्रयेक क्षण कसा खर्च करायचा, हातातला वेळ कशासाठी द्यायचा याचा एक निश्चित विचार माझ्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कुठल्याही मर्यादित संसाधनाप्रमाणे माझा वेळ खर्च करण्यासाठी कशाला प्राथमिकता द्यायची हेही माझं मीच ठरवणं आवश्यक आहे.
दुसरा विचार असा की माझ्या वेळेची किंमत ठरवत असताना मूर्त आणि अमूर्त म्हणजेच tangible आणि intangible किमतीचा आणि मूल्यांचा विचार होणं आवश्यक आहे. बऱ्याचवेळा खर्च होणाऱ्या वेळेमुळे मूर्त परिणाम दिसणार नसतो पण त्याचा अमूर्त परिणाम मात्र अतिमूल्यवान असू शकतो. उदाहरणार्थ संगीताच्या रियाझावर किंवा नामस्मरणावर खर्च केलेल्या वेळेचं मूल्य मी कसं मोजू शकेन ?
तिसरा अधिक खोलवरचा विचार असा की माझ्या मते माझ्या वेळेची किंमत ही माझ्या मिळकतीवर अवलंबून नसते. ती असते माझ्या ध्येयांवर. आयुष्यात मिळणारा वेळ हा मर्यादित असतो, म्हणून ध्येय जितकी मोठी, ध्येय जितकी कठीण, ध्येय जितकी व्यापक तेवढी ती ध्येय मिळवण्यासाठी लागणाऱ्या वेळेची किंमत अधिक असते. त्यामुळे मी माझ्या वेळेची किंमत वाढवण्यासाठी माझी मिळकत वाढवण्याऐवजी माझ्या ध्येयांचा आकार, काठिण्य, व्यापकता वाढवणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण माझ्या आयुष्यात ही व्यापक ध्येय गाठू शकलो तर मी माझ्याच नाही तर माझ्या नंतर येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या वेळेची किंमत वाढवण्याकरताही कारणीभूत होऊ शकेन
आणि तसं खरंच झालं तर त्यावेळी माझ्या वेळेचा ताशी दर मोजण्याच्याही पलीकडे गेला असेल…