
माझ्यातला अंशावतार
काही दिवसापूर्वी एक सोहळा पाहिला. या सोहळ्यात उत्सवमूर्ती म्हणून भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेली ८ ते
१५ वयाच्या आसपासची २५ मुलं होती. त्यांना भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडून सम्मानित केलं जाणार होतं. त्या
मुलांकडे पाहिलं तर भारतातल्या इतर कोट्यवधी मुलांसारखीच दिसणारी ही मुलं होती. पण त्यांचा माननीय
राष्ट्रपतींच्या तर्फे सन्मान होणार होता कारण त्यांनी असं काही शौर्य दाखवलं होतं की ज्यामुळे त्यांचे आणि इतरांचेही
प्राण वाचवण्यासाठी ते कारणीभूत ठरले होते. प्रत्येक मुलाला शौर्यपदक देण्यापूर्वी त्या मुलाने अथवा मुलीने काय शौर्य
गाजवलं याची गाथा वाचून मग माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सम्मानित केलं जात होतं. त्यातले दोन मुलांचे
पुरस्कार तर मरणोत्तर होते. एकेकाची कथा अंगावर रोमांच उभे करणारी आणि प्रेरणा देणारी. कोणी लोकांचे जीव
वाचवलेले. कुणी नराधमांना अद्दल घडवलेले, कुणी पशूंचं संरक्षण करणारे, कुणी वाघाशी, कोब्रा सर्पाशी दोन हात करून
इतरांचा जीव वाचवलेले. विचार आला की कसं सुचत असेल या लहानग्यांना कठीण प्रसंगात कसं वागायचं ते? काय
विचार करून ही मुलं इतकं साहस करण्यासाठी धजावत असतील? काय नक्की मनात सुरु असेल त्यांच्या? ज्या मुलांनी
दुसऱ्यांसाठी आपला जीव ओवाळून टाकला त्यांना कुठून इतकी उदात्त प्रेरणा झाली असेल? आणि ज्यांचे प्राण ह्या
मुलांनी वाचवले त्यांना तर ही मुलं म्हणजे देवाचा अवतारच वाटली असतील त्या वेळी.
भागवदगीतेच्या ज्ञानकर्मसंन्यास योग या चवथ्या अध्यायात ७ आणि ८ हे खूप प्रसिद्ध श्लोक आहेत. यात ईश्वराच्या
अवताराविषयी भगवंत सांगतात;
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४-८॥
या श्लोकांमध्ये भगवान सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळी मी त्याच्या उत्थानासाठी अवतार घेतो.
साधूंच्या रक्षणासाठी, दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी प्रयेक युगात
जन्म घेतो.
मी जेव्हा हे श्लोक वाचले त्यावेळी विचार आला की अशा काय परिस्थिती निर्माण होत असतील कि ज्यामुळे प्रत्यक्ष
ईश्वराला अवतार घ्यावा लागत असेल? मग डोळ्यासमोर, श्रीराम, श्रीपरशुराम, श्रीकृष्ण, असे अवतार येऊ लागले,
त्यावेळची परिस्थिती सामोर येऊ लागली, आणि काही कवितेच्या ओळी स्फुरल्या त्या अशा;
आता सांगे तो माधव कधी अवतार होतो।
कधी येई धरेवर सगुणात दृश्य होतो ।
जेव्हा घालीतसे साद धरा आर्त या स्वरात ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।१।।
कली माततो जगात होई स्वैराचार रीत।
जाई स्वधर्म पाताळी चढे अधर्म व्योमात।
नीच राहतो सुखात राही सज्जन व्यथेत ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।२।।
व्यभिचाराची ना लाज भ्रष्टाचाराची न खंत।
अर्थ कामाच्या नशेत धर्म मोक्ष हा विस्मृत।
वाटे मर्दांना आनंद स्वाभिमानाच्या विक्रीत।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात।।३।।
होई स्त्रियांची बेअब्रू नसे शिक्षका आदर।
ज्ञानी तपवयोवृद्ध यांचा होई निरादर ।
आईबापाची किंमत जेव्हा होतसे पैशात ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।४।।
मत्त होई राजसत्ता नसे न्यायाचा आधार।
स्वामी होतसे उन्मत्त छळी प्रजेसी अपार।
काल कंठती हे जन जीव धरून मुठीत।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।५।।
तुला सुवर्णाच्या होती भांडी चांदीची पुजेस ।
होतो साजुक तुपाचा शुद्ध नैवेद्य देवास।
कर्मकांडाचा सोहळा भक्ती राहते पोथीत ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।६।।
येतो सज्जन रक्षिण्या येतो दुर्जन मारण्या ।
येतो घेउनि धर्माचा ध्वज पुन्हा उभाविण्या ।
धर्मपालक होण्याचि असे गरज जगात ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।। ७।।
जरी अजन्मा अमर्त्य असे प्राचीन पवित्र ।
ह्रास उत्पत्ती स्थिराचा असे संगम विचित्र ।
जेव्हा निर्गुणास लागे गुण-रुपाची मदत ।
तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।८।।
प्रामाणिकपणे सांगतो, ह्या ओळी स्फुरल्या त्यावेळी खूप हतबल वाटलं होतं मला. खरं तर या दोन श्लोकात भगवंत
विश्वास देतायत की धर्मरक्षणाय आणि खलनिग्रहणाय ते प्रत्येक युगात येणार आहेत. पण तरीही हतबल वाटण्याचं
कारण? कारण मनात आलेला विचार की भगवंताने अवतार घेण्याची वेळ येईपर्यंत आपण काय करतो? प्रत्येक युगात
ही परिस्थिती निर्माण होते आणि मी माझ्या घरात आग लागत नाही तोपर्यंत ‘आम्हा काय त्याचे’ म्हणून मूग गिळून
गप्प बसून राहतो? का? हिम्मत नाही माझ्यात अन्यायाविरुद्ध बोलण्याची? जगाचं जाऊदे हो, साधं मी ज्या
सोसायटीत राहतो तिथे कुणी मेंबर अरेरावी करत असेल तर त्याला ‘अरे ला कारे’ करण्याची का इच्छा होत नाही माझी?
आणि ‘जाऊदे ! कशाला उगाच वाईटपणा घ्या’ या बेगडी सभ्यतेच्या सबबीखाली माझी ही अळीमिळी गुपचिळी क्षम्य
ठरते?’जाऊदे कुणीच बोलत नाही तर आपण तरी कशाला बोला. आपण बरं आणि आपलं काम बरं. जगाला
सुधारण्यासाठी जन्म नाही आपला आणि वेळ आणि शक्ती तरी कुठाय उगाच या काटकटींसाठी? आधीच काही कमी
आहेत कटकटी आयुष्यात, त्यात हे कशाला ओढवून घ्या’; अशी स्वगतं करून जबाबदारी टाळत राहणार का मी?
परिस्थिती जरी तशीच असली तरी उठ सुठ भांडण काढून भांडायचं नाहीये कारण नुसतं निष्क्रिय भांडण करून अहं
शमवायचा नाहीये माझा. शहाणी माणसं आपल्या लढाया निवडून घेतात असं म्हणतात. पण ते लढाया करतातच.
लढाया कराव्याच लागतात. यासाठीच चंद्रगुप्त, चाणक्य जन्मतात, यासाठीच शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा
लागतो, धर्माला धर्मांधतेपासून सोडविण्यासाठीच संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी आणि असे अनेक अवतारी पुरुष
जन्माला येतात. पण म्हणून मी या अवतारी पुरुषांची वाट पाहत तसाच निष्क्रिय बसायचं? संताप, असहायता, लज्जा
या सगळ्याच भावना अशा तऱ्हेने दाटायचा मनात पण मी माझ्या स्तरावर करू शकेन असा उपाय मला सुचत नव्हता
पण तो उपाय या शौर्य पदक मिळालेल्या मुलांच्या गाथा ऐकून मिळाला.
‘बालादपी सुभाषितम् ग्राह्यम्’ म्हणजे लहान मुलांकडून सुद्धा चांगल्या गोष्टी शिका असं आपली संस्कृती सांगते.
मला या मुलांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. माझे डोळे उघडले. ही मुलं काही रूढ अर्थाने अवतारी नव्हती. पण तरीही
त्यांनी साधूंचं म्हणजेच निरागस चांगल्या मनाच्या लोकांचं परित्राण केलं होतं, गुंडांना, समाजातल्या दुष्कृतांना धडा
शिकवला होता. आणि या अर्थाने ते त्यांच्या छोट्याश्या विश्वात आणि त्या प्रसंगापुरते तरी अवतारीच होते. या मुलांनी
मला शिकवलं की माझ्या विश्वाचा आकार मीच ठरवून त्या माझ्या विश्वात तरी छोट्या छोट्या प्रसंगातून मी अवतारी
होण्याचा प्रयत्न का करू नये? अन्याय आजूबाजूला सुरूच असतो. घरात असतो, सोसायटीत असतो, कार्यालयात
असतो, समाजात असतो, कुठे नसतो? मग यावर उपाय म्हणून मीच ठरवायचं माझ्या स्वतःच्या कवेत मावेल इतकं
आणि माझी शक्ती पुरी पडेल इतकं माझं विश्व. आणि मग निदान या मीच ठरवलेल्या माझ्या विश्वाच्या परिघाततरी
अन्यायाच्या विरुद्ध आणि सज्जनांच्या बाजूने मी उभा का नाही राहू शकणार? मी माझं मत का नाही स्पष्टपणे मांडू
शकणार? माझ्याकडची कौशल्य वापरून मी अन्यायाविरुद्धच्या माझ्या लढाया का नाही जिंकू शकणार? ते विश्व
माझ्या घराच्या किंवा सोसायटीच्या आकाराइतकं लहान असेल आणि स्वामी समर्थ रामदासांसारखं ‘चिंता करितो
विश्वाची’ या व्यापकतेचं नसेल कदाचित, पण निदान मी ठरवलेल्या माझ्या विश्वाच्या हद्दीत लहान लहान प्रसंगात
माझ्यातला ईश्वराचा अंशावतार का बाहेर येऊ शकणार नाही? जो सज्जनांच्या मागे उभा आहे त्याच्या पायाखाली
काटेच असायचे हा जगाचा नियमही आहे आणि अनुभवही. पण जो सज्जनांच्या मागे उभा आहे त्याच्या मागे परमेश्वर
उभा आहे हे आश्वासन प्रत्यक्ष भगवंतानेच दिलं आहे तर मला भीती कशाची?
मला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की माझ्या स्वार्थासाठी केलेली लढाई हे भांडण असतं आणि दुसऱ्यासाठी
निस्वार्थ होऊन केलेलं भांडण हीसुद्धा लढाई असते. मला स्वार्थी भांडायचं नाहीये मला निस्वार्थी लढायचं आहे.
माझ्यातला परमेश्वरी अंशावतार माझ्या विश्वात सामावलेल्या लहान लहान प्रसंगातही जागृत ठेवायचा आहे, प्रदर्शित
करायचा आहे. आणि मी असं करत राहिलो तर माझ्या विश्वाचा परीघ आणि लढून जिंकण्यासाठी लागणारी माझ्यातली
विजिगिषु वृत्ती हे दोन्ही व्यापक होत जातील हळू हळू, आणि माझ्यासारखेच असे अनेक अंशावतार आपल्या
आजूबाजूला निर्माण झाले आणि त्यांनी आपल्या आपल्या विश्वात सद्रक्षण आणि खलनिर्दालन केलं तर वैश्विक
पूर्णावताराला अवतरण्याची वेळही येणार नाही कदाचित…