
काही दिवसांपूर्वी माझ्या शाळेमध्ये ‘व्यक्तिमत्वाची जडणघडण’ या विषयावर माझं व्याख्यान होतं. व्याख्यान हे निमित्त असलं तरी माझ्यासाठी तरी तो पुरस्कार प्रदान समारंभ होता. कारण ज्या शाळेमध्ये खूप मस्ती करतो म्हणून ‘दहशतवादी’ हे विशेषण माझ्या शिक्षकांनी मला ठेवलं होतं त्याच शाळेत पुढच्या पिढीशी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रण मिळणं हे माझ्यासाठी तरी कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हतं. असा ‘दहशतवादी मी’ ते ‘व्याख्याता मी’ हा प्रवास आणि माझ्यातला बदल कसा होत गेला याचा विचार करू लागलो. लक्षात आलं की वय वाढतं तसा माणूस बदलत जातोच या बद्दल शंकाच नाही आणि तसा तो बदलणं हे माणूस म्हणून अपेक्षितही आहे. कारण अनुभवातून शिकणे आणि अधिक प्रगल्भ होणे हे मानवजातीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. पण हे बदल होण्यासाठी, आवश्यक असणारी आजूबाजूची परिस्थिती, आयुष्यात भेटणारी माणसं, स्वतःचे अनुभव, आणि त्या अनुभवातून शिकून माणूस आपली वाट कशी चालायची हे कसं ठरवतो , अशा बऱ्याच गोष्टींवर ते अवलंबून असतं. एकंदरीतच प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाच्या मुळाशी असणारा दैवी आराखडा (Divine Design) आणि त्याबरहुकूम जाणीवपूर्वक किंवा अजाणता घडणारे मानवी प्रयत्न या दोन गोष्टी माणसाचं आयुष्य घडवण्यासाठी कारणीभूत असतात असं मला जाणवलंय. या प्रगल्भतेच्या प्रवासासाठी आवश्यक अशी अजूनही एक महत्वाची गोष्ट मला जाणवली आहे ती म्हणजे आपल्या समोर असणारी आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच आताच्या भाषेत रोल मॉडेल्स. माझ्या जीवनप्रवासामध्ये अशा आदर्श व्यक्तिमत्वांच्या सहवासामुळेच जीवनाला उत्तम वळण मिळत गेलं आणि “दहशतवादी राजेंद्र” ते “व्याख्याता राजेंद्र” हा प्रवास घडू शकला हे त्रिवार सत्य आहे.
आदर्श व्यक्तिमत्वांचा आपल्या जडणघडणीत कसा प्रभाव पडतो याचा विचार करताना मी ऐकलेला एक किस्सा आठवला. एका मोठ्या कलाकारांचा संगीताचा कार्यक्रम होता. आपल्या बरोबरच्या तबलावादकाची ओळख करून देताना ते म्हणाले “दिग्गज कलाकारांकडे पाहून हल्ली पुढच्या पिढीच्या कलाकारांमध्ये केस वाढवण्याची ट्रेंड आहे. पण माझ्या बरोबर आज जे तबलावादक संगत करणार आहेत त्यांनी त्यांचे केस वाढवलेले नसतानाही यांचा तबला खूप छान वाजतो.” जाणकार श्रोत्यांना बोलण्याचा रोख लक्षात आला आणि या त्यांच्या वाक्यालाच श्रोत्यांची खूप छान दाद मिळाली. प्रसंगातील विनोदाचा भाग सोडून देऊ पण हा किस्सा ऐकल्यानंतर माझ्या विचारांना चालना मिळाली. लक्षात आलं की आपल्याला जी व्यक्ती आदर्श वाटते त्याच्या केशभूषेपासून वेषभूषेपर्यंत, देहयष्टीपासून देहबोलीपर्यंत, आवडीनिवडीपासून जीवनशैलीपर्यंत, अशा बऱ्याच गोष्टीबाबत त्या व्यक्तीचा आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. म्हणून आपल्या आवडत्या व्यक्तीसारखी म्हणजे उदाहरणार्थ आपल्या आवडीच्या कलाकारासारखी, खेळाडूसारखी केशभूषा ठेवणे, त्याप्रमाणे वेशभूषा करणे, एवढच काय तर त्याच्या लकबींचाही आपल्या व्यक्तिमत्वात अंतर्भाव करणे अशा बऱ्याच गोष्टी घडताना दिसतात. डार्विनचा उत्क्रांतीवाद जर ग्राह्य धरला तर माणूस हा माकडापासून उत्क्रांत झाला आहे या सिद्धांताला माणसात दिसणारं अनुकरणप्रियत्व हा ठोस पुरावा असू शकेल का? असाही एक विचार मनाला चाटून गेला.
मधे एक सुंदर वाक्य वाचनात आलं. ते वाक्य असं की “माणसाने स्वतःचं अनुकरण केलं तर तो फार प्रगती करू शकत नाही”. वाक्याचा खोलवर विचार करताना लक्षात आलं की हे किती अचूक निरीक्षण आहे. प्रश्न पडतो की माणूस अनुकरण का करतो ?
साधारणतः मानवाची सर्व प्रगती ही निरीक्षण, निरीक्षणाचं विश्लेषण आणि विश्लेषणातून आलेल्या निष्कर्षाला अनुसरून अनुकरण यातूनच झाली आहे. प्राथमिक काळात निसर्गात, प्राण्यांमध्ये, पक्षांमध्ये असणाऱ्या गुणवैशिष्ट्याचं अनुकरण मानवाने करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माशाकडे पाहून पोहणे, पक्ष्यांकडून पाहून घर बनवणे, नंतर उडणे इत्यादी गोष्टी मानवाने अनुकरणातूनच सिद्ध केल्या आहेत असं लक्षात येतं. इतकंच कशाला अगदी आजच्या घडीला आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा अनुकरणातूनच सिद्ध होत आहे. उदाहरणार्थ मेंदूच्या अभ्यासातून आणि मेंदूच्या रचनेचं अनुकरण करून न्यूरल नेटवर्कचं आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. याच प्रमाणे उद्योजकतेच्या बाबतीतही असं सांगितलं जातं की एखाद्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीचं अनुकरण करा. म्हणजे याचा अर्थ की अनुकरणाविना जर प्रगती शक्य नसेल तर मग पुढचा प्रश्न असा की अनुकरण कशाचं करायचं आणि अनुकरण कसं करायचं?
मला असं लक्षात आलं आहे की अनुकरण दोन प्रकारचं असतं. एक बाह्यांगांचं अनुकरण आणि दुसरं अंतरंगाचं अनुकरण. सर्वसाधारणतः बाह्यांगांचं अनुकरण हे वेशभूषा, केशभूषा, लकबी इत्यादींपर्यंत मर्यादित असतं. या मध्ये अनुकरण करणारा अनुकरणीयाप्रमाणे दिसण्याचा किंवा भासण्याचा किंवा तशा बाह्य कृती करण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा अंतरंगाचं अनुकरण होतं त्यावेळी अनुकरण करणारा अनुकरणीयाप्रमाणे विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि ते विचार आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळवून घेऊन स्वतःच एक वेगळं रसायन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बाह्यांगाचं अनुकरण करण्याला मर्यादा आहेत आणि ते चिरकाल टिकणारं नाही. पण अंतरंगाचं अनुकरण हे अनुकरण करणाऱ्याला अधिक उदात्त करतं आणि या प्रक्रियेत अनुकरण करणारा स्वतः अनुकरणीय होतो. म्हणून आपला आवडता कलाकार केस कसे ठेवतो यापेक्षा तो वाद्यावर हात कसा आणि का ठेवतो हा विचार होणं म्हणजे खरं अनुकरण. आपली आवडती नटी वेशभूषा कशी करते यापेक्षा ती अभिनय कसा करते हे अभ्यासणं हे खरं अनुकरण. आपला आवडता खेळाडू ज्या नंबरची जर्सी घालतो त्या नंबरची जर्सी विकत मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याच्या मेहेनतीचं, खेळावरच्या निष्ठेचं अनुकरण करणं हे खरं अनुकरण. आणि असं झालं तरच मी माझ्या रोल मॉडेल्सचं खरं अनुकरण करून मी स्वतः दुसऱ्यासाठी रोल मॉडेल होण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या स्वतःला अनुकरणीय बनवण्याचा प्रयत्न करणे ही आयुष्याच्या प्रवासाची खरी कमाई आणि इतिकर्तव्यता आहे हे मला मनापासून पटलं आहे. अगदी आताच्या सोशल मीडियाच्या भाषेतच गमतीने सांगायचं झालं तर मी किती जणांना फॉलो करतो यापेक्षा जे मला फॉलो करण्याची प्रामाणिक आणि मनापासून इच्छा धरतात ती संख्या अधिक असणं म्हणजेच अनुकरणीय होणं होय.
डार्विनच्या उत्क्रांतीवादाप्रमाणे जेव्हा माकडाचा माणूस होत होता तेव्हा मला वाटतं की एका विशिष्ट टप्यावर जेव्हा माकडांनी बाह्य अनुकरण करायचं सोडून अंतरंगाचं अनुकरण करायला सुरुवात केली त्यावेळी माकडाचं माणसात रूपांतर व्हायला सुरुवात झाली असावी बहुतेक… आणि तसं पाहायला गेलं तर हाच फरक अजूनही माकडात आणि माणसात नाही का? …