
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका समारंभात गेलो होतो. त्या समारंभात एक जोडपं आणि त्यांचा एक चुणचुणीत मुलगा असं कुटुंब भेटलं. विषयात विषय निघत गेले आणि तो मुलगा काय करतो यावर विषय सुरू झाला. एकंदरीत वर्णनातून असं कळलं की तो मुलगा इंटरनॅशनल शाळेत शिकतो. शाळेमध्ये फुटबॉलचं विशेष कोचिंग आठवड्यातून दोन वेळा सकाळी सहा वाजता शाळा सुरु होण्यापूर्वी असतं. शाळा झाल्यावर तो बेस्ट ऑफ बेस्ट अशा ट्युशन क्लासला जातो मग त्याला सोमवार आणि गुरुवार गिटारचा क्लास असतो. मंगळवार आणि शुक्रवार अगोदर तबला आणि मग अबॅकसचा क्लास असतो. बुधवारी तो चेसच्या स्पेशल कोचिंगला जातो. शनिवारी शाळा नसल्यामुळे ऑलिम्पियाड, भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, स्कॉलरशिप, इत्यादी नेहेमीच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करतो. आणि रविवार तो ‘आर्ट अँड क्राफ्ट क्लास’ आणि ‘पैंटिंग क्लास’ यांना जातो. त्याच्या या दिनक्रमाकडे पाहून मी त्यांना विचारलं इतक्या सगळ्या बिझी वेळापत्रकात तो पूर्ण थकून जात असेल ना? त्यावर उत्तर आलं, ” हो ना हो ! पण म्हणून तब्येत नीट राहावी यासाठी रविवारी सकाळी लवकर आता त्याला जवळच्या एका ‘पावर योगा’ क्लासला पाठवायचं असा विचार सुरु आहे. शिवाय त्या क्लासमध्ये ‘भगवदगीता पण कव्हर करतात’ म्हणे !!! “.
मी थक्कहि झालो आणि सुन्नही. ते दहा बारा वर्षाचं पोर त्याच्या आईवडिलांच्या इच्छा आकांशा आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली पूर्ण दबलं, भरडलं जात असणार. आपल्या लहानपणी काही कारणांनी आपल्याला अशा सुविधा उपलब्ध झाल्या नव्हत्या म्हणून आता आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी जगातील सर्व संधी पालक मंडळी अगदी कुठल्याही किमतीला आपल्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहेत. मी स्वतः एक पालक म्हणून ही मानसिकता मुळापासून समजू शकतो आणि पालकांची, या स्पर्धामक युगात आपलं मूल मागे पडू नये, यासाठी चाललेल्या या धडपडीमागची तळमळही समजू शकतो. पण मुलांच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल? ती या संधींकडे संधी म्हणून पाहत असतात का? त्यांच्या इटुकल्या बुद्धीत आणि पिटुकल्या मनात पऱ्यांसाठी, राक्षसांसाठी, शूरवीर राजपुत्रासाठी, चेटकिण आणि सात बुटक्यांसाठी त्यांनी रिझर्व्ह केलेली जागा गणिताच्या प्रमेयासाठी, शास्त्रातल्या सिद्धांतांसाठी, आणि व्याकरणाच्या नियमांसाठी त्यांनी का रिकामी करून द्यायची?
हा विचार करताना सहज मी साधारण पाचवी सहावीत असताना माझ्यात आणि माझ्या आईमध्ये घडलेला एक प्रसंग आठवला. मी शाळेत अभ्यासाच्या बाबतीत पहिल्या काही नंबरात कधीच नव्हतो. पण अगदी शेवटही नसायचो. वर्गात साधारण १० ते २० च्या दरम्यान माझा नंबर असायचा. हुशार समजल्या जाणाऱ्या वर्गात पहिल्या १०/२० मध्ये असणं ही माझ्या दृष्टीने खूपच चांगली कामगिरी होती. एकदा परीक्षा अगदीच जवळ आल्यामुळे आई आणि माझ्यात झालेला साधारण संवाद असा;
आई : ” अरे परीक्षा खूप जवळ आली आहे. आता एक विषयाचा अभ्यास करायला एक दिवस तरी देशील की नाही?”
मी : ” आई शाळेतच अभ्यास झाला आहे. सगळं येतंय मला. अजून वेगळा अभ्यास कुठला?”,
आई : ” अभ्यास झाला असला तरी उजळणी नको का करायला?”
मी : ” उजळणी करून काय होईल?”
आई : “विषय लक्षात राहील, परीक्षेत चुका होणार नाहीत”
मी : ” आई, मी समजा उजळणी केली आणि परीक्षेत खूप छान मार्क मिळवले आणि अगदी पहिला नंबर आला तरी काय होणार? तर मी पुढच्या वर्गात जाणार. आणि समजा परीक्षेत कमी मार्क मिळाले आणि पंचविसावा नंबर आला तरी काय होणार? तरीही मी पुढच्या वर्गात जाणार. जर दोन्हींचा परिणाम एकच असेल तर मग उगाच जास्त अभ्यास कशाला करायचा? मी करीन उजळणी खेळून आल्यावर”
संभाषण संपलं आणि मी खेळायला गेलो सुद्धा. माझं ‘नंतर करीन’ हे आश्वासन आईला पटलं म्हणून, की माझा युक्तिवाद आईला पटला म्हणून, की माझी आई स्वतः एका शाळेची मुख्याध्यापिका असल्यामुळे माझ्या अभ्यासाच्या तयारीविषयी तिला कल्पना होती म्हणून तिने मला खेळायला जाऊ दिलं हे तिचं तिलाच माहित पण माझ्या आणि माझ्या खेळाच्या मध्यात ती आली नाही हे मला नक्की आठवतंय.
सद्गुण अंगी बाणवण्याचा, कला, कौशल्य मिळवण्याचा आग्रह आणि काही वेळा सक्तीही आम्हा दोन्ही भावंडांवर होती पण आमच्या बालसुलभ योग्य इच्छा आणि उर्मी कधीच मारल्या गेल्या नाहीत हे मात्र मी छातीठोकपणे सांगू शकतो.
लहानपणीच वेळही असतो आणि शक्तीही. आणि यासाठीच जितक्या गोष्टी लहानपणी शिकता येतील तितक्या शिकून घेतल्याचं पाहिजेत या मताचा मीही आहे. मात्र ते होत असताना ते मूल त्याच्या इच्छेने, त्याच्या गतीने, त्याच्या मानसिकतेने, त्याच्या भावविश्वानुसार फुलतंय ना याची खबरदारी घेणं गरजेचं आहे असं मला मनापासून जाणवलंय. आईन्स्टाईन ला त्याच्या गतीने फुलू दिलं नसतं तर शाळेत सामान्य विद्यार्थी म्हणून गणला गेलेला नंतर ‘जिनिअस’ या शब्दाला प्रतिशब्द म्हणून मानला गेला नसता.
हे जग आयुष्यात यशस्वी झालेल्या महामानवांनी नटलेली फुलबाग आहे असं मला वाटतं. काही ज्ञात असतील, काही अज्ञात असतील पण या फुलबागेतलं प्रत्येक फुल एक महामानवच असतं असं मला जाणवलं आहे. त्या प्रत्येक फुलाचा गंध, रंग, नखरा आपला स्वतःचा आहे. एक फुल दुसऱ्यासारखं नसतं. एका फुलाने दुसऱ्या फुलासारखं असणं अपेक्षितही नसतं. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने फुलण्यातच या महामानवांच्या बागेचं सौंदर्य आहे.
याच विचारात असताना एकदा मी माझ्याच लहानपणीच्या स्वतःच्या पिटुकल्या मनात पुन्हा प्रवेशलो. त्या लहान राजेंद्रमध्ये झालेल्या परकायाप्रवेशात मनात आलेले भाव कवितेचे शब्द म्हणून जपून ठेवले आहेत. ते आता आठवतायत;
बघून करायचं की करून बघायचं।
ठरवू दे नं मला मी कसं जगायचं।।१।।
सलगी केली एकाशी की दुसरा रंग रागावतो।
ठरवू दे नं मला मी कसं रंगायचं।।२।।
कशाला सक्ती माझ्यावर की मी कोकिळाच व्हायचं।
ठरवू दे नं मला मी कसं गायचं।।३।।
नसेलही ताकद माझ्या इवल्याश्या पंखात।
ठरवू दे नं मला मी किती उडायचं।।४।।
गुलाबही फुलतो, फुलतं गवतफूलही।
ठरवू दे नं मला मी कसं फुलायचं ।।५।।