
काल एक धारवाहिक पाहत होतो. पहात होतो म्हणजे खरं तर दूरचित्रवाणीसमोर बसल्यामुळे (दूरचित्रवाणीला सध्याच्या नागरी मराठीत टीव्ही असं म्हणतात) आणि काही कारणाने तिथून उठून जाता येत नसल्याने ती मालिका मला ‘पहावी लागत होती’ असं म्हणणं अधिक योग्य ठरेल.
एकंदरीत धारवाहिक मालिका आणि त्यांचा कलात्मक दर्जा हा मोठ्या चर्चेचा ( किंवा वादाचा, किंवा गरमा गरमीचा, किंवा बाचाबाचीचा किंवा, राड्याचा, किंवा दंगलीचा, किंवा तुंबळ युद्धाचा किंवा ……) विषय असू शकतो पण या धारवाहिक मालिकांमधील मला सर्वात लक्षात आलेली गमतीशीर गोष्ट म्हणजे धारवाहिक मालिकेतील मराठी.
एकदा मी मालिकेत संवादात किती इंग्रजी शब्द येतात हे गंमत म्हणून मोजून पाहत होतो. कुठल्याही लांब पल्ल्याच्या संवादात एकही इंग्रजी शब्द आला नाही असं होतंच नव्हतं. त्या मालिकेचा तो पूर्ण भाग मी खूप लक्ष देऊन ऐकला. प्रत्येक वाक्यात कधी कर्ता, कधी कर्म, कधी क्रियापद हे इंग्रजीत होतंच. मराठी वाहिन्या या मराठी भाषेतून चालतात असा त्यांच्यावर आळ आहे. हा आळ खोटा ठरवण्याचा या मालिकेने जणू चंगच बांधला होता. एका वाक्याची तर अशी रचना केली होती की त्यातून इंग्रजी शब्द काढले तर मराठीतला फक्त पूर्णविराम शिल्लक राहिला होता अस म्हटलं तर अतिशयोक्ती अलंकाराचा उपयोग झाला असंही म्हणता येणार नाही.
एकंदरीत कुठल्याही मराठी घरगुती( म्हणजे ऐतिहासिक , पौराणिक मालिकांचा अपवाद सोडता) मालिकेतील इंग्रजीच्या शब्दांना बाजूला हटवून जी काही माय मराठी त्या मालिकेच्या लेखकाच्या लेखणीतून निसटून जाते ती उरली सुरली मराठी, बहुतांशी इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या अभिनेता किंवा अभिनेत्री यांनी चारी मुंड्या चित केलेली असते.
एकंदरीतच व्यंजनं, स्वर, जोडाक्षरं यांचा उच्चार इंग्रजीच्या अंगभूत बोबडेपणासह केला जातो . उदाहरण द्यायचं तर ‘ऋषी ‘चा उच्चार ‘रुशी’ ‘कृषी’ चा उच्चार ‘ क्रिशी’, ‘श्री’ चा उच्चार ‘स्रि’, गृह’ चा उच्चार ‘ग्रुह’ असा सर्रास होतो. एवढंच कशाला आपण जर अगदीच बारकाईने ऐकलं तर बऱ्याच जणांना चक्क ‘ळ’ स्पष्ट म्हणता येत नाही असं ही लक्षात येईल. म्हणजे ‘सगळे’ च्या ऐवजी ‘सगये’, किंवा ‘खेळ’ च्या ऐवजी ‘खेय’ असा उच्चार सर्रास ऐकू येतो.
याही पलीकडची स्थिती मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्यांची आहे पण मी विस्तारभयाच्या कारणाने वाहिन्यांवरील बातम्या आणि त्यातील भाषा हा विषय इथे मांडण्यापासून माझ्या मनाला खूप कष्टाने आवरून धरत आहे हे इथे मुद्दाम नमूद करतो. कारण लेखही मोठा होईल, शिवाय लिहिता लिहिता जर एखादा अधिक उणा शब्द या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांविषयी लिहिला तर माझ्यावरच बातमी करून ठोकून देतील आणि मग तो विषय मोठ्या चर्चेचा ( किंवा वादाचा, किंवा गरमा गरमीचा, किंवा बाचाबाचीचा किंवा, राड्याचा, किंवा दंगलीचा, किंवा तुंबळ युद्धाचा किंवा ……) होईल. तेव्हा ते टाळलेलंच हितावह!
मग विचार केला उगाच घरगुती मालिका दाखवणाऱ्या वाहिन्या, बातम्या देणाऱ्या वाहिन्या आणि त्यात काम करणाऱ्यांनाच लक्ष्य का करा!! असं म्हणून एक गंमत आणि कुतूहल म्हणून मी माझ्या आजूबाजूला ‘मराठी’ या नावाखाली मंडळी जी भाषा बोलतात ती बारकाईने ऐकायला लागलो आणि मग लक्षात आलं की धारवाहिक आणि बातम्या या मध्ये ऐकू येणारी भाषाच सर्वसामान्य मराठी भाषिकांच प्रतिनिधित्व करणारी आहे. आता ‘मराठी’ या नावाखाली बोलली जाणारी भाषा हे केवळ संभाषणाचं माध्यम म्हणून वापरलं जात आहे. मराठी भाषेचं सौष्ठव, व्याकरण, सौंदर्य, शब्दसंपत्ती, लालित्य इत्यादी आता दैनंदिन वापराचे विषय नसून संशोधनाचे विषय ठरत आहेत. कुणाला भाषेविषयी काही टोकलं की “भावना पोहोचल्या ना? मग बस झालं!” असं उत्तर मिळतंय. भाषेतील दंतव्य, ओष्ठव्य, तालव्य, कंठव्य, सूक्ष्म, अंतस्थ, उष्म, संयुक्त हे व्यंजनांचे प्रकार असतात हे माहीत असणारे मराठी जन शोधून सुद्धा सापडतील की नाही ही शंका आहे.
अधिकाधिक विचार करता करता अधिकाधिक सुन्न झालो. संस्कृत सारखी अतिशय वैज्ञानिक आणि समृद्ध भाषा जशी आपण काळाच्या ओघात विसरत चाललो आहोत तशी आपली मराठी सुद्धा आता कालबाह्य होते आहे की काय अशी शंका मनात उत्पन्न होते. करण सद्यस्थिती तीच आहे आहे जी अतिशय गंभीर, चिंतनीय, चिंताजनक आणि भीतीदायक आहे.
एक मराठी कुलोत्पन्न म्हणून यावर मी काय करू शकतो असा जेव्हा प्रश्न मी स्वतःला विचारला तेव्हा मी काही गोष्टी करायचं ठरवलं.
१. शक्यतो मला पटणाऱ्या आणि रुचणाऱ्या मराठीत इंग्रजी शब्द कमीत कमी वापरून बोलण्याचा मुद्दाम प्रयत्न करायचा.
२. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा समोरच्याला मराठीत बोलण्याचा आग्रह करायचा.
३. बोली भाषासुद्धा शक्यतो व्याकरणाला धरून बोलण्याचा प्रयत्न करायचा.
४. जेव्हा शक्य असेल तेव्हा व्यंजनांच्या अपेक्षित उच्चारप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करायचा.
आणि शेवटचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ‘कालाय तस्मै नमः ‘ असं मनात म्हणत निराश न होता आणि सद्यपरिस्थितीचा हवाला न देता या मराठीची ‘गयती’ आपल्याकडून थांबवायचा प्रयत्न करायचा…