
प्रसन्न सकाळी चहाचा वाफाळता कप हाती घेऊन कोरं करकरीत वर्तमानपत्र पुढ्यात घेऊन बातम्या वाचण्यामध्ये एक वेगळाच अवर्णनीय रोमान्स असतो. पतीराज या रोमान्सच्या मूडमध्ये असताना गृहिणींच्या मनात मात्र नवऱ्याने सकाळचा पेपर हातात घेतल्या क्षणी सवतीमत्सर का जागा होतो हे मला अजून न उमगलेलं कोडं आहे. चिडचिडीचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला तर, ” मी रिकामटेकडी बसली नाहीये तुमच्यासारखी. अनंत कामं आहेत घरात. नुसता पेपर वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरात दोन कामांना हात लावलात तर काही बिघडेल का?” इतकं मोठं उद्गारवाचक वाक्य एका जळजळीत नेत्रकटाक्षात सामावून ते एकही शब्द ना उच्चरता त्याच नेत्रकटाक्षातून नवऱ्यावर अस्त्रासारखं डागलं जातं . हे युद्धकसब स्त्रीवर्ग कुठून आणि केव्हा प्राप्त करतो हा खरंच संशोधनाचा विषय होईल. कमी अधिक तीव्रतेने आणि वयाच्या कुठल्यातरी टप्प्यात हा सुखसंवाद न झालेलं असं जोडपं विरळाच. ‘वर्तमानपत्र दुपारी वाचलं तर बातम्या कमी नाही ना होत?” असा खोचक प्रश्न माझ्या आजीने माझ्या आजोबांना विचारल्याचं मला अंधुकसं आठवतंही आहे. म्हणजे एकंदरीतच या वर्तमानपत्रासंदर्भात हा युद्धप्रश्न पिढ्यानुपिढ्या चालत आला आहे असं दिसतं. म्हणजे वर्तमानपत्र या साहित्यप्रकारचं प्रारब्ध हे राजकीय पातळीपासून ते कौटुंबिक पातळीपर्यंत खळबळजनक गोष्टींशी निगडित आहे असंच म्हणावं लागेल.
गमतीचा भाग सोडून देऊ पण दररोज या व अशा सर्व कौटुंबिक प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाऊन सुद्धा मानवाला पिढ्यानुपिढ्या वर्तमानपत्राची भुरळ अजूनही का आहे असा एक प्रश्न सहज एकदा माझ्या मनात आला. थोडा विचार करता लक्षात आलं की बाह्यघटनांविषयी माणसाला नेहेमीच आकर्षण राहिलेलं आहे, काय नवीन बातमी आहे, काय नवीन घटना आहे एकंदरीत आपल्या जगाच्या परिघाच्या बाहेर जगात काय चाललंय याची उत्सुकता मानवी मनाला व्यापून असते. ख्रिस्तपूर्व ६० वर्षात रोम मध्ये वर्तमानपत्राचा पहिला उल्लेख आढळतो. म्हणजे तब्ब्ल दोन हजार वर्षांपूर्वी. लिखित वर्तमानपात्राचा पहिला उल्लेख, पहिल्या लिखित वर्तमानपत्राचा मान हा जोहान कार्लोस या जर्मन माणसाने काढलेल्या ‘रिलेशन’ या १६०५ सालच्या साप्ताहिकाला जातो. तेव्हापासून ते आजपर्यंत जवळजवळ चारशे वर्ष या वर्तमानपात्राची जादू पूर्ण जगभर पसरलेली आहे. भारत हा चीननंतर जगातला दोन क्रमांकाचा पेपर वाचणारा देश मानला जातो. खर पाहता नवीन बातमी सांगणारं पत्र या सुटसुटीत उद्देशाने सुरुवात झालेला हा साहित्यप्रकार म्हणजेच बातमीपत्र स्वतःची शान राखून आहे.
पण, आता मात्र मी जेव्हा वर्तमानपत्र हातात घेतो त्यावेळी ते ‘बातमीपत्र’ या प्रकारापासून फारकत घेत असलेलं मला जाणवतं. उत्तम साहित्य आणि लेखक यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा वर्तमानपत्राचा एक स्तुत्य आणि सर्वमान्य उपक्रम असला तरी सध्यातरी एकंदरीतच नकारात्मकतेचा प्रादुर्भाव वर्तमानपत्र या संस्थेला झाला आहे असं माझं निरीक्षण आहे. ‘लोकांना जे हवं ते आम्ही देतो’ या नावाखाली चटकदार बातम्या देणं, किंवा परखड पत्रकारिता’ या नावाखाली विरोधकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणं किंवा वास्तववादी पत्रकारिता म्हणून केवळ नकारात्मक बातम्या छापून आणणं हेच चित्र मला बहुतांशी वर्तमानपत्रात दिसतं. कुठल्यातरी सवंग किंवा अगदीच फालतू बातमीला ब्रेकिंग न्यूज म्हणण्याकडे सध्या माध्यमांचा जो कल आहे त्याला वर्तमानपत्रही अपवाद नाही असं साध्याचं चित्र आहे. समाजाचा आरसा म्हणून समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रावर नाकारात्मकतेची धूळ बसून समाजाचा खरा चेहरा दिसेनासा झाला आहे जणू. आजूबाजूला घडत असणाऱ्या सकारात्मक घटना, मानवी मूल्य, संवेदना यांना ठळक करणाऱ्या बातम्या वाचक वाचणार नाहीत असा समज पत्रकारितेत का पसरला असावा ? डोळे उघडे ठेवले आणि मन उमललेलं असेल तर मानवी जीवनाचा उदात्त अनुभव आपल्याच आजूबाजूला घडत असलेला आपल्याला जाणवेल. या विषयाच्या अनुषंगाने आता सहज आठवलं की एकदा एका संतपुरुषांना कोणीतरी विचारलं होतं की त्यांचं वर्तमानपत्राविषयी काय मत आहे? त्यावेळी ते हसत म्हणाले होते की “अध्यात्माच्या दृष्टीने साधकाने वर्तमानपत्र वाचणे म्हणजे ‘बाहेरची घाण विकत घेऊन घरात आणण्यासारखं आहे'”.
थोडं विश्लेषण केलं तर असं जाणवतं की वर्तमानपत्रातल्या वाचलेल्या बातम्यांपैकी दोन टक्के बातम्यासुद्धा दररोजच्या आपल्या जीवनाशी सरळ संबधींत नसतात. आणि एखाद दिवस वर्तमानपत्र नाही वाचलं तर वैयक्तिक आयुष्यात काही फार फरक पडत नाही असंही माझ्या लक्षात आलं आहे.
बरं, गंमत म्हणजे सकाळचा प्रसन्न वेळ ज्या वर्तमानपत्रासमोर घालवण्यासाठी मन इतकं आसुसलेलं असतं तेच वर्तमानपत्र दुपारी मात्र शिळं होतं आणि दुसऱ्या दिवशी होते त्याची चक्क रद्दी! वर्तमानपत्राची एकदा रद्दी झाली की कुणी ढुंकूनही बघत नाही त्याकडे. मग त्याचा उपयोग वडापाव बांधण्यापासून सगळीकडे होतो. म्हणजे तसं पाहता त्या वर्तमानपत्राचा ताजेपणा आणि परिणाम फक्त काही तासांपुरता असतो. म्हणजे जे वर्तमानपत्र सकाळी इतकं महत्वाचं वाटत असतं त्याची दुसऱ्या दिवशी रद्दी झालेली असते.
याच विचारशृंखलेत मग असं जाणवलं की वर्तमानपत्रांची करतो तशी मनातल्या विचारांची आणि उद्वेगांची रद्दी करता आली तर ? दिवसभरातल्या घटनांचे परिणाम मनावर सतत तर होतातच. पण स्थितप्रज्ञासारखं सतत निर्लेप मन ठेऊ नाही शकत मी कारण खूप कठीण गोष्ट आहे ती. पण एक मला जमणारा उपाय असा असू शकतो की घटनांचे जे प्रभाव मनावर होतात ते तात्पुरते त्या दिवसाच्या मानसिक कागदावर उमटवून दिवसाच्या शेवटी मनाचं ते वृत्तपत्र रद्दी म्हणून टाकून दिल तर ? दिवसभर सामान्य माणूस म्हणून वावरताना होणारे संकल्प विकल्प यांना सतत साक्षीत्वाने पाहण्याची मनाची तयारी होईपर्यंत दिवसभरातल्या घटनांचं वर्तमानपत्र रात्री निजण्यापूर्वी एकदाच साक्षीत्वाने वाचून लगेच त्याची मानसिक रद्दी करता आली तर ? आणि या उपर एक दिलासा देणारा असाही विचार करता येईल की जसा रद्दीवाला वर्तमानपत्रांची रद्दी विकत घेऊन आपल्याला वर पैसे देतो, तशी आपली ही मानसिक रद्दी आपण आपल्या आराध्याला अर्पण केली तर? तस जर करता आलं तर ती रद्दी घेऊन तो जगद्गनियंता आपल्या मानसिक रद्दीचं मूल्य म्हणून आपल्याला जीवनाची प्रगल्भता बहाल करील अशी माझी खात्री आहे.
आणि तसं झालं तर प्रत्येक नवीन दिवस उजाडेल स्वच्छ, उत्साही, सक्षम मनाने, एका नवीन उत्साहाने दररोज सकाळच्या करकरीत वर्तमानपत्रासारखा.